मुंबई: मोठ्या पडद्यावर बराच काळ काम केल्यानंतर,आदिनाथ कोठारे लवकरच छोट्या पडद्यावर पुनरागमन करणार आहे. 'स्टार प्रवाह' वाहिनीवर एक नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे, ज्याचे नाव आहे, 'नशीबवान'. ही मालिका 15 सप्टेंबर 2025 पासून रात्री 9 वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेत आदिनाथ कोठारे 'रुद्रपताप घोरपडे' ची भूमिका साकारणार आहे. आदिनाथ कोठारेसह, या मालिकेत नेहा नाईक, अजय पूरकर, सोनाली खरे प्रमुख भूमिकेत आहेत.
हेही वाचा: Israel Attack On Yemen : भयंकर ! घरे हादरली आणि खिडक्यांच्या काचा फुटल्या...; इस्रायलचा येमेनच्या राजधानीवर हवाई हल्ला
आदिनाथ कोठारे काय म्हणाला?
'रुद्रपताप घोरपडे' च्या भूमिकेबद्दल बोलताना आदिनाथ कोठारे म्हणाला की, 'नशीबवान या मालिकेसाठी मी खूप उत्सुक आहे. ही माझी पहिली मालिका आहे, ज्यात मी कलाकार म्हणून काम करणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून मालिकांमध्ये काम करण्याचा माझा विचार सुरू होता. या मालिकेच्या निमित्ताने हा योग जुळून आला. टीव्ही हे फक्त माझेच नाही, तर अनेकांचे आवडते माध्यम आहे. मालिकेच्या माध्यमातून तुम्ही घराघरांत पोहोचता, प्रेक्षकांच्या कुटुंबाचा भाग होता. नशीबवान या मालिकेची कथा अतिशय सुंदरपणे मांडण्यात आली आहे'.
पुढे, आदिनाथ कोठारे म्हणाला की, 'स्टार प्रवाह वाहिनीसोबत माझं जुनं नातं आहे. निर्माता म्हणून कोठारे व्हिजनची पहिली मालिका स्टार प्रवाहसोबतच केली होती. त्यानंतर अनेक सुपरहिट मालिका वाहिनी आणि आमच्या प्रोडक्शन हाऊसने एकत्र केले. आता पुन्हा एका नव्या मालिकेची सुरुवात स्टार प्रवाहासोबत होत आहे, याचा अतिशय आनंद आहे. गणेशोत्सवाच्या धामधुमीत अतिशय छान कलाकृती माझ्या वाट्याला आली आहे. मला खात्री आहे बाप्पाच्या आशीर्वादाने नशीबवान मालिका देखील प्रेक्षकांच्या मनात नक्कीच घर करेल'.