Sudan Landslide: पश्चिम सुदानमधील मारा पर्वत प्रदेशात भीषण भूस्खलनामुळे एक संपूर्ण गाव उद्ध्वस्त झाले असून किमान 1000 लोकांचा मृत्यू झाला आहे. फक्त एकच व्यक्ती जिवंत बचावली आहे. हा दुर्दैवी प्रकार 31 ऑगस्ट रोजी झालेल्या मुसळधार पावसानंतर घडला. सुदान लिबरेशन मूव्हमेंट/आर्मी (SLM/A) ने सोमवारी ही माहिती दिली.
संपूर्ण गाव मातीखाली गाडले
SLM/A चे नेते अब्दुलवाहिद मोहम्मद नूर यांनी सांगितले की हे गाव आता पूर्णपणे जमिनीत गाडले गेले आहे. हा भाग आधीच गृहयुद्धामुळे त्रस्त आहे. सुदानी सैन्य आणि अर्धसैनिक रॅपिड सपोर्ट फोर्सेस (RSF) यांच्यातील संघर्षामुळे हजारो लोक मारा पर्वतावर सुरक्षिततेच्या शोधात गेले होते.
हेही वाचा - India-US Relations: 'पाकिस्तानशी व्यवसाय करण्यासाठी भारताशी संबंध तोडले'; अमेरिकेच्या माजी सुरक्षा सल्लागारांचा ट्रम्पवर आरोप
उपासमार व आजारांनी त्रस्त लोक
या भागात आधीपासूनच अन्नधान्य आणि औषधांची मोठी टंचाई होती. लोक युद्धातून वाचण्यासाठी येथे आश्रय घेत होते. मात्र आता भूस्खलनाने त्यांची शेवटची आसही हिरावून घेतली आहे. SLM/A ने संयुक्त राष्ट्र आणि आंतरराष्ट्रीय मदत संस्थांना तातडीने मदतीचे आवाहन केले आहे. ढिगाऱ्याखाली गाडलेले मृतदेह बाहेर काढण्यासाठी आणि शक्य तितक्या जिवंत बचावलेल्या लोकांना मदत पोहोचवण्यासाठी त्वरित हस्तक्षेप करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. मृतांमध्ये मोठ्या संख्येने महिला आणि लहान मुले असल्याचे स्पष्ट झाले आहे.
हेही वाचा - Donald Trump Social Media Post : 'भारतात व्यवसाय करणे कठीण...', डोनाल्ड ट्रम्प यांच्या सोशल मिडीया पोस्टने वेधलं लक्ष
युद्धामुळे उध्वस्त सुदान
गेल्या दोन वर्षांपासून सुदानमध्ये गृहयुद्ध सुरू आहे. सैन्य आणि RSF यांच्यातील रक्तरंजित संघर्षामुळे लाखो लोकांना घर सोडावे लागले आहे. देशाच्या अर्ध्याहून अधिक लोकसंख्या उपासमारीच्या विळख्यात सापडली आहे. दारफुरमधील अल-फशीर हे शहर सध्या सततच्या हल्ल्यांमुळे पूर्णपणे उद्ध्वस्त स्थितीत आहे. मारा पर्वतावरील भूस्खलन हा संघर्षग्रस्त सुदानमधील आणखी एक शोकांतिका ठरली आहे.