Vladimir Putin to Visit India: रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन डिसेंबर 2025 मध्ये भारत दौऱ्यावर येणार आहेत, अशी अधिकृत पुष्टी क्रेमलिनने केली आहे. हा दौरा भारत-रशिया संबंध आणखी दृढ करण्यासाठी महत्त्वाचा मानला जात आहे. विशेष म्हणजे, अमेरिकेने भारताच्या रशियन तेल खरेदीवर 50 टक्के कर लादल्यानंतर ही बातमी समोर आली आहे. क्रेमलिनचे अधिकारी युरी उशाकोव्ह यांनी सांगितले की, पुतिन सोमवारी चीनमध्ये होणाऱ्या प्रादेशिक परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असून, डिसेंबरमधील भारत दौऱ्याच्या तयारीवर चर्चा होईल.
यापूर्वी भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनीही पुतिन यांच्या भारत दौऱ्याबाबत संकेत दिले होते. डोवाल म्हणाले होते की, रशियाशी आमचे विशेष आणि दीर्घकालीन संबंध आहेत आणि आम्ही या संबंधांना खूप महत्त्व देतो. रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह यांनी यापूर्वीच या भेटीची पुष्टी दिली होती. युक्रेन युद्ध सुरू झाल्यानंतर पुतिन यांचा हा पहिला भारत दौरा ठरणार आहे. त्यांचा शेवटचा दौरा डिसेंबर 2021 मध्ये झाला होता.
हेही वाचा - Bullet Train Network : भारतामध्ये 7000 किलोमीटरचे बुलेट ट्रेन नेटवर्क उभारणार; जपानमधून पंतप्रधान मोदींची घोषणा
अमेरिकन दबाव आणि टॅरिफ वाद -
भारत रशियाकडून मोठ्या प्रमाणात तेल खरेदी करत असल्याने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 50 टक्के अतिरिक्त टॅरिफ लादले आहे. ट्रम्प यांनी भारतावर स्वस्त रशियन तेल खरेदी करून त्याचा खुल्या बाजारात नफा मिळवण्यासाठी वापर केल्याचा आरोपही केला होता.
हेही वाचा - PM Modi Visit to Japan: जपान दौऱ्यात पंतप्रधान मोदींना मिळाली 'दारुमा बाहुली'ची खास भेट; जपानी संस्कृतीत का मानली जाते शुभ? जाणून घ्या
मोदी-पुतिन संवाद
अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पुतिन यांच्यात फोनवर चर्चा झाली होती. या वेळी युक्रेन युद्धावर, तसेच आंतरराष्ट्रीय घडामोडींवर विचारविनिमय झाला. यावेळी मोदींनी भारताची नेहमीची भूमिका स्पष्ट करताना म्हटलं होत की, शांतता आणि स्थैर्यासाठी संवादाचा मार्ग सर्वोत्तम आहे.
भारत-रशिया संबंध अधिक मजबूत होणार
पुतिन यांच्या या दौऱ्यात दोन्ही देशांमध्ये व्यापार, संरक्षण, ऊर्जा क्षेत्रात सहकार्य अधिक दृढ होण्याची शक्यता आहे. तज्ञांच्या मते, पुतिन यांच्या भेटीमुळे भारत-रशिया धोरणात्मक भागीदारीत नवा टप्पा सुरू होईल, तसेच जागतिक पटलावर भारताचे राजनैतिक स्थान अधिक बळकट होईल.