होळीचा सण रंग आणि उत्साहाने भरलेला असतो. पण रंगांची उधळण करण्यापूर्वी होलिका दहन या महत्त्वाच्या विधीचे आयोजन केले जाते. 2025 मध्ये होलिका दहन गुरुवार, 13 मार्च रोजी होणार आहे.
होलिका दहन म्हणजे काय?
होलिका दहन, ज्याला होलिका दीपक किंवा घोटी होळी असेही म्हणतात, हा होळीच्या पूर्वसंध्येला साजरा केला जाणारा महत्वपूर्ण विधी आहे. यामध्ये होळी पेटवली जाते, जी चांगल्याचा वाईटावर विजय दर्शवते. हिंदू धर्मग्रंथानुसार, हा विधी प्रल्हाद आणि होलिकेच्या पौराणिक कथेशी संबंधित आहे. राक्षसीण होलिकाने भक्त प्रल्हादाला जाळण्याचा प्रयत्न केला, पण ती स्वतः आगीत भस्मसात झाली आणि भक्त प्रल्हाद वाचला
होलिका दहनचा शुभ मुहूर्त आणि भद्रा काळ
हिंदू पंचांगानुसार, होलिका दहन हा प्रदोष काळात केला जातो, जो सूर्यास्तानंतर सुरू होतो आणि पूर्णिमा तिथी अस्तित्वात असते. मात्र, या वेळी भद्रा नामक अशुभ कालखंड असेल. भद्रा पूर्णिमा तिथीच्या पहिल्या टप्प्यात असते आणि या दरम्यान कोणतेही शुभ कार्य करणे टाळले जाते.
हेही वाचा : गुरु आणि शुक्राची महायुती! 1 एप्रिलपासून मिळणार 'या' तीन राशींना भाग्याची साथ
होलिका दहन 2025 चे शुभ मुहूर्त:
• होलिका दहन – 13 मार्च 2025, गुरुवार
• होलिका दहनचा शुभ मुहूर्त – रात्री 11:26 ते 12:31 (14 मार्च)
• रंगपंचमी (रंगवाली होळी) – 14 मार्च 2025, शुक्रवार
• भद्रा पुच्छा – संध्याकाळी 6:57 ते 8:14
• भद्रा मुख – रात्री 8:14 ते 10:22
होलिका दहन का करतात?
होलिका दहन हे केवळ परंपरा नसून धार्मिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे आहे. या दिवशी होळीच्या अग्नीभोवती फिरून संकटांचे निवारण करण्याची प्रार्थना केली जाते. यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि समृद्धी, आरोग्य व सौख्य प्राप्त होते, असा समज आहे.
होलिका दहन विधी कसा करावा?
• होळी पेटवण्यापूर्वी गाईच्या शेणाचे गोळे, लाकडे आणि पूजेचे साहित्य ठेवले जाते.
• विधीपूर्वक होळीला हळद, गंध, अक्षता अर्पण केल्या जातात.
• अग्नीत नारळ, धान्य, गहू, हरभरा अर्पण करून परिक्रमा केली जाते.
• भद्राकाळ संपल्यानंतरच होलिका दहन करणे शुभ मानले जाते.
हेही वाचा : Chandra Grahan 2025: 'या' दिवशी आहे वर्षातील पहिले चंद्रग्रहण
होलिका दहन म्हणजे अधर्मावर धर्माचा आणि अन्यायावर सत्याचा विजय. हा सण आपल्याला शिकवतो की संकटांवर विजय मिळवण्यासाठी श्रद्धा आणि भक्ती महत्त्वाची असते. योग्य मुहूर्तावर होलिका दहन केल्याने घरात सुख-समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा वाढते.
Disclaimer: येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. जय महाराष्ट्र त्याची हमी देत नाही.