Pakistan Army Is lying : पाकिस्तानी लष्कराने एक निवेदन जारी करून म्हटले आहे की, त्यांच्या विशेष दलाच्या एसएसजी कमांडोंनी बीएलएच्या बंडखोरांच्या तावडीतून एक्सप्रेस सोडवण्यासाठीची कारवाई यशस्वीपणे पार पाडली. तसेच, ओलिसांची सुटकाही केली आणि 33 बंडखोरांना यमसदनी धाडलं.. मात्र, आता बलुच लिबरेशन आर्मीने एक निवेदन जारी करून पाकिस्तानी सैन्याचे सर्व दावे खोटे असल्याचे म्हटले आहे. बलुच लिबरेशन आर्मीने 'ओलिसांची सुटका झालीये तर फोटो दाखवा' असे थेट आव्हान पाकिस्तानी लष्कराला दिले आहे. पाकिस्तानच्या सैन्याने केलेल ऑपरेशन पूर्ण झाले असेल, तर त्याची छायाचित्रे प्रसिद्ध करण्याचे आव्हान बीएलएने दिले आहे. यामुळे पाकिस्तानी सरकार आणि त्यांची लष्करी सेना यांची इतक्या गंभीर वातावरणातही हास्यास्पद स्थिती झाली आहे.
हेही वाचा - 'पाकिस्तान निव्वळ थापा मारत आहे!,' जाफर एक्सप्रेस अपहरणासंदर्भात बलुच चळवळीतील कार्यकर्त्याचा आरोप
सोडवलेल्या ओलिसांचे फोटो का प्रसिद्ध करत नाहीत?
बलुच लिबरेशन आर्मी (बीएलए) ने दावा केला आहे की पाकिस्तानी सैन्याने कोणतीही लढाई जिंकलेली नाही आणि 100 हून अधिक पाकिस्तानी सैनिक अजूनही त्यांच्या ताब्यात आहेत. बलुच लिबरेशन आर्मीने एक प्रेस रिलीज जारी केली आहे. यामध्ये पाकिस्तानी लष्कराला आव्हान देण्यात आलं आहे की, जर पाकिस्तानी लष्कराने खरोखरच ओलिसांची सुटका केली असेल तर, ते त्या ओलिसांचे फोटो का प्रसिद्ध करत नाहीत?
तज्ज्ञ काय म्हणतात?
काल रात्री उशिरा ऑपरेशन संपवल्याचा दावा करणाऱ्या पाकिस्तानी सैन्याचा बलुच लिबरेशन आर्मीच्या दाव्यानंतर पर्दाफाश होत आहे. पण खरोखरच पाकिस्तानी लष्कराने अद्याप एकाही ओलिसाचा फोटो प्रसिद्ध केलेला नाही. पाकिस्तानी सैन्याच्या दाव्यावर तज्ज्ञ आधीच प्रश्नचिन्ह उपस्थित करत होते. बलुच लिबरेशन आर्मीने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, "बलुचिस्तानच्या बोलानमधील ऑपरेशन संपवण्याचा पाकिस्तान आयएसपीआरचा दावा खोटा आहे आणि लढाई सुरूच आहे. पाकिस्तानी सैन्याने अद्याप 100 हून अधिक पाकिस्तानी सैनिकांची नावे आणि फोटो सार्वजनिकरित्या शेअर केलेले नाहीत. तसेच, ते ठार केल्याचा दावा करत असलेल्या 33 बलुच सैनिकांची नावे किंवा फोटो देखील जाहीर केलेले नाहीत. मृतांची संख्या लपवण्याची पाकिस्तानी सैन्याची परंपरा सुरूच आहे. आंतरराष्ट्रीय माध्यमांनी आयएसपीआरच्या शब्दांवर आंधळेपणाने विश्वास ठेवण्याऐवजी चौकशी करण्याची गरज आहे."
'त्यांना बलुच लिबरेशन आर्मीने स्वतःच सोडले होते,' असं म्हटलंय बीएलएच्या निवेदनात
बीएलएच्या निवेदनात म्हटले आहे की, "अनेक आघाड्यांवर अजूनही भयंकर लढाई सुरू आहे आणि पाकिस्तानी सैन्याचे मोठे नुकसान झाले आहे. बीएलएने म्हटले आहे की, पाकिस्तानी सैन्याने केलेला विजयाचा दावा खोटा आहे. 'खोटे बोलणे' ही पाकिस्तानची प्रवृत्तीच आहे, हे त्यांच्या स्वभावातच आहे. ते नेहमीच खोटं बोलतात. ज्या ओलिसांच्या सुटकेचा पाकिस्तानी सैन्याकडून प्रचार केला जात आहे, त्यांना प्रत्यक्षात बलुच लिबरेशन आर्मीने स्वतःच सोडले होते." याशिवाय, बीएलएने म्हटले आहे की, "बीएलए पाकिस्तानी सैन्याला सत्य स्वीकारण्याचे आव्हान देते. जर सैन्याचा विजयाचा दावा खरोखरच खरा असेल तर त्यांनी स्वतंत्र पत्रकारांना युद्धग्रस्त भागात येऊ द्यावे. जेणेकरून, जगाला स्वतःच्या डोळ्यांनी वास्तव पाहता येईल."
हेही वाचा - Pakistan Train Hijack : रेस्क्यू ऑपरेशन संपल्यावर माजी पाकिस्तानी सैन्य अधिकाऱ्याचा 100 जवान मारले गेल्याचा दावा; आर्मीने सांगितले फक्त 4
पाकिस्तानचे सैन्य खोटे बोलत आहे का?
पाकिस्तानी सैन्याने दावा केला की, ऑपरेशन संपले आहे आणि सर्व 155 ओलिसांची सुटका करण्यात आली आहे. 33 बलुच बंडखोरांना ठार मारण्यात आल्याचा दावा लष्कराने केला आहे. पण बलुच बंडखोरांनी असा दावा केला आहे की, पाकिस्तानी सैन्य खोटे बोलत आहे. बीएलएचा दावा आहे की 154 सैनिक अजूनही ओलिस आहेत आणि ते सर्व त्यांच्या ताब्यात आहेत. त्यामुळे प्रश्न असा उद्भवतो की, पाकिस्तानी सैन्य स्वतःची अब्रू वाचवण्यासाठी खोटे बोलत आहे का? पाकिस्तान रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे की जाफर एक्सप्रेसमध्ये सुमारे 750 प्रवाशांनी तिकिटे बुक केली होती. पण ट्रेन क्वेट्टाहून सुमारे 450 लोकांना घेऊन निघाली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याच ट्रेनमध्ये 200 हून अधिक सुरक्षा कर्मचारीही प्रवास करत होते.
हेही वाचा - Pakistan Train Hijack : 'बलुचिस्तानच्या जन्माची वेळ आलीय..' पाकिस्तानी सैन्याचं मनोबल खचलंय - निवृत्त मेजर जनरल जी. डी. बक्षी