Wednesday, August 20, 2025 09:22:41 AM

शिवसृष्टीच्या भूसंपादनात भ्रष्टाचाराचा आरोप; माजी आमदार वैभव नाईक यांचा सरकारवर हल्लाबोल

राजकोट किल्ल्याजवळील शिवसृष्टीसाठी भू-संपादनात महायुती व अधिकाऱ्यांकडून भ्रष्टाचाराचा आरोप; माजी आमदार वैभव नाईक यांचा सरकारवर थेट हल्लाबोल.

शिवसृष्टीच्या भूसंपादनात भ्रष्टाचाराचा आरोप माजी आमदार वैभव नाईक यांचा सरकारवर हल्लाबोल

मालवण: राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ उभारण्यात येणाऱ्या शिवसृष्टीच्या भूसंपादनात भाजप महायुती सरकार आणि अधिकाऱ्यांकडून संगनमताने भ्रष्टाचार केल्याचा गंभीर आरोप कुडाळ-मालवणचे माजी आमदार वैभव नाईक यांनी केला आहे.

शिवसृष्टीसाठी शासनाने 100 कोटी रुपयांची घोषणा केली असून त्यासाठी 2 एकर 18 गुंठे जमीन संपादित करण्यात येणार आहे. मात्र, ही जमीन मालवण नगरपरिषदेच्या आरक्षित क्षेत्रात येत असून सीआरझेडमध्ये देखील मोडते. याच जमिनीच्या संपादनासाठी सत्ताधारी लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांनी संगनमत करून प्रति गुंठा तब्बल 30 लाख 21 हजार रुपयांचा दर ठरवत, सुमारे 30 कोटी रुपयांचा प्रस्ताव वित्त विभागाकडे पाठविला आहे.

खाजगी वाटाघाटीद्वारे जमिनीचे संपादन आणि भ्रष्टाचाराचा आरोप

वैभव नाईक यांच्या म्हणण्यानुसार, या जमिनीचा शासकीय बाजारभावाच्या जवळपास पाचपट दर ठरवून ती खाजगी वाटाघाटीद्वारे सार्वजनिक बांधकाम विभागाला हस्तांतरित केली जाणार आहे. यामुळे या भूसंपादनात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होण्याची शक्यता आहे.

'या जमिनीच्या मोबदल्यात मिळणारी रक्कम खरीच जमीन मालकांपर्यंत पोहोचणार आहे का, की ती सत्ताधारी आणि अधिकाऱ्यांमध्ये वाटली जाणार आहे?' असा थेट सवाल माजी आमदारांनी उपस्थित केला आहे. तसेच, मालवणमधील इतर आरक्षित जमिनींसाठीही हा दर महायुती सरकार देणार का, असा प्रश्न त्यांनी विचारला आहे.

हेही वाचा: प्रवीण गायकवाड हल्ला प्रकरणी मराठा समाज आक्रमक

शिवसृष्टी म्हणजे भ्रष्टाचाराचे कुरण?

वैभव नाईक यांनी यापूर्वीही राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेल्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला होता. त्यांनी सांगितले की, सुरुवातीला 2 कोटी 36 लाख रुपये खर्चून उभारलेला पुतळा कोसळला होता. त्यानंतर परिसर सुशोभीकरणासाठी 4 कोटी 5 लाख रुपये खर्च करून केलेल्या कामातही हलगर्जीपणा दिसून आला होता.

नव्या पुतळ्यासाठी तब्बल 32 कोटी रुपये खर्चून राम सुतार यांच्या देखरेखीखाली उभारलेला पुतळा दर्जेदार असला, तरी पुतळ्याच्या चबुतऱ्याशेजारील फ्लोरिंगच्या कामात पहिल्याच पावसात भगदाड पडल्याचे नाईक यांनी नमूद केले. त्यामुळे या कामातही भ्रष्टाचार झाल्याचा संशय व्यक्त केला आहे.

हेही वाचा:Anganwadi Scam Exposed: ग्रामपंचायत सरपंच-सचिवांनी अंगणवाडीची इमारतच खाल्ली

युनेस्कोचा वारसा आणि स्थानिकांचा भ्रष्टाचार

सिंधुदुर्ग किल्ला युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांमध्ये समाविष्ट झाला असताना, सिंधुदुर्गातील सत्ताधारी व अधिकाऱ्यांकडून शिवाजी महाराजांच्या स्मारकांमध्ये आणि शिवसृष्टीच्या नावाखाली भ्रष्टाचार केला जात आहे, असा गंभीर आरोप माजी आमदारांनी केला आहे.

वैभव नाईक यांनी स्पष्ट केले की, 'छत्रपती शिवाजी महाराज हे आपले दैवत आहेत. त्यांच्या नावावर भ्रष्टाचार करणाऱ्या सत्ताधाऱ्यांचा आम्ही सातत्याने विरोध करत राहू.'


सम्बन्धित सामग्री