सातारा : कोयना शिवसागर आणि धोम जलाशयात केंद्राने ॲम्फीबायस प्लेनचा उपक्रम सुरु करावा अशी विनंती उदयनराजे भोसले यांनी केंद्राला केली आहे. सोशल मीडिया पोस्टमधून उदयनराजेंनी ही माहिती दिली आहे.
कोयना बॅक वॉटर असलेल्या विस्तीर्ण शिवसागर आणि धोम धरण जलाशयामध्ये जमिन आणि पाणी अशा दोन्ही ठिकाणी उतरणारी व उडडाण घेणारी सी प्लेनची सुविधा निर्माण करावी अशी मागणी आज केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांना केली.
उदयनराजे यांनी केंदीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची भेट घेतली आहे. या भेटीत त्यांनी मोहोळ यांना निवेदन केले आहे. हवाई वाहतुक मंत्रालयाला दिलेल्या
निवेदनात नमुद केले आहे की, सातारा जिल्हा हा विविधतेने नटलेला जिल्हा आहे. प्रचंड पर्जन्यमान आणि दुष्काळी भाग अशा विरोधीभासी वातावरणातील सातारा जिल्हयातील सातारा, जावळी, वाई, महाबळेश्वर, पाटण हे तालुके दुर्गम आणि डोंगराळ म्हणून ओळखले जातात. जागतिक पातळीवर प्रसिध्द असलेली महाबळेश्वर आणि पाचगणी ही दोन थंड हवेची ठिकाणी लाखो भारतीय आणि परदेशी नागरिक पर्यटकांना साद घालत असतात.
सातारा लोकसभा मतदार संघातील या वैशिष्यामुळे येथे विकासात्मक पर्यटन रोजगाराची प्रचंड संधी आहे. महाराष्ट्र शासनाने जावली तालुक्यातील मुनावळे या गावात जलक्रीडा पर्यटन विकास साध्य करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची कार्यवाही सुरु केली आहे. तसेच शिवसागर जलाशयामध्ये जागतिक स्तरावरील जलपर्यटनाची योजना देखील मंजूर केली असून त्याचीही कार्यवाही लवकरच सुरु होत आहे.
या जलपर्यटन विकासाच्या जोडीला सुमारे 900 चौरस किलोमीटर अशा विस्तीर्ण शिवसागर जलाशयात आणि सुमारे 20 चौरस किलोमीटरच्या धोम जलाशयातून उडडाण किंवा पाण्यावर उतरणारी सी प्लेन उपक्रम सुरु करणेबाबत हवाई वाहतुक मंत्रालयाने योजना राबवावी. ॲम्फीबायस प्लेन्सचा उपक्रम राबविल्यास याठिकाणी आपोआप नवीन रोजगाराच्या संधी मिळणार आहेत. केंद्राने नुकतेच मेघालय आणि आसाम राज्यामध्ये प्रायोगिक तत्वावर ॲम्फीबायस प्लेनची कार्यवाही सुरु केली आहे. त्यामुळे तेथील भागाच्या विकासाला निर्णयात्मक प्रोत्साहन मिळण्याबरोबरच त्याभागाचा अमुलाग्र बदल होणार आहे. त्याच धर्तीवर कोयना शिवसागर आणि धोम जलाशयामध्ये जमिन आणि पाणी असा उभयचर उडडाण करणारी आणि उतरणाऱ्या (टेक ऑफ व लॅन्डींग) सी प्लेनची सुविधा सुरु केल्यास विकासाच्या दृष्टीने चालना मिळणार आहे असेही निवेदनात नमूद केले आहे.
यावेळी मुरलीधर मोहोळ यांनी तातडीने कार्यवाही करतो असे आश्वासन दिले आहे. महाराज साहेबांची सूचना आम्हाला काम करण्यास उत्साह निर्माण करते. या निवेदनातील प्रकल्पामध्ये स्वत: लक्ष घालतो असे मोहोळ यांनी नमूद केले आहे.