नवी दिल्ली : महाराष्ट्रातल्या सत्ता स्थापनेचे सूत्र गुरुवारी रात्री ठरेल, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी व्यक्त केला. दिल्लीतील पक्षाच्या मुख्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत अजित पवारांनी लवकरच सत्ता स्थापनेचे सूत्र ठरेल, अशी ग्वाही दिली. सत्ता स्थापनेचे सूत्र ठरवण्यासाठी देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे या दोघांसोबत केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना भेटणार असल्याचे अजित पवारांनी सांगितले. ही भेट रात्री होईल. यावेळी चर्चा होईल. चर्चेतून कोण मुख्यमंत्री होणार, कोण कोणत्या खात्याचे मंत्रिपद सांभाळणार सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील, असे अजित पवार म्हणाले.
सध्या राष्ट्रवादी काँग्रेस हा एक प्रादेशिक पक्ष आहे. राष्ट्रवादीला गमावलेला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा लवकरच परत मिळवून देणार आहे. यासाठी दिल्लीत विधानसभेची निवडणूक लढवणार असल्याचे संकेत अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचे राज्यसभेतील खासदार प्रफुल पटेल यांनी दिले. नोंदणीकृत पक्ष असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस कोणत्याही राज्यातून निवडणूक लढवण्यास स्वतंत्र आहे; असे अजित पवार याप्रसंगी म्हणाले.
अजित पवारांच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे
- प्रत्येक राज्यात आपले आमदार जिंकू शकतात - अजित पवार
- प्रफुल्ल पटेलांकडून दिल्लीमध्ये निवडणूक लढवण्याचे संकेत
- 'शाहांसोबत आम्ही तिघं एकत्र मंत्रिमंडळाबाबत चर्चा करु', अजित पवार यांचं वक्तव्य
महाराष्ट्र विधानसभा 2024 निवडणुकीचा निकाल
- एकूण 288 जागा
- महायुती 230 जागांवर विजय
- भाजपा 132 जागांवर विजय
- शिवसेना 57 जागांवर विजय
- राष्ट्रवादी काँग्रेस 41 जागांवर विजय
- महाविकास आघाडी 46 जागांवर विजय
- उद्धव ठाकरे गट 20 जागांवर विजय
- काँग्रेस 16 जागांवर विजय
- शरद पवार गट 10 जागांवर विजय
- इतर 12 जागांवर विजय
जिंकून आलेल्या इतर बारा जणांपैकी पाच जणांनी भाजपाला तर तीन जणांनी शिवसेनेला पाठिंबा जाहीर केला आहे. यामुळे भाजपाचे संख्याबळ 137 आणि शिवसेनेचे संख्याबळ 60 झाले आहे. महायुतीचे एकूण संख्याबळ 238 वर पोहोचले आहे.