Sunday, August 31, 2025 11:42:43 AM

IND vs BAN: चॅम्पियन्स ट्रॉफीत विजयी ‘श्रीगणेशा’, गिलचे शतक, शमीचा पंजा, बांगलादेशचा उडवला धुव्वा

शुबमन गिलचं शतक, मोहम्मद शमीचे ५ विकेट्स या कामगिरीसह भारताने चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ मधील पहिल्याच सामन्यात बांगलादेशवर ६ विकेट्सने शानदार विजय मिळवला.

ind vs ban चॅम्पियन्स ट्रॉफीत विजयी ‘श्रीगणेशा’ गिलचे शतक शमीचा पंजा बांगलादेशचा उडवला धुव्वा
IND vs BAN: चॅम्पियन्स ट्रॉफीत विजयी ‘श्रीगणेशा’, गिलचे शतक, शमीचा पंजा, बांगलादेशचा उडवला धुव्वा

भारतीय संघाने चॅम्पियन्स ट्रॉफीत विजयी सुरूवात केली. दुबईच्या मैदानात खेळवण्यात आलेल्या सामन्यात भारताने बांगलादेशचा ६ गडी राखून पराभव केला. फलंदाजीत शुबमन गिलने नाबाद शतक (१०१) झळकावले तर गोलंदाजीत मोहम्मद शमीने ५ गडी बाद करत आपले योगदान दिले. बांगलादेशने प्रथम फलंदाजी करताना २२८ धावा केल्या होत्या. तर भारताने या लक्ष्याचा पाठलाग करताना ६ विकेट्सने आणि २१ चेंडू शिल्लक ठेवत विजयाची नोंद केली. शतक झळकावणारा शुबमन गिल सामनावीर ठरला.  

बांगलादेशने दिलेल्या २२९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी रोहित शर्मा आणि शुबमन गिलची सलामीवीर  जोडी मैदानात उतरली. या जोडीने बांगलादेशच्या गोलंदाजीचा समाचार घेत अर्धशतक धावफलकावर लावले. रोहित शर्मा वेगाने धावा जमवण्याच्या नादात बाद झाला. त्याने ७ चौकारांसह ४१ धावां केल्या. यानंतर विराट कोहली (२२), श्रेयस अय्यर (१५)धावा, अक्षर पटेल (८) ठराविक अंतराने बाद झाले. एकवेळ भारतीय संघ आता अडचणीत अडकतो की काय, अशी स्थिती निर्माण झाली. तेव्हा केएल राहुलने गिलबरोबर भागिदारी करत संघाचा डाव सावरला. व्यक्तिगत ९ धावांवर असताना, केएल राहुलचा एक सोपा सुटला. तेव्हा राहुलने आक्रमक फलंदाजी करण्यास सुरूवात केली. तो बांगलादेशी गोलंदाजीवर तुटून पडला. दुसरी बाजू गिलने लावून धरली. राहुलने ४७ चेंडूत २ षटकार आणि एका चौकारासह ४१ धावा केल्या. तर शुबमन गिल शतकी खेळी करत नाबाद माघारी परतला. बांगलादेशकडून रिशाद हुसैनने २ तर मुस्तफिजूर आणि तस्किन यांनी प्रत्येकी १-१ गडी बाद केला. 

तत्पूर्वी, रोहित शर्माने नाणेफेक गमावली. पहिल्याच षटकातील अखेरच्या चेंडूवर मोहम्मद शमीने बांगलादेशचा सलामीवीर सौम्या सरकारला (०) झेलबाद करत भारताला पहिलं यश मिळवून दिले. त्यानंतर हर्षित राणाने दुसऱ्याच षटकात बांगलादेशचा कर्णधार शांतोला (०) विराट कोहलीकरवी झेलबाद करत दुसरा धक्का दिला. सातव्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर शमीने मेहदी हसन मिराजला (५) स्लिपमध्ये उभ्या असलेल्या शुबमन गिलकरवी झेलबाद करत बांगलादेशचा डाव आणखी अडचणीत आणला. त्यानंतर अक्षर पटेलने आपल्या व्यक्तिगत पहिल्या आणि डावाच्या ९ व्या षटकातील दुसऱ्या आणि तिसऱ्या चेंडूवर सलग दोन विकेट्स घेत बांगलादेशच्या डावाला खिंडार पाडलं. त्याने, मुश्फिकुर रहिम (०) आणि तंझीद हसनला (२५) झेलबाद केले. विशेष म्हणजे, अक्षरला हॅटट्रिकची संधी होती, पण रोहित शर्माकडून झेल सुटल्याने ती हुकली.

हेही वाचा - पहिल्या सामन्यातील पराभवानंतर पाकिस्तान संघात मोठा बदल

संघाची स्थिती ५ बाद ३५ अशी असताना, मधल्या फळीतील फलंदाज तौहिद ह्रदय आणि जाकिर अलीने संघाचा डाव सावरला. या दोघांनी मिळून १५० धावांची भागीदारी रचली. या जोडीने बांगलादेशच्या डावाला आकार दिला. ही जोडी धोकादायक होत असताना, मोहम्मद शमीने ४३ व्या षटकातील चौथ्या चेंडूवर जाकिर अलीला विराट कोहलीकरवी झेलबाद करत भागीदारी संपुष्टात आणली. अलीने ६८ धावांची खेळी साकारली. एका बाजूने एका पाठोपाठ फलंदाज बाद होते. तेव्हा तौहिद ह्रदयने एक बाजू लावून धरत शतक झळकावले. त्यांच्या खेळीच्या जोरावर बांगलादेशला सर्वबाद २२८ धावांपर्यंत मजल मारता आली. तौहिदने ११८ चेंडूत ६ चौकार आणि २ षटकारांसह १०० धावांची खेळी केली. भारताकडून शमीने ५ गडी बाद केले. हार्षितने ३ तर अक्षरने २ गडी टिपले. भारताचा आता पुढील सामना रविवारी २३ फेब्रुवारीला पकिस्तानविरूद्ध होणार आहे.

 

 


सम्बन्धित सामग्री