मुंबई: घर हे केवळ चार भिंतींनी बांधलेली जागा नसून, त्यामधून बाहेर पडणाऱ्या उर्जेचा आपल्या जीवनावर मोठा प्रभाव पडतो. वास्तुशास्त्रानुसार प्रत्येक घरामध्ये विशिष्ट प्रकारची ऊर्जा असते, कधी त्या ऊर्जेचा प्रभाव सकारात्मक असतो तर कधी नकारात्मक. त्यामुळे घरातील ऊर्जा संतुलित ठेवण्यासाठी वास्तुशास्त्राचे नियम पाळणे आवश्यक आहे.
मुख्य प्रवेशद्वार आणि दरवाजा -
वास्तुशास्त्रानुसार, घराचे मुख्य प्रवेशद्वार हे केवळ घरात प्रवेश करण्याचे ठिकाण नसून, सकारात्मक किंवा नकारात्मक ऊर्जा घरात येण्याचा मार्ग देखील असतो. याला "यश आणि प्रगतीचे प्रवेशद्वार" मानले जाते. मुख्य दरवाजा उत्तर, पूर्व किंवा ईशान्य दिशेस असावा आणि तो उच्च प्रतीच्या लाकडाचा बनवलेलाअसल्यास उत्तम. तसेच, हा दरवाजा इतर घरातील दरवाजांपेक्षा उंच असावा.
पूजा किंवा ध्यानासाठीची जागा -
घरात ध्यान आणि प्रार्थनेसाठी स्वतंत्र जागा असणे महत्त्वाचे आहे. ही जागा घराच्या ईशान्य किंवा उत्तर दिशेस असावी. ध्यान करताना पूर्व दिशेकडे तोंड करून बसल्यास अधिक सकारात्मक ऊर्जा मिळते. या जागेसाठी पांढरा, पिवळा किंवा हिरवा रंग अधिक योग्य ठरतो.
बैठकीची खोली (लिव्हिंग रूम) -
बैठकीची खोली घरातील सर्वात महत्त्वाची जागा असते. त्यामुळे ही खोली शक्य तितकी स्वच्छ असावी. ही खोली पूर्व, उत्तर किंवा ईशान्य दिशेस असावी. पर्यायी व्यवस्था म्हणून उत्तर-पश्चिम दिशेला देखील ठेवता येते. जड फर्निचर पश्चिम किंवा नैऋत्य दिशेस ठेवावे, तर घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तू दक्षिण-पूर्व भागात असाव्यात. जर आरसा ठेवायचा असेल, तर तो उत्तरेच्या भिंतीवर लावावा.
ब्रह्मस्थान (घराचे मध्यबिंदू) -
ब्रह्मस्थान हे वास्तुशास्त्रानुसार अत्यंत पवित्र आणि ऊर्जेने परिपूर्ण क्षेत्र मानले जाते. हे घराच्या मध्यभागी असते आणि इथे कोणतीही अडथळा निर्माण करणारी वस्तू नसावी. या भागात स्वयंपाकघर, बाथरूम किंवा खांब बांधल्यास नकारात्मक ऊर्जा निर्माण होऊ शकते, ज्याचा परिणाम घरातील सदस्यांच्या आरोग्यावर होऊ शकतो. त्यामुळे ब्रह्मस्थान नेहमी स्वच्छ आणि मोकळे ठेवावे.
वास्तुशास्त्राचे हे सोपे उपाय आपल्या घरात सकारात्मक ऊर्जा वाढवण्यास मदत करू शकतात आणि कुटुंबासाठी शांतता व समृद्धी घेऊन येऊ शकतात.
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. जय महाराष्ट्र त्याची हमी देत नाही.)