Pakistan Train Hijack : बलुचिस्तानमध्ये जाफर एक्सप्रेस ट्रेनचे अपहरण हे भारताने केलेले कारस्थान असल्याचा आरोप पाकिस्तानने केला आहे. या अपहरणामागे भारताचा हात असल्याचे पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. ट्रेनमधील सर्व प्रवाशांना वाचवण्यात आले आहे आणि बलुच लिबरेशन आर्मीच्या बंडखोरांना मारण्यात आले आहे, असा दावाही परराष्ट्र कार्यालयाने दोन दिवसांपूर्वीच केला होता. मात्र, बलोच हल्लेखोरांकडून अद्याप लढाई संपली नसल्याचे सांगण्यात येत आहे. यादरम्यानच, हाती काहीच येत नसल्याचे पाकिस्ताने पुन्हा नैराश्यातून भारतावर आरोप करणे सुरू केले आहे.
पाकिस्तानने भारतावर जाफर एक्सप्रेस ट्रेनचे अपहरण केल्याचा आरोप केला. जाफर एक्सप्रेस ट्रेनवरील दहशतवादी हल्ल्यामागे भारताचा हात असल्याचे पाकिस्तानच्या परराष्ट्र कार्यालयाने म्हटले आहे. याशिवाय, पाकिस्तानने असाही आरोप केला की, हा हल्ला परदेशातील दहशतवादी संघटनेच्या नेतृत्वाखाली करण्यात आला. पाकिस्तानच्या परराष्ट्र कार्यालयाचे प्रवक्ते शफकत अली खान यांनी इस्लामाबादमध्ये साप्ताहिक पत्रकार परिषदेत सांगितले की, जाफर एक्सप्रेस हल्ल्यातील बचाव कार्य पूर्ण झाले आहे आणि गुप्तचर माहितीवरून असे दिसून आले आहे की, दहशतवादी अफगाणिस्तानातील त्यांच्या सहकाऱ्यांच्या संपर्कात होते.
हेही वाचा - 'अपहरण केलेली ट्रेन सोडवली' हे साफ खोटं! ओलिसांची सुटका झालीये तर फोटो दाखवा; पाकिस्तानी सैन्याला बलुच बंडखोरांचे आव्हान
अफगाणिस्तानमध्ये तालिबान आल्यापासून पाकिस्तानमध्ये अस्थिरता वाढल्याचा आरोप पंतप्रधान शहबाज शरीफ यांचे सल्लागार राणा सनउल्लाह यांनी म्हटले आहे. पूर्वी बंडखोरांना रसद, प्रशिक्षण आणि दारूगोळा मिळत नव्हता. पण आता त्यांना या सर्व सुविधा मिळत असल्याचे ते म्हणाले. हे सर्व भारतामुळे होत आहे. या बंडखोरांच्या तावडीतून ओलिसांना सोडवण्याचे काम सुरू आहे. पण बंडखोरांनी काही सुसाईड बॉम्बर्स त्यांच्या जवळ बसवल्याने कारवाई करता येत नसल्याची माहिती सनउल्लाह यांनी दिली.
ट्रेन मोकळी केल्यानंतर पाकिस्तानने केला दावा
जाफर एक्सप्रेस ट्रेनमध्ये ठेवण्यात आलेल्या ओलिसांना मुक्त केल्याचा दावा केल्यानंतर पाकिस्तानच्या परराष्ट्र कार्यालयाने हे विधान केले आहे. बुधवारी रात्री उशिरा, पाकिस्तानने दावा केला की त्यांनी सर्व अपहरणकर्त्यांची सुटका केली आहे आणि बलुचिस्तान लिबरेशन आर्मी (बीएलए) च्या 33 बंडखोरांना ठार मारले आहे. या ट्रेनमध्ये 400 हून अधिक लोक होते, ज्यात 100 हून अधिक पाकिस्तानी लष्करी जवानांचा समावेश होता. तथापि, या काळात 21 प्रवासी आणि 4 फ्रंटियर कॉर्प्स सैनिकांचा मृत्यू झाल्याचे पाकिस्तानचे म्हणणे आहे. मात्र, बलोच हल्लेखोरांकडून येणाऱ्या अपडेटस् याच्यापेक्षा पूर्णपणे वेगळ्या आहेत. त्यातच पाकिस्ताने भारतासह अफगाणिस्तानातील तालिबानवरही हा हल्ला घडवून आणल्याचा आरोप केला.
या सर्व वक्तव्यांमुळे दहशतवाद आणि दहशतवादी फॅक्टरी असणाऱ्या पाकिस्तान स्वतःच पेरलेल्या विषवल्लीमुळे बेजार झालेला दिसत आहे. आतापर्यंत जे दहशतवादी पाकिस्तानने पोसले. त्यातील काही आता त्यांच्या जीवावर उठले आहेत. त्यातच स्वतंत्र बलूचिस्तान आणि स्वतंत्र पंजाब-सिंध ही मागणी 70 वर्षांपासून सुरू आहे. या दोन्ही भागातील लोकांना स्वतंत्र राष्ट्राचा दर्जा हवा आहे. मंगळवारी बलूचिस्तानमधील बंडखोर बलोच लिबरेशन आर्मीने (BLA) जफर एक्सप्रेस हायजॅक केली. पाकिस्तानवर मोठी नामुष्की ओढावली. ट्रेन हायजॅकमागे भारत आणि अफगाणिस्तानचा हात असल्याचा कांगावा पाकिस्तानने केला आहे. अर्थात पाकिस्तान किती खोटारडा आहे हे जागतिक मंचावर अनेकदा उघड झाले आहे.
हेही वाचा - 'आर्टिकल 370 हटवलं, निवडणुका झाल्या; आता पाकव्याप्त काश्मीर परत मिळायचाय..,' लंडनमध्ये जयशंकर यांचं मोठं विधान, जगाच्या भुवया उंचावल्या
पंतप्रधानांच्या सल्लागाराचा कांगावा
पंतप्रधान शहबाज शरीफ यांचे सल्लागार राणा सनाउल्लाह यांनी कोणताही पुरावा न देता या हल्ल्यामागे भारत आणि अफगाणिस्तान असल्याचा कांगावा केला आहे. आपल्या गुप्तहेर खात्याचे अपयश झाकण्यासाठी पाकिस्तान आता खोट्या बातम्या पेरण्याचा प्रयत्न करत आहे. एका टीव्ही चॅनलला दिलेल्या मुलाखतीत सनाउल्लाह यांनी या हल्ल्यामागे तहरीक-ए-तालिबान ही संघटना असल्याचे म्हटले आहे. ही संघटना बलूच आर्मीला रसद पुरवत असल्याचे सनउल्लाहचे म्हणणे आहे.
बंडखोर अफगाणिस्तानच्या संपर्कात असल्याचा दावा
परराष्ट्र कार्यालयाच्या प्रवक्त्याने सांगितले: "इंटरसेप्टेड कॉल्सवरून हल्लेखोर आणि अफगाणिस्तानमधील संबंधांची पुष्टी झाली." "अफगाणिस्तानात दहशतवाद्यांना सुरक्षित आश्रयस्थाने आहेत आणि पाकिस्तानने वारंवार अफगाणिस्तानच्या अंतरिम सरकारला बीएलए सारख्या गटांना दहशतवादासाठी त्यांच्या भूमीचा वापर करण्यापासून रोखण्याची विनंती केली आहे," असे ते म्हणाले.
हेही वाचा - Video Viral: पाकिस्तानी पंतप्रधानांची अजब देहबोली! मूठ आपटून म्हणाले, 'भारताला हरवलं नाही तर माझं नाव शाहबाज शरीफ नाही!'
अफगाणिस्तानसोबत माहिती शेअर केली
त्यांनी असेही नमूद केले की पाकिस्तान सार्वजनिक व्यासपीठांवर राजनैतिक संपर्कांवर चर्चा करत नाही, परंतु अशा घटनांचे तपशीलवार पुरावे अफगाणिस्तानसोबत सातत्याने शेअर करत आहे. त्यांनी यावर भर दिला की पाकिस्तानचे प्राथमिक लक्ष अफगाणिस्तानशी मैत्रीपूर्ण आणि जवळचे संबंध मजबूत करण्यावर आहे, तर दहशतवादविरोधी कारवाया आंतरराष्ट्रीय भागीदारांसोबत सहकार्याचे एक महत्त्वाचे क्षेत्र आहे.
पाकिस्तानी सैन्याने धमकी दिली
या कारवाईनंतर, इंटर-सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन्सचे महासंचालक लेफ्टनंट जनरल अहमद शरीफ चौधरी म्हणाले की, जाफर एक्सप्रेस घटनेने खेळाचे नियम बदलले आहेत. तो म्हणाला, "ज्यांनी हे कृत्य केले आहे, त्याला शोधून न्याय दिला जाईल." ते म्हणाले की, दहशतवाद्यांचा इस्लाम, पाकिस्तान आणि बलुचिस्तानशी काहीही संबंध नाही. एका निवेदनात, आयएसपीआरने म्हटले आहे की गुप्तचर अहवालांनी स्पष्टपणे पुष्टी केली आहे की हा हल्ला अफगाणिस्तानातून कार्यरत असलेल्या दहशतवादी टोळीच्या नेत्यांनी नियोजित आणि निर्देशित केला होता, जे संपूर्ण घटनेदरम्यान दहशतवाद्यांशी थेट संपर्कात होते.
हेही वाचा - 'पाकिस्तान निव्वळ थापा मारत आहे!,' जाफर एक्सप्रेस अपहरणासंदर्भात बलुच चळवळीतील कार्यकर्त्याचा आरोप
हे सर्व भारत घडवून आणत आहे, यात कोणतीच शंका नाही. भारत सर्व प्रकारची मदत करत आहे आणि अफगाणिस्तानमध्ये या बंडखोरांना सुरक्षित आश्रय मिळत आहे. तिथे बसूनच अशा हल्ल्याचे प्लॅनिंग करण्यात येते. बलोच बंडखोरांकडे कोणताही राजकीय अजेंडा नाही. त्यांना केवळ लोकांच्या हत्या घडवून आणायच्या आहेत, असे बेताल वक्तव्य सनउल्लाह यांनी केले. पाकिस्तानी लष्कर बलूचमधील महिला, मुलं, तरुणांवर किती अत्याचार करते हे सनउल्लाह यांना सांगावेसे वाटत नाही. यासाठी कित्तेक वर्षांपासून बलुची लोक आवाज उठवत आहेत. पण हल्ला झाला की, भारताकडे बोट दाखवून मोकळं होण्याचा एककलमी कार्यक्रम पाकिस्तानकडून सुरू असल्याचे समोर आले आहे.