Cricket Update: भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेचा पाचवा आणि निर्णायक सामना ३१ जुलैपासून सुरु होणार आहे. इंग्लंडने आधीच मालिकेत २-१ अशी आघाडी घेतलेली असल्याने, भारतासाठी हा सामना ‘करो या मरो’ असा ठरणार आहे. मात्र, या निर्णायक लढतीपूर्वी टीम इंडियाला मोठा झटका बसला आहे. संघाचा प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह या सामन्यात खेळणार नाही. त्याला विश्रांती दिल्याचे वृत्त आहे.
बुमराहशिवाय भारत कसोटी मैदानावर
जसप्रीत बुमराह हा भारताचा ‘एक्स फॅक्टर’ ठरलेला खेळाडू असून, त्याची अनुपस्थिती संघासाठी निश्चितच चिंता वाढवणारी आहे. त्याने मागील कसोट्यांमध्ये निर्णायक विकेट्स घेत संघाला अडचणीच्या वेळी सावरलं होतं. पण आता बुमराहला विश्रांती देण्याचा निर्णय घेतल्याने, टीम इंडियाला वेगळ्या रणनीतीचा अवलंब करावा लागणार आहे.
कोण घेणार बुमराहची जागा?
बुमराहच्या अनुपस्थितीत आकाश दीप याला संघात सामावून घेतलं जाईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. आकाश दीपने आधीच्या सामन्यांत खेळण्याची संधी मिळवली होती, पण दुखापतीमुळे त्याला बाहेर जावं लागलं होतं. आता तो पुन्हा फिट झाला असून, त्याला अंतिम संघात स्थान मिळण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, फिरकीपटू अंशुल कंबोजऐवजी कुलदीप यादवलाही प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळू शकते.
संभाव्य भारतीय संघटीम इंडियाच्या संभाव्य संघात यशस्वी जैस्वाल आणि शुभमन गिल हे सलामीला दिसणार आहेत. के. एल. राहुल, करुण नायर, रवींद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर हे मधल्या फळीत खेळणार आहेत. यष्टीरक्षक म्हणून ध्रुव जुरेल मैदानात उतरणार आहेत. गोलंदाजीची जबाबदारी शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज, आकाश दीप आणि कुलदीप यादव यांच्यावर असणार आहे.
हेही वाचा: दिव्या देशमुखचा ऐतिहासिक विजय! FIDE महिला बुद्धिबळ विश्वचषकात पटकावले विजेतेपद
इंग्लंडचा तगडा संघ घोषित
दरम्यान, इंग्लंड संघाने पाचव्या कसोटीसाठी आधीच आपला संघ घोषित केला आहे. कर्णधार बेन स्टोक्सच्या नेतृत्वाखाली, जो रूट, ख्रिस वोक्स, हॅरी ब्रूक, बेन डकेट आणि जोफ्रा आर्चर यांसारखे अनुभवी खेळाडू संघात आहेत. त्यामुळे भारतापुढे आव्हान मोठं आहे.
निकाल ठरवणारी झुंज
भारताला जर ही कसोटी जिंकायची असेल तर नव्या चेहऱ्यांनी जबाबदारी उचलावी लागणार आहे. बुमराहसारख्या खेळाडूचा अनुभव आणि आगळीवेगळी गोलंदाजी नसताना, संघाला एकत्रित खेळ करावा लागेल. यंदाच्या मालिकेतील हा शेवटचा आणि सर्वाधिक महत्त्वाचा सामना असेल, जो संपूर्ण क्रिकेटविश्वाचे लक्ष वेधून घेणार आहे.