BCCI: भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) ने वयामध्ये फसवणूक करणाऱ्या खेळाडूंवर लगाम घालण्यासाठी मोठं पाऊल उचललं आहे. आता कोणताही खेळाडू आपलं खोटं वय लपवू शकणार नाही, कारण BCCI लवकरच एक बाह्य एजन्सी नियुक्त करणार आहे, जी खेळाडूंच्या वयाची आणि पात्रतेची स्वतंत्र तपासणी करेल.
का गरज भासली अशा पद्धतीची?
क्रिकेटच्या मैदानात यश मिळवण्यासाठी अनेक युवा खेळाडू वय लपवून लहान वयोगटात खेळण्याचा प्रयत्न करतात. अशा प्रकारच्या फसवणुकीमुळे खर्या व योग्य वयोगटात असलेल्या खेळाडूंवर अन्याय होतो. या पार्श्वभूमीवर BCCI ने ही मोहीम अधिक तीव्र केली आहे.
दोन टप्प्यांची वय सत्यापन पद्धत
BCCI सध्या टू-टीयर एज वेरिफिकेशन पद्धत वापरतो. यामध्ये पहिल्या टप्प्यात खेळाडूचे दस्तावेज, जसं की जन्म प्रमाणपत्र, शाळेचे रेकॉर्ड यांची तपासणी केली जाते. दुसऱ्या टप्प्यात TW3 टेस्ट (Tanner Whitehouse 3) घेतली जाते, ज्यात हाडांच्या वाढीच्या आधारे वय ठरवले जाते. विशेषतः अंडर-16 मुलं आणि अंडर-15 मुलींसाठी ही प्रक्रिया वापरण्यात येते.
बाह्य एजन्सीची जबाबदारी काय?BCCI ऑगस्ट 2025 अखेरपर्यंत ही एजन्सी नियुक्त करणार आहे. Cricbuzz च्या रिपोर्टनुसार, यासाठी RFP (Request for Proposal) जारी करण्यात आली असून, देशातील नावाजलेल्या कंपन्यांना यामध्ये सहभागी होण्याचं आमंत्रण देण्यात आलं आहे. या एजन्सीकडे किमान 3 वर्षांचा अनुभव असावा आणि संपूर्ण भारतात, विशेषतः ग्रामीण भागांमध्ये प्रत्यक्ष जाऊन आणि डिजिटल स्वरूपातही तपासणी करण्याची क्षमता असावी.
हेही वाचा: Cricket Update: बुमराह संघाबाहेर; निर्णायक कसोटीत टीम इंडियाला मोठा धक्का, कोण घेणार बुमराहची जागा? जाणून घ्या
कोणत्या कागदपत्रांची तपासणी होणार?
-आधार, पासपोर्टसारखी ओळखपत्रं
-जन्म प्रमाणपत्र, शाळेचे दाखले
-राहण्याचा पुरावा
-शैक्षणिक कागदपत्रं
-आणि गरज असल्यास प्रत्यक्ष क्षेत्र तपासणीही
BCCI चे हे उद्दिष्ट स्पष्ट आहे. वय लपवून मोठ्या वयाचे खेळाडू लहान वयोगटात प्रवेश करू शकणार नाहीत. त्यामुळे स्पर्धेतील प्रामाणिकता टिकून राहील.
दोषी आढळल्यास कठोर कारवाई
जर एखादा खेळाडू वयात खोटं बोलताना आढळून आला, तर त्याच्यावर BCCI कडून कठोर कारवाई केली जाईल. अशा खेळाडूंना स्पर्धांमधून वगळण्याची किंवा बंदी घालण्याची शक्यता आहे. याआधीही काही प्रकरणांमध्ये वयाबाबत शंका उपस्थित झाल्या आहेत. अलीकडेच वैभव सूर्यवंशी यांच्या वयावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं होतं, पण ती शंका चुकीची सिद्ध झाली.
BCCI चं हे पाऊल भारतीय क्रिकेटमधील पारदर्शकता आणि योग्यता सुनिश्चित करण्यासाठी एक मोठा टप्पा मानला जात आहे. युवाखेळाडूंना योग्य वयोगटात संधी मिळावी, हे या निर्णयामागचं प्रमुख कारण आहे. खेळाची प्रतिष्ठा आणि स्पर्धात्मकता अबाधित राहावी यासाठी ही योजना लवकरच प्रत्यक्षात येण्याची शक्यता आहे.