IND vs ENG 5th Test Win : मोहम्मद सिराजने मॅचविनिंग स्पेल करत या कसोटीत तब्बल 9 विकेट घेतल्या आणि शेवटच्या दिवशी इंग्लंडला पराभवाचा सामना करावा लागला. टीम इंडियाने सांघिक कामगिरी पार पाडत ओव्हल येथे भारताला 6 धावांनी रोमांचक विजय मिळवून दिला आणि मालिका 2-2 अशी बरोबरीत आणली.
पाचव्या कसोटीच्या दुसऱ्या डावात डावखुरा सलामीवीर यशस्वी जैस्वालने झळकावलेलं शतक क्रिकेटचाहत्यांसाठी संस्मरणीय राहील. भारतीय संघाने पहिल्या डावात 224 धावाच केल्या होत्या. प्रत्युत्तरादाखल खेळताना इंग्लंडचा डाव 247 धावांतच आटोपला होता. तिसऱ्या डावात निर्णायक शतकी खेळी करत यशस्वीने ओव्हलवरच्या ऐतिहासिक विजयात महत्त्वपूर्ण भूमिका साकारली.
ओव्हलमधील भारताच्या अविश्वसनीय कामगिरीनंतर सचिन तेंडुलकरने ट्विट करत भारतीय संघाचे अभिनंदन केले. मालिकेतील शेवटच्या कसोटी सामन्यात संघाच्या विजयाने हा महान खेळाडू आनंदी झाला आणि त्याने टीम इंडियाच्या या शर्थीने मिळवलेल्या विजयाला 10 पैकी 10 मार्क दिले. भारतीय संघाने 5 दिवसांत हातातून सुटत चाललेल्या सामन्यात अशक्य वाटेल असे पुनरागमन केले.
हेही वाचा - IND vs ENG 5th Test : हा भारतीय गोलंदाज वेदनाशामक इंजेक्शन घेऊन खेळतोय..! शुभमन गिलशी संभाषण व्हायरल
भारतीय क्रिकेट संघाने कसोटी सामन्याच्या शेवटच्या दिवशी 37 धावांचा बचाव केला. 374 धावांचा बचाव करताना मोहम्मद सिराज आणि प्रसिध कृष्णा यांनी खळबळजनक पुनरागमन केले आणि शेवटच्या दिवसाच्या सकाळच्या सत्रात ४ बळी घेतले. सचिन तेंडुलकरने अविश्वसनीय विजयाचे कौतुक केले आणि या सामन्याने आपल्याला थक्क केले, असे ते म्हणाले.
"कसोटी क्रिकेट.. भन्नाट कामगिरी. मालिका 2-2, कामगिरी 10/10! भारताचे सुपरमेन! जबरदस्त विजय," असे मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने X वर पोस्ट करताना लिहिले.
अंशुल कंबोजऐवजी संधी मिळालेल्या प्रसिध कृष्णाने 8 विकेट्स पटकावत संघव्यवस्थापनाचा विश्वास सार्थ ठरवला. आधीच्या सामन्यांमध्ये प्रसिधच्या गोलंदाजीवर इंग्लंडच्या फलंदाजांनी भरपूर धावा लुटल्या होत्या. त्यामुळे त्याच्यावर जोरदार टीकाही झाली होती.
रवींद्र जडेजा-वॉशिंग्टन सुंदर या अष्टपैलू जोडीने ओव्हल विजयात दिमाखदार योगदान दिलं. दुसऱ्या डावात दोघांनीही प्रत्येकी 53 धावा केल्या. या अर्धशतकांमुळे भारताला इंग्लंडसमोर 374 धावांचं आव्हानात्मक लक्ष्य देता आलं. यशस्वीचा अपवाद वगळता बाकी फलंदाजांना मोठी खेळी करण्यात अपयश आलं होतं. मात्र जडेजा-वॉशिंग्टन जोडीने ही कसर भरून काढली.
हेही वाचा - '...दूर राहण्यामुळेच किंमत कळते,' सायना-कश्यप पुन्हा एकत्र; नात्याला आणखी एक संधी देण्याची घोषणा
ओव्हलवरील विजयामुळे भारतीय क्रिकेट संघाला कसोटी मालिका 2-2 अशी बरोबरीत आणता आली. सामना संपल्यानंतर बोलताना शुभमन गिलने खेळाच्या शेवटच्या क्षणांपर्यंत हार मानण्यास नकार देणाऱ्या संघभावनेचे कौतुक केले. मोहम्मद सिराजने एक उत्तम स्पेल गोलंदाजी केली, शेवटच्या दिवशी 3 विकेट्स घेतल्या. एकूणच, सिराजने कसोटी सामन्यात 9 आणि मालिकेत 26 विकेट्स घेतल्या, दोन्ही संघांमधील सर्वोत्तम गोलंदाज म्हणून दौऱ्याचा शेवट केला.
ओव्हलमधील ऐतिहासिक विजय हा मालिकेचा असा शेवट होता, ज्याने शुभमन गिलच्या युगाची सुरुवात केली. शुभमनने आघाडी घेत 5 कसोटी सामन्यांमध्ये 750 हून अधिक धावा केल्या. गिलच्या नेतृत्वाखाली भारताने इंग्लंडविरुद्धच्या 5 कसोटी सामन्यांमध्ये उत्तम कामगिरी केली, ज्यामुळे विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्याशिवाय नवीन भारतीय संघाचा उत्साह अधोरेखित झाला.