US Open 2025: यूएस ओपनमध्ये महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात जागतिक क्रमवारीत अव्वल टेनिसपटू आर्यना सबालेंका हिने आणखी एक इतिहास रचला आहे. बेलारूसची 27 वर्षीय सबालेंका हिने अमेरिकन खेळाडू अमांडा अनिसिमोवा हिला पराभूत करून सलग दुसऱ्यांदा यूएस ओपनचे विजेतेपद पटकावले.
अंतिम फेरीपूर्वी दोन्ही खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी केली होती, त्यामुळे सामना रोमांचक होईल अशी अपेक्षा होती. मात्र सबालेंकाने आपल्या दमदार खेळामुळे अनिसिमोवाला फारशी संधीच दिली नाही. आर्थर अॅश स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात पहिला सेट सबालेंकाने 6-3 ने सहज जिंकत आघाडी घेतली. दुसऱ्या सेटमध्ये मात्र अनिसिमोवाने चांगले आव्हान दिले. सेट टायब्रेकरपर्यंत गेला, पण निर्णायक क्षणी सबालेंकाने आपली ताकद दाखवत 7-6 (7/3) असा विजय मिळवला. अखेरीस सामना 6-3, 7-6 अशा फरकाने संपला आणि सबालेंकाच्या नावावर कारकिर्दीतील चौथे ग्रँडस्लॅम विजेतेपद जमा झाले.
हेही वाचा - Shreyas Iyer: श्रेयस अय्यरला कर्णधारपद; ऑस्ट्रेलिया अ विरुद्ध भारत अ संघाचे नेतृत्व करणार
गेल्या वर्षी सबालेंकाने यूएस ओपनच्या अंतिम सामन्यात अमेरिकन खेळाडू जेसिका पेगुलाला हरवले होते. यंदाच्या स्पर्धेतही तिने दमदार कामगिरी करत तिसऱ्यांदा ग्रँडस्लॅमच्या अंतिम फेरीत प्रवेश मिळवला. तिला मागील 2 वेळा पराभव पत्करावा लागला होता, मात्र अनिसिमोवाविरुद्धचा नकारात्मक रेकॉर्ड तोडत तिने या वेळी आपले वर्चस्व सिद्ध केले.
हेही वाचा - BCCI Hikes Jersey Sponsorship Rates: टीम इंडियाच्या जर्सीचे प्रायोजकत्व आता महाग होणार; बीसीसीआयने वाढवले दर
सबालेंका ही सेरेना विल्यम्सनंतरची पहिली महिला खेळाडू ठरली आहे, जिने 2012-14 नंतर सलग 2 वेळा यूएस ओपनचे विजेतेपद जिंकले. तिच्या या विजयामुळे महिला टेनिसमध्ये तिचे वर्चस्व अधिक ठळक झाले आहे.