Ravi Bishnoi: भारतीय क्रिकेटमधील दोन दिग्गज खेळाडू विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी टेस्ट क्रिकेटमधून अचानक निवृत्ती जाहीर केली. इंग्लंड दौर्याच्या आधी आलेल्या या निर्णयामुळे अनेक चाहते आणि माजी खेळाडूंनी बीसीसीआयवर नाराजी व्यक्त केली होती. कारण चाहत्यांना या दोन्ही महान खेळाडूंना मैदानातून शेवटचा निरोप घेताना पाहायचे होते. मात्र, आता भारतीय संघातील युवा लेगस्पिनर रवी बिष्णोईनेही या मुद्द्यावर आपली भूमिका मांडली असून त्याच्या वक्तव्याची जोरदार चर्चा रंगत आहे.
रवी बिष्णोईने एका पॉडकास्टदरम्यान रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या अचानक निवृत्तीबाबत प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला, 'विराट आणि रोहितची टेस्ट निवृत्ती खूप धक्कादायक होती. कारण लाखो चाहते आणि खेळाडू स्वतःही त्यांना मैदानातून निरोप घेताना पाहू इच्छित होते. हे दोघेही क्रिकेटच्या इतिहासातील महान खेळाडू आहेत. त्यांनी मैदानावरून शेवटचा सामना खेळून निवृत्ती घेतली असती, तर ती एक भावनिक आणि ऐतिहासिक क्षण ठरला असता.'
हेही वाचा: Rohit Sharma: BCCI चा डाव फसला? रोहित शर्मा आणि 'या' युवा स्टार्सने ब्रॉन्को टेस्टमध्ये मारली बाजी
बिष्णोईने पुढे सांगितले की, 'त्यांनी भारतासाठी जी कामगिरी केली आहे, त्याच्या जवळपास कोणीही नाही. त्यामुळे त्यांचा शेवटचा सामना मैदानावर व्हावा, अशीच सर्वांची इच्छा होती. टेस्ट क्रिकेटमधून त्यांची निवृत्ती माझ्यासाठी धक्कादायक होती. मात्र, अजून ते वनडे क्रिकेट खेळत आहेत. कदाचित त्या फॉरमॅटमध्ये त्यांना सन्मानाने निरोप घेता येईल,' असे तो म्हणाला.
भारतीय संघातील हा तरुण फिरकीपटू सध्या भारतीय टी-20 संघात सतत चांगली कामगिरी करत आहे. आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील 42 सामन्यांत त्याने 61 विकेट घेतल्या आहेत. त्याचा इकोनॉमी रेट अवघा 7.3 असून, 13 धावांत 4 विकेट ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. इतक्या प्रभावी कामगिरीनंतरही त्याला अलीकडील आशिया कप संघात स्थान मिळाले नाही. त्यामुळे नाराजी व्यक्त करण्याऐवजी त्याने अप्रत्यक्षपणे बीसीसीआयवर टोला लगावला, असे क्रिकेट तज्ज्ञांचे मत आहे.
बिष्णोईच्या या वक्तव्यामुळे एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित झाला आहे. भारतीय क्रिकेट बोर्डाने आपल्या महान खेळाडूंना त्यांच्या शेवटच्या सामन्यात योग्य निरोप द्यायला हवा का? पूर्वी एम.एस. धोनी, सुरेश रैना यांसारखे खेळाडूही अचानक निवृत्त झाले होते. त्यामुळे अनेकदा चाहत्यांना आपल्या आवडत्या क्रिकेटरचा शेवटचा सामना पाहण्याची संधी मिळालेली नाही.
विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी टेस्ट आणि टी-20 मधून निवृत्ती घेतली असली तरी अजून ते वनडे संघात सक्रिय आहेत. येत्या मोठ्या स्पर्धांमध्ये ते मैदानात उतरणार आहेत. त्यामुळे किमान या फॉरमॅटमधून त्यांना सन्मानाने निरोप देण्याची संधी मिळेल, अशी आशा बिष्णोईने व्यक्त केली.
भारतीय क्रिकेटचे हे दोन्ही महानायक आजही लाखो चाहत्यांच्या हृदयात खास स्थान राखून आहेत. पुढील काळात बीसीसीआय त्यांना ‘फेअरवेल मॅच’ देते का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.