Sunday, August 31, 2025 12:02:05 PM

Ind vs Pak : पाकचे वस्त्रहरण करत टीम इंडियाने घेतला बदला, ‘किंग’ कोहलीची नाबाद शतक खेळी

विराट कोहलीच्या नाबाद शतकाच्या जोरावर टीम इंडियाने २४२ धावांचे लक्ष्य सहज पार केले आणि सेमीफायनलमध्ये आपले स्थान जवळपास निश्चित केले.

ind vs pak  पाकचे वस्त्रहरण करत टीम इंडियाने घेतला बदला ‘किंग’ कोहलीची नाबाद शतक खेळी
Ind vs Pak : पाकचे वस्त्रहरण करत टीम इंडियाने घेतला बदला, ‘किंग’ कोहलीची नाबाद शतक खेळी

दुबईच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर रंगलेल्या हायव्होल्टेज’ सामन्यात टीम इंडियाने पाकिस्तानचा ६ गडी राखून धुव्वा उडवला. या विजयासह टीम इंडियाने २०१७ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीतील पराभवाचा बदला घेतला. विराट कोहलीच्या नाबाद शतकाच्या जोरावर टीम इंडियाने २४२ धावांचे लक्ष्य सहज पार केले आणि सेमीफायनलमध्ये आपले स्थान जवळपास निश्चित केले. गोलंदाजीत कुलदीप यादवने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. दरम्यान, पाकिस्तान संघाचा या स्पर्धेतील हा सलग दुसरा पराभव ठरला असून त्यांचे या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे.

 

पाकिस्तानने दिलेल्या २४२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाची सुरुवात दमदार झाली. टीम इंडियाची सलामीवीर जोडी रोहित शर्मा आणि शुभमन गिलने मैदानाच्या चौफेर फटकेबाजी केली. रोहितला शाहिन शाह आफ्रिदीने बोल्ड केले. त्याने २० धावांचे योगदान दिले. रोहित बाद झाल्यानंतर गिलने अय्यरसोबत अर्धशतकी भागिदारी केली. संघाची धावसंख्या १०० असताना गिल बाद झाला. त्याने ४६ धावांचे योगदान दिले. तर श्रेयस अय्यरने अर्धशतक झळकावत (५६) विजयाचा पाया रचला.

 

पाकिस्तान विरुद्धच्या सामन्याचा खरा नायक ठरला तो विराट कोहली. त्याने संयमी फलंदाजी करत नाबाद १०० धावांची खेळी केली आणि टीम इंडियाला दणदणीत विजय मिळवून दिला. विराटने १११ चेंडूत ७ चौकारांसह नाबाद १०० धावांची खेळी केली. हार्दिक ८ धावांवर आफ्रिदीच्या गोलंदाजीवर बाद झाला. तर अक्षरने नाबाद ३ धावा केल्या. पाकिस्तानकडून आफ्रिदीने २ गडी बाद केले.

तत्पूर्वी, नाणेफेक जिंकून पाकचा कर्णधार मोहम्मद रिजवान याने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. त्याचा हा निर्णय फसला. नवव्या षटकात हार्दिक पांड्याने बाबर आझमला के. एल. राहुलकरवी झेलबाद करत भारताला पहिली विकेट मिळवून दिली. बाबरने २६ चेंडूत २३ धावा केल्या. अक्षर पटेलने इमाम उल हकची शिकार केली. त्याने त्याला धावबाद करत पाकिस्तानला दुसरा धक्का दिला. पहिल्या १० षटकांत पाकिस्तानने ५२ धावा केल्या होत्या.

सौद शकील आणि मोहम्मद रिझवान यांनी संयमी फलंदाजी करत ९० धावांची भागीदारी रचत संघाचा डाव सावरला. ३४ व्या षटकात अक्षर पटेलने रिझवानला क्लीन बोल्ड करत पाकिस्तानला मोठा हादरा दिला. त्यानंतर ३५व्या षटकात सौद शकीलही ५० धावांवर झेलबाद झाला. या दोन्ही फलंदाजांच्या विकेट्समुळे पाकिस्तानच्या धावगतीला ब्रेक लागला.

कुलदीप यादवने ४३व्या षटकात सलमान अली आगा आणि शाहीन आफ्रिदीला लागोपाठ दोन चेंडूंवर बाद करत पाकिस्तानच्या आशा मावळवल्या. त्यानंतर ४७व्या षटकात त्याने नसीम शाहला झेलबाद करत पाकिस्तानच्या शेवटच्या फळीकडे वाटचाल सुरू केली. शेवटच्या षटकांत हारिस रौफ आणि खुशदिल शाहने काही फटकेबाजी करत पाकिस्तानला २४० धावांचा टप्पा पार करून दिला. अखेरच्या चेंडूवर अतिरिक्त धावा घेण्याच्या प्रयत्नात हारिस रौफ धावबाद झाला आणि पाकिस्तानचा संपूर्ण डाव २४१ धावांवर संपुष्टात आला.

भारताकडून कुलदीप यादवने सर्वाधिक ३ विकेट्स घेत शानदार कामगिरी केली. ९ षटकांत ४० धावा देत त्याने पाकिस्तानच्या फलंदाजांना अडचणीत टाकले. हार्दिक पंड्यानेही भेदक गोलंदाजी करत ८ षटकांत ३१ धावांत २ विकेट्स घेतल्या. हर्षित राणा, अक्षर पटेल आणि रवींद्र जडेजाने प्रत्येकी १-१ बळी घेत पाकिस्तानचा डाव गुंडाळण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. भारतीय गोलंदाजांनी शिस्तबद्ध मारा करत पाकिस्तानला मोठा स्कोअर करण्याची संधी दिली नाही.


सम्बन्धित सामग्री