Russia-Ukraine War: 24 फेब्रुवारी 2022 रोजी सुरू झालेले रशिया-युक्रेन युद्ध 42 महिन्यांचा टप्पा पार करत असून त्याच्या समाप्तीची चिन्हे अद्याप दिसत नाहीत. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या युद्धावर तोडगा काढण्यासाठी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांची भेट घेतली असली, तरी दोन्ही देशांमधील हल्ल्यांची मालिका सुरूच आहे. रविवार, 24 ऑगस्ट रोजी युक्रेनने रशियावर मोठा ड्रोन हल्ला केला. योगायोगाने हा दिवस युक्रेनचा स्वातंत्र्यदिन होता. या हल्ल्यातील काही ड्रोन कुर्स्क अणुऊर्जा प्रकल्पाजवळ पोहोचले. रशियाच्या हवाई संरक्षण यंत्रणेने हे ड्रोन पाडले, परंतु झालेल्या स्फोटामुळे प्रकल्पाला फटका बसला.
हेही वाचा - Russia Ukraine : पाश्चिमात्य देश युक्रेनसोबतच्या शांतता चर्चेत खोडा घालताहेत.. युद्धबंदीच्या विलंबावर रशियाचा दावा; ट्रम्प यांच्यावर टीका
कुर्स्क प्रकल्पाचे नुकसान
या हल्ल्यात कुर्स्क अणुभट्टी क्रमांक-3 ची कार्यक्षम क्षमता 50 टक्क्यांनी कमी झाली. शिवाय एका सहाय्यक ट्रान्सफॉर्मरचेही नुकसान झाले, ज्यामुळे वीज निर्मितीत घट झाली. मात्र, रशियन संरक्षण मंत्रालयाने स्पष्ट केले की या भागातील रेडिएशन पातळी सामान्य असून कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, रशियाने विविध भागात 12 पेक्षा जास्त ठिकाणी 95 युक्रेनियन ड्रोन पाडले.
हेही वाचा - Israel Attack On Yemen : भयंकर ! घरे हादरली आणि खिडक्यांच्या काचा फुटल्या...; इस्रायलचा येमेनच्या राजधानीवर हवाई हल्ला
टर्मिनलला मोठी आग
ड्रोन हल्ल्यामुळे रशियाच्या उत्तर लेनिनग्राड प्रदेशातील उस्ट-लुगा इंधन निर्यात टर्मिनलला मोठी आग लागली. त्यामुळे पुलकोवो विमानतळासह अनेक विमानतळांवरील उड्डाणे थांबवावी लागली. याशिवाय समारा प्रदेशातील सिझरान औद्योगिक केंद्रावर झालेल्या हल्ल्यात एक तरुण जखमी झाला. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे. युक्रेनच्या या हल्ल्यामुळे युद्ध पुन्हा एकदा तीव्र झाले असून त्याचा आंतरराष्ट्रीय सुरक्षेवर गंभीर परिणाम होऊ शकतो, अशी भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.