मुंबई: महाराष्ट्रातील राजकारणात आजचा दिवस ऐतिहासिक ठरणार आहे. तब्बल 19 वर्षांनंतर दोन बंधू राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकाच व्यासपीठावर येत असून, या ऐक्याची साक्ष देणारा ‘विजयी मेळावा’ आज मुंबईतील वरळी डोम येथे आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याच्या निमित्ताने संपूर्ण राज्याचे, इतकेच नव्हे तर दिल्लीचेही लक्ष या ठाकरे बंधूंवर केंद्रित झाले आहे.
आज सकाळी 11.30 वाजता हा कार्यक्रम सुरू होणार असून, राज आणि उद्धव ठाकरे दोघेही एकत्रितपणे मंचावर उपस्थित राहणार आहेत. या मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर दोघांची उपस्थिती, एकत्रित लढ्याचा इशारा आणि आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संभाव्य युतीची शक्यता यामुळे अनेक राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे दिसत आहेत.
सामाजिक आणि शैक्षणिक मुद्यांवर ठाकरेंनी एकत्र येत सरकारविरोधात तीव्र भूमिका घेतली होती. विशेषतः शाळांमध्ये हिंदी सक्तीविरोधात त्यांनी एकत्रित आंदोलनाची घोषणा केली होती. या दबावामुळे सरकारला निर्णय मागे घ्यावा लागला होता. याच पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेला आजचा विजयी मेळावा, म्हणजे सरकारविरोधात मिळालेल्या ‘यशाचा’ सार्वजनिक उत्सव मानला जातोय.
या कार्यक्रमात अनेक नेत्यांची भाषणं होणार आहेत. यामध्ये प्रकाश रेड्डी, शेतकरी पक्षाचे जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह ठाकरे बंधूंचा सहभाग असणार आहे. विशेष म्हणजे, उद्धव ठाकरे या मेळाव्याचे शेवटचे आणि निर्णायक भाषण करणार आहेत. त्यांच्या भाषणातून भविष्यातील राजकीय दिशादर्शक भूमिका स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
मेळाव्याला मोठ्या प्रमाणात गर्दी होणार असल्यामुळे वरळी आणि हाजी अली परिसरात वाहतूक व्यवस्थेवर ताण येण्याची शक्यता आहे. त्यामुळे आयोजकांनी डोमच्या बाहेरही मोठ्या स्क्रीन लावण्याची तयारी केली आहे.
या कार्यक्रमात केवळ भाषणंच नव्हे तर राजकीय संकेत देण्यात येणार का, याची उत्सुकता ताणली गेली आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूंमध्ये अधिकृत युती जाहीर होते का, हा सर्वात मोठा प्रश्न आजच्या मेळाव्यात उलगडू शकतो. ‘मराठी अस्मिता’ या मुद्द्यावर एकत्र आलेले ठाकरे बंधू आता राजकीय सहकार्य करतायत का, याकडे राज्यातील जनतेचं आणि विरोधकांचं लक्ष आहे.