Tech News: स्मार्टफोन जगतात आज कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) जोर वाढताना दिसतो आहे. सॅमसंग आणि गूगलसारख्या कंपन्या झपाट्याने आपले मोबाईल फोन नवनवीन AI फीचर्सने सजवत आहेत. त्यामध्ये AI असिस्टंट, स्मार्ट कॅमेरा फंक्शन्स आणि यूजर एक्सपिरियन्स सुधारण्यासाठी अनेक नवी साधने उपलब्ध करून दिली जात आहेत. मात्र, दुसरीकडे दिग्गज कंपनी Apple मात्र या शर्यतीत मागे पडल्याचं चित्र आहे.
Apple चा वॉइस असिस्टंट Siri अनेक वर्षांपासून लोकांच्या मोबाईलमध्ये आहे. पण Google Assistant किंवा Amazon चा Alexa यांच्या तुलनेत Siri फारशी प्रगती करू शकली नाही. अनेक यूजर्सनी तक्रार केली आहे की, Siri मल्टी-स्टेप क्वेरीज नीट हाताळू शकत नाही, तसेच क्लिष्ट प्रश्नांना योग्य उत्तर देण्यात ती अयशस्वी ठरते.
याच पार्श्वभूमीवर आता Apple ने Google कडे मदतीचा हात पुढे केला असल्याची माहिती समोर आली आहे. रिपोर्ट्सनुसार, Apple आपला असिस्टंट अधिक सक्षम करण्यासाठी Google च्या Gemini AI मॉडेलचा वापर करण्याच्या विचारात आहे. दोन्ही कंपन्यांमध्ये याबाबत प्राथमिक चर्चा सुरू झाल्याचं सांगितलं जातंय.
हेही वाचा: Android phone update: तुमच्या अँड्रॉइड फोनच्या कॉल सेटिंग्ज अचानक बदलल्या? जाणून घ्या कारण
Siri मध्ये मोठे बदल होण्याची शक्यता
Apple ने काही काळापूर्वी Siri ला पूर्णपणे नवीन रूपात सादर करण्याची घोषणा केली होती. मात्र, ठरलेली डेडलाईन बरीच मागे सरकली आणि कंपनीला टीकेचा सामना करावा लागला. त्यामुळे आता बाजारात Siri चा नवा अवतार कधी दिसणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
रिपोर्ट्सनुसार, Apple दोन वेगवेगळ्या प्रकारचे Siri चे व्हर्जन तयार करत आहे. पहिला व्हर्जन Apple च्या स्वतःच्या AI मॉडेलवर आधारित असेल, तर दुसऱ्यासाठी बाहेरील AI मॉडेल वापरण्याचा विचार केला जातो आहे. या बाहेरील मॉडेलसाठी Google चा Gemini हा सर्वात मोठा पर्याय असू शकतो.
हेही वाचा:CAPTCHA Scam: फक्त एक क्लिक आणि फोन हॅक! भारतात पसरला नवीन CAPTCHA स्कॅम
Google आणि Apple युती झाली तर काय बदल होईल?
जर Apple आणि Google यामध्ये करार झाला, तर Siri मध्ये मोठे बदल पाहायला मिळू शकतात. अधिक स्मार्ट, जलद आणि अचूक वॉइस असिस्टंट मिळाल्यास Apple यूजर्सना नवीन अनुभव मिळेल. त्याचवेळी, AI च्या स्पर्धेत Apple पुन्हा एकदा आपली ताकद दाखवू शकेल.
सध्या AI क्षेत्रात Microsoft, Google, Samsung, OpenAI अशा कंपन्यांनी मोठी आघाडी घेतली आहे. अशावेळी Apple मागे राहिल्यास त्याला मोठा फटका बसू शकतो. त्यामुळे Google Gemini चा आधार घेणे ही Apple साठी गरजेची चाल ठरू शकते.
पुढची दिशा
अद्याप या चर्चांचा शेवट कुठे होणार याची खात्री नाही. Apple ने याआधी Anthropic आणि OpenAI सोबतही चर्चा केल्याची माहिती आहे. मात्र, शेवटी Siri ला कोणत्या AI मॉडेलसोबत बाजारात आणलं जाणार, यावर सर्वांचे लक्ष असेल.
ग्राहकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी Apple ला आता Siri चा नवा अवतार अधिक बुद्धिमान आणि आकर्षक स्वरूपात सादर करावाच लागेल, नाहीतर Google आणि Samsung सारख्या स्पर्धकांच्या तुलनेत Apple मागे पडण्याचा धोका आहे.