Train Hijack In Pakistan : नैऋत्य पाकिस्तानमध्ये जाफर एक्सप्रेसवर बलुचिस्तानच्या स्वातंत्र्याची मागणी करणाऱ्या प्रमुख गटाने हल्ला केला. त्यात ट्रेन चालक जखमी झाला. बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आणि पुरुष प्रवाशांना ओलीस ठेवल्याचे म्हटले आहे. परंतु, पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी अद्याप याला दुजोरा दिलेला नाही. सुरक्षा दलांनी परिस्थितीला प्रतिसाद देत बलुचिस्तानमध्ये आपत्कालीन उपाययोजना राबवण्यात आल्या आहेत.
मंगळवारी नैऋत्य पाकिस्तानमध्ये शेकडो प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या प्रवासी ट्रेनवर बलुचिस्तानच्या स्वातंत्र्याची मागणी करणाऱ्या प्रमुख गटाने गोळीबार केला, ज्यामध्ये एक ट्रेन चालक जखमी झाला, असे पोलीस आणि रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले. नऊ बोग्यांमध्ये सुमारे 400 प्रवाशांसह जाफर एक्सप्रेस पाकिस्तानच्या नैऋत्य बलुचिस्तान प्रांतातील क्वेटा येथून खैबर पख्तूनख्वा येथील पेशावरला जात असताना तिच्यावर गोळीबार करण्यात आला, असे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, ट्रेनमधील लहान मुले आणि महिलांना बलुची आर्मीने सोडून दिले आणि केवळ 120 पुरुषांना ओलीस ठेवण्यात आले आहे.
हेही वाचा - God Is Real : देव खरंच आहे..! हार्वर्डचे शास्त्रज्ञ डॉ. विली सून यांचा दावा; हे सिद्ध करणारे गणितीय सूत्र उलगडले
पाकिस्तानमधील परिस्थिती दिवसंदिवस गंभीर होत आहे. आता पाकिस्तानमधील बलोच आर्मीने संपूर्ण ट्रेनच हायजॅक केली. रेल्वेचे अपहरण केल्यानंतर बलोच आर्मीने महिला, मुले यांना सोडून दिले. माहितीनुसार, बीएलएची फिदायन युनिट, मजीद ब्रिगेड या मोहिमेचे नेतृत्व करत आहे. ज्यामध्ये फतेह पथक, एसटीओएस आणि गुप्तचर शाखा जिराब यांचा समावेश आहे.
अशी केली ट्रेन हायजॅक
रेल्वे हायजॅक केल्यानंतर बलोचिस्तान लिबरेशन आर्मीने वक्तव्य दिले आहे. आमच्या सैनिकांनी आधी ट्रेनचे ट्रॅक बॉम्बने उडवले. त्यामुळे रेल्वे थांबली. रेल्वे थांबताच्या आमच्या सैनिकांनी ट्रेन संपूर्ण नियंत्रण घेतले. पाकिस्तानी लष्कर काही कारवाई करण्याचा विचार करत असेल तर ओलीस ठेवलेले 120 प्रवाशी वाचणार नाही.
बलोच आर्मीने पाकिस्तान लष्कराला गंभीर इशारा दिला आहे. आमच्याविरोधात लष्करी कारवाई केली तर त्याचे गंभीर परिणाम होतील. आमच्यावर हल्ला झाला तर सर्व 120 प्रवाशी मारले जातील. त्याची संपूर्ण जबाबदारी पाकिस्तानी लष्काराची असणार आहे.
हेही वाचा - 'पाकिस्तान पुन्हा तुटेल.. पुन्हा 1971 सारखीच स्थिती' संसदेत भारत-बांग्लादेशचा उल्लेख करत पाक खासदारानं व्यक्त केली भीती
एका निवेदनात, बलुचिस्तान लिबरेशन आर्मी (बीएलए) या बलुचिस्तानच्या स्वातंत्र्याची मागणी करणाऱ्या प्रमुख गटाने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आणि सांगितले की त्यांनी सुरक्षा दलांसह ट्रेनमधील लोकांना ओलीस ठेवले आहे. मात्र, प्रांतीय सरकार किंवा रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी ओलीस ठेवल्याची पुष्टी केलेली नाही. रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले की, बलुचिस्तानच्या बोलन जिल्ह्यातील मुश्काफ भागात ही घटना घडली, तेव्हा सुरक्षा दल घटनास्थळी पोहोचले होते.
बलुचिस्तान सरकारने आपत्कालीन उपाययोजना लागू केल्या आहेत आणि परिस्थिती हाताळण्यासाठी सर्व संस्थांना तैनात करण्यात आले आहे, असे सरकारी प्रवक्ते शाहिद रिंद यांनी सांगितले. बलुचिस्तानच्या स्वातंत्र्याची मागणी करणाऱ्या गटांकडून दशकांपासून सुरू असलेल्या बंडखोरीमुळे या प्रदेशातील सरकार, सैन्य आणि चिनी हितसंबंधांवर वारंवार हल्ले होत आहेत आणि खनिज समृद्ध संसाधनांमध्ये वाटा मागितला जात आहे.
हेही वाचा - पाकिस्तान बनला 'आतंकिस्तान'.. जागतिक दहशतवाद निर्देशांकात दुसऱ्या स्थानावर पोहोचण्याचा 'विश्वविक्रम'
बलुचिस्तान का स्वतंत्र होऊ इच्छितो?
बीएलए बलुचिस्तानसाठी स्वातंत्र्य मागणी करणारा गट आहे. पाकिस्तानच्या सरकारशी दशकांपासून लढणाऱ्या अनेक वांशिक बंडखोर गटांपैकी हा सर्वात मोठा गट आहे. कारण, पाकिस्तानी सरकारकडून बलुचिस्तानच्या समृद्ध वायू आणि खनिज संसाधनांना अक्षरशः ओरबाडून घेतले जात आहे. पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेचा मोठा हिस्सा बलुचिस्तानमधून येतो. मात्र, पाकिस्तानी सरकार बलुचिस्तानसाठी फारसे काही देत नाही. बलुचिस्तानमध्ये वेगळ्या वंशाचे आणि अल्पसंख्य लोक राहत असणे, हे याचे कारण आहे. हे बलुची लोकांच्या रोषाचे एक मुख्य कारण आहे. पाकिस्तानी सरकारकडून हे अन्याय्य शोषण होत असल्याकारणाने अनेक दशकांपासून बलुची लोकांकडून स्वतंत्र बलुचिस्तानची मागणी केली जात आहे. यामुळे येथील लोक अधूनमधून उठाव करत राहतात आणि पाकिस्तानपासून वेगळे होण्याची इच्छा व्यक्त करतात. तसेच, हे लोक त्यांच्या हिताच्या असलेल्या विविध हेतूंसाठी नेहमी भारताकडे मदतीच्या अपेक्षेने पाहतात.
काही दिवसांपूर्वी बलोच गटांनी पाकिस्तान आणि चीनविरोधात नव्याने हल्ला करण्याची घोषणा केली होती. बलुच गटाने अलीकडेच सिंधी फुटीरतावादी गटांसोबत युद्ध सराव पूर्ण केला होता.
1971 साली तत्कालीन भारतीय राज्यकर्त्यांनी मुत्सद्देगिरीचा वापर करून बांगलादेशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. त्यामुळे भारत-पाकिस्तान सीमेवर नेहमी सुरू असलेल्या पाकिस्तानच्या कुरघोड्यांना काही प्रमाणात चाप बसला. आता बलुचिस्तान स्वतंत्र झाल्यास पाकिस्तानी अर्थव्यवस्थेचे कंबरडेच मोडेल. अर्थातच, असे होणे भारतासाठी विविध दृष्टीकोनांमधून हिताचे ठरेल.