Donald Trump address to US Congress : अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आज (5 मार्च) संसदेच्या संयुक्त सत्राला पहिल्यांदाच संबोधित केलं. अमेरिकन जनतेला भावनिकदृष्ट्या सुखावणारे अनेक निर्णय ट्रम्प यांनी आज जाहीर केले. ट्रम्प यांनी तब्बल 1 तास 30 मिनिटांचं भाषण केलं. या भाषणादरम्यान त्यांनी दोन वेळा भारताचाही उल्लेख केला. ट्रम्प यांनी आपल्या भाषणात अनेक महत्त्वपूर्ण आणि साहसी निर्णय घेतले, जे जागतिक राजकारण आणि अमेरिकन धोरणावर खोलवर छाप पाडण्याची शक्यता आहे.
ट्रम्प यांनी आयात शुल्कावरून आणि इतर काही मुद्द्यांवरून मेक्सिको, चीन, ब्राझील, दक्षिण कोरिया, युक्रेन व भारत या देशांना धक्के दिले. शिवाय, त्यांनी आयात शुल्काच्या मुद्द्यावरून भारतावरील नाराजी उघड केली. ते म्हणाले, “भारत अमेरिकेवर 100 टक्के आयात शुल्क (टॅरिफ) लादतो. हा काही योग्य निर्णय नाही. आम्ही देखील येत्या 2 एप्रिलपासून त्यांच्यावर आयात शुल्क लादू. इथून पुढे जो देश आमच्यावर आयात शुल्क लादेल, त्यांच्यावर तितकाच किंवा त्याहीपेक्षा जास्त आयात शुल्क अमेरिकेकडून (Reciprocal Tariff) लादले जाईल.
हेही वाचा - US Sanctions: ट्रम्प प्रशासनाने 'या' चार भारतीय कंपन्यांवर घातले निर्बंध; इराणी तेल व्यापारात सहभागामुळे केलं लक्ष्य!
'अनेक देशांनी गेल्या अनेक दशकांपासून अमेरिकेविरोधात आयात शुल्काचा वापर केला आहे. आता अमेरिकाही त्या देशांविरोधात आयात शुल्काचा वापर करेल. कित्येक देश अमेरिकेवर भरमसाठ आयात शुल्क आकारतात. ते आपल्याकडून जितकं शुल्क वसूल करतील, तितकंच शुल्क आता आपण त्यांच्याकडून वसूल करू. भारतासारख्या देशांनी अमेरिकेकडून आयात शुल्क आकारण्याचा घेतलेला निर्णय योग्य नाही,' असे ट्रम्प म्हणाले.
महागाई कमी करणार : ट्रम्प
‘Make America affordable again,’ असं म्हणत ट्रम्प यांनी महागाई कमी करण्यासंदर्भात घोषणा दिली. याआधीचे अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांचा कारभार अमेरिकेतील महागाई वाढण्यास कारणीभूत होता, असा आरोपही ट्रम्प यांनी यावेळी म्हटलं आहे. ते म्हणाले, निवडून आल्यानंतर माझ्या हातात एक अशी अर्थव्यवस्था मिळाली आहे, जिथे आपल्यासमोर आर्थिक आपत्ती उभी आहे. महागाई सर्वोच्च बिंदूपर्यंत पोहोचली आहे. त्यातून अमेरिकेला बाहेर काढायचं आहे.
गल्फ ऑफ मेक्सिकोचं नाव बदललं
अमेरिकेच्या संसदेच्या संयुक्त अधिवेशनास संबोधित करताना अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मेक्सिकोच्या आखातीचे नाव अमेरिकेच्या आखातीचे नाव बदलण्याची घोषणा केली. ट्रम्प यांनी ‘गल्फ ऑफ मेक्सिको’चं नाव बदलल्याचं जाहीर केलं. हे आखात आता ‘गल्फ ऑफ अमेरिका’ या नावाने ओळखलं जाईल. ट्रम्प निवडून आल्यापासूनच्या त्यांच्या पहिल्या 44 दिवसांच्या कार्यकाळातील हे आणखी एक वादग्रस्त पाऊल होते.
इंग्रजी अमेरिकेची अधिकृत भाषा
डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, दोन दिवसांपूर्वी मी इंग्रजी भाषेला अमेरिकेची अधिकृत भाषा बनवण्यासंदर्भातील आदेशांवर स्वाक्षरी केली आहे.
भारत व चीनवर लादले अतिरिक्त आयात शुल्क
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठी घोषणा केली आहे. या घोषणेचे भारतीय अर्थव्यवस्थेवर परिणाम होऊ शकतात. कारण, ट्रम्प यांनी भारत व चीनवर अतिरिक्त आयात शुल्क लादलं आहे. याआधी ट्रम्प यांनी कॅनडा व मेक्सिकोवर अतिरिक्त आयात शुल्क लादलं होतं.
अमेरिकेत केवळ दोन लिंग : ट्रम्प
अमेरिकेत केवळ दोन लिंग आहेत – पुरूष व स्त्री, असं डोनाल्ड ट्रम्प म्हणाले. ट्रम्प यांनी सांगितलं की, अमेरिकन सरकारचं अधिकृत धोरण ठरलं आहे की, आपल्या देशात केवळ दोनच लिंग आहेत, स्त्री व पुरूष. साधारण महिन्याभरापूर्वीच त्यांनी ट्रान्सजेंडर महिलांना महिलांच्या क्रीडा सामन्यांमध्ये सहभागी होता येणार नसल्याचा निर्णय जाहीर केला होता.
ट्रम्प यांचा कृष्णवर्णीय, अल्पसंख्य आणि एलजीबीटीक्यू यांच्या अधिकारांच्या विरोधात राहण्याचा इतिहास राहिला आहे. आता तर त्यांनी तृतीय लिंगच नाकारले आहे. यावर अमेरिकेतील जनता आणि जगभरातील देश काय प्रतिक्रिया देतात, हे येणाऱ्या काळात समजेल.
राजकारणात येण्यापूर्वीपासूनच राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर वंशवादाचे आरोप झाले आहेत. शिवाय, स्थलांतरितांविरोधात ट्रम्प यांनी उघडलेल्या मोहिमेमुळे आणि अश्वेतगटाविरुद्ध त्यांच्या काही टिप्पण्यांमुळे या दाव्यांना आणखी चालना दिली गेली आहे. नुकतंच, अॅपलच्या iPhone मध्ये एआय फीचरमध्ये ‘वंशवादी' म्हटलं ‘ट्रम्प’ टाइप होत असल्याचं समोर आलं होतं.
सर्व परदेशी मदत थांबवण्याचा निर्णय
अमेरिकेडून वेगवेगळ्या देशांना दिली जाणारी परदेशी मदत पूर्णपणे थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयावर ट्रम्प यांनी स्वाक्षरी केली आहे. आजच्या भाषणातून ट्रम्प यांनी या निर्णयाची माहिती दिली. अमेरिकन नागरिकांचे पैसे अमेरिकेसाठी खर्च केले जातील असं ट्रम्प यांनी म्हटलं आहे. अमेरिकेच्या धोरणात ट्रम्प यांनी हा मोठा बदल केला आहे.
गोल्ड कार्ड हे ग्रीन कार्डपेक्षा उत्तम : ट्रम्प
डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'अमेरिकेचं सरकार 5 मिलियन अमेरिकन डॉलर्समध्ये अमेरिकेचं गोल्ड कार्ड देत आहे. जगभरातील प्रतिभावान व कष्टाळू लोकांना याद्वारे अमेरिकेचं नागरिकत्व मिळवण्याचा मार्ग प्रदान केला जात आहे. हे ग्रीन कार्डसारखंच आहे. काही बाबतीत ग्रीन कार्डपेक्षा उत्तम आहे.'
हेही वाचा - अमेरिकेत 'या' खेळाडूंना महिलांच्या सामन्यांत खेळता येणार नाही; ट्रम्प सरकारचा निर्णय
पोलीस अधिकाऱ्याची हत्या केल्यास मृत्यूदंडाची शिक्षा होणार
ट्रम्प म्हणाले, मी लवकरच एका आदेशावर स्वाक्षरी करणार आहे. ज्याद्वारे पोलीस अधिकाऱ्याच्या हत्या प्रकरणातील आरोपीला मृत्यूदंडाची शिक्षा दिली जाईल.
ट्रम्प यांनी मानले पाकिस्तानचे आभार
डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, अमेरिकेने अफगाणिस्तानमध्ये काही दहशतवाद्यांना पकडलं. आता त्याला अमेरिकेत आणलं जातंय. या कारवाईदरम्यान, पाकिस्तानी सरकारने आपली मदत केली. त्याबद्दल मी पाकिस्तनचे आभार मानतो.
आयात शुल्क हाच अमेरिकेच्या श्रीमंतीचा मार्ग : ट्रम्प
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, अमेरिकेला पुन्हा श्रीमंत बनवायचं आहे आणि हीच आपली जबाबदारी आहे. आपल्याला अमेरिकेला महान बनवायचं आहे. आयात शुल्कासारख्या निर्णयांचा आपल्याला आंतरराष्ट्रीय पातळीवर थोडासा त्रास होईल. परंतु, त्यामुळे अमेरिकेला श्रीमंत होण्यास मदत मिळेल. टॅरिफ हा अमेरिकेला पुन्हा श्रीमंत व महान बनवण्याचा मार्ग आहे. आम्ही जसं ठरवलं होतं तसं घडत आहे आणि लवकरच आपण श्रीमंत होऊ. थोडा गोंधळ होईल पण आम्हाला ते मान्य आहे. त्याने फार मोठा फरक पडणार नाही.