गृहयुद्धाने होरपळलेल्या आणि आर्थिक संकटात सापडलेल्या म्यानमारवर निसर्गाचे तडाखे कोसळले आहेत. शुक्रवारी म्यानमार आणि शेजारील थायलंडमध्ये झालेल्या विनाशकारी भूकंपाने संपूर्ण देश हादरला. या भूकंपात 144 नागरिकांचा मृत्यू झाला, तर 730 हून अधिक जण गंभीर जखमी झाले आहेत. प्रशासनाच्या अंदाजानुसार, तब्बल 30 लाख नागरिकांना घर सोडण्याची वेळ आली आहे.
म्यानमारमधील मंडाले या मोठ्या शहराजवळ भूकंपाचा केंद्रबिंदू होता. तब्बल सात वेळा जमिनीला हादरे बसले, त्यात सर्वात तीव्रता 7.7 रिश्टर स्केल इतकी नोंदवली गेली. भूकंपामुळे अनेक उंचच उंच इमारती क्षणात जमीनदोस्त झाल्या. ढिगाऱ्याखाली अनेक लोक अडकले असून बचाव कार्य सुरू आहे. महामार्ग तुटले, पूल कोसळले, रस्त्यांवर मोठ्या भेगा पडल्या आणि संपूर्ण परिसरात हाहाकार उडाला.या संकटामुळे म्यानमारच्या लष्करी प्रशासनाने सहा प्रांतांमध्ये आणीबाणी लागू केली आहे. मदत व बचावकार्य वेगाने सुरू असले तरी संचारबंदीमुळे आणि गृहयुद्धाच्या पार्श्वभूमीवर अडथळे येत आहेत.
बँकॉकही हादरले! बेपत्ता नागरिकांचा शोध सुरु
थायलंडची राजधानी बँकॉकदेखील भूकंपाच्या तडाख्याने कोलमडली. शहरात तीन ठिकाणी उभारल्या जात असलेल्या इमारती कोसळल्या, ज्यामुळे 10 लोकांना प्राण गमवावे लागले आणि 16 जण जखमी झाले. प्रशासनाच्या माहितीनुसार, शहरात 101 नागरिक बेपत्ता असून त्यांचा शोध सुरू आहे.
म्यानमार आणि थायलंड या दोन्ही देशांमध्ये आता मदतीचा ओघ सुरू झाला आहे. अनेक देशांनी मदतीचा हात पुढे केला असून पुनर्वसनाचे काम वेगाने सुरू आहे. मात्र, या नैसर्गिक आपत्तीने दोन्ही देशांना मोठ्या संकटात टाकले आहे.