Wednesday, September 10, 2025 09:58:18 PM

Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान सामन्याची तिकिटे अद्याप का विकली गेली नाहीत? अहवालात समोर आले खरे कारण

भारत विरुद्ध पाकिस्तान हा सामना जगभरातील क्रिकेट चाहत्यांसाठी सर्वात रोमांचक मानला जातो. नेहमीप्रमाणे, या सामन्याची तिकिटे काही तासांतच विकली जातील, अशी अपेक्षा होती.

asia cup 2025 भारत-पाकिस्तान सामन्याची तिकिटे अद्याप का विकली गेली नाहीत अहवालात समोर आले खरे कारण

Asia Cup 2025: आशिया कप 2025 मधील भारत विरुद्ध पाकिस्तान हा सामना जगभरातील क्रिकेट चाहत्यांसाठी सर्वात रोमांचक मानला जातो. नेहमीप्रमाणे, या सामन्याची तिकिटे काही तासांतच विकली जातील, अशी अपेक्षा होती. मात्र, आश्चर्यकारक बाब म्हणजे अजूनही अनेक तिकिटे विकली गेलेली नाहीत. द टाईम्स ऑफ इंडियाच्या अहवालानुसार, यामागील मुख्य कारण म्हणजे तिकिटांच्या आकाशाला भिडणाऱ्या किमती. व्हीआयपी सूट्स ईस्टची किंमत सुमारे 2.5 लाख आहे, तर रॉयल बॉक्सची किंमत 2.3 लाख आहे. याशिवाय, प्रीमियम स्तरातील काही तिकिटे 1.6 लाखांना उपलब्ध आहेत. प्लॅटिनम स्तरातील तिकिटांची किंमत 75,659 आहे. अशा उच्च दरांमुळे सर्वसामान्य चाहत्यांसाठी हा सामना प्रत्यक्ष पाहणे जवळजवळ अशक्य झाले आहे.

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील द्विपक्षीय मालिका गेल्या 10 वर्षांपासून खेळली जात नाही. त्यामुळे जागतिक किंवा खंडीय स्पर्धेत त्यांची भिडंत झाल्यावर उत्साहाचे वातावरण चांगलेच वाढते. या वेळी मात्र राजकीय आणि लष्करी पार्श्वभूमीमुळे सामना अधिक संवेदनशील ठरतो आहे. काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून सुरू झालेल्या ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर भारत आणि पाकिस्तान आमनेसामने येणार आहेत.

हेही वाचा - Hardik Pandya Watch : हार्दिक पांड्याच्या घड्याळाची किंमत ऐकून बसेल धक्का; Asia Cupच्या बक्षीसाच्या रकमेहूनही आहे महाग

दरम्यान, भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादव यांनी सामन्याआधी आपली भूमिका स्पष्ट केली. त्यांनी सांगितले की, 'आक्रमकतेशिवाय तुम्ही हा खेळ खेळू शकत नाही. मैदानावर नेहमीच आक्रमकता असली पाहिजे. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी मी खूप उत्सुक आहे.' दरम्यान, पाकिस्तानचा कर्णधार सलमान आघा याने देखील आक्रमकतेबद्दल आपले मत मांडले. त्याने सांगितले की, 'कोणालाही आक्रमकता दाखवण्यापासून रोखलेले नाही. वेगवान गोलंदाजांना नेहमी आक्रमक राहायला आवडते आणि तेच त्यांना यश देतं. मात्र, ती आक्रमकता फक्त मैदानावरच दिसली पाहिजे.' 

हेही वाचा - World Para Athletics Championships : जागतिक पॅरा अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये 35 भारतीय खेळाडूंचे पदार्पण

भारत आपली आशिया कप 2025 मोहीम 10 सप्टेंबर रोजी यूएईविरुद्ध दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर सुरू करणार आहे. चाहत्यांना या हाय-व्होल्टेज सामन्याची आतुरता आहे, परंतु आकाशाला भिडणाऱ्या तिकिटांच्या किमतींमुळे प्रत्यक्ष मैदानावर किती चाहत्यांना उपस्थित राहता येईल, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
 


सम्बन्धित सामग्री