Chhatishgarh Bilaspur School Blast: छत्तीसगडमधील बिलासपूर शहरातील एका खाजगी शाळेच्या शौचालयात झालेल्या स्फोटाप्रकरणी आठवीच्या चार विद्यार्थी-विद्यार्थिनींना ताब्यात घेण्यात आले आहे. या घटनेत चौथीच्या वर्गातील एक विद्यार्थिनी जखमी झाली. पोलिस अधिकाऱ्यांनी मंगळवारी ही माहिती दिली. पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, आरोपी विद्यार्थ्यांनी कथितपणे सोडियमची ऑनलाइन खरेदी केली होती. शाळेतील एका महिला शिक्षिकेवर हे विद्यार्थी चिडून होते आणि त्यांनी शिक्षिकेला लक्ष्य करण्याचा कट रचला.
शहरातील एका खाजगी शाळेच्या शौचालयात झालेल्या स्फोटात चौथी इयत्तेत शिकणारी मुलगी भाजली गेली. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. बिलासपूर जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक रजनीश सिंह म्हणाले की, शाळेतील सीसीटीव्ही फुटेजची चौकशी आणि तपासणी दरम्यान, आठवीच्या तीन मुलींसह एकूण पाच विद्यार्थ्यांचा सहभाग यात असल्याचे उघडकीस आले, त्यानंतर त्यापैकी चौघांना ताब्यात घेण्यात आले.
हेही वाचा - Bengaluru: कुंपणानेच शेत खाल्लं तर..? 17वर्षीय बलात्कार पीडिता तक्रार नोंदवायला गेली.. पण पोलिसानेच पुन्हा केला बलात्कार
ऑनलाइन व्हिडिओ पाहून शिक्षिकेला लक्ष्य करण्याचा केला प्लॅन
सिंह पुढे म्हणाले की, आणखी एक विद्यार्थिनी तिच्या नातेवाईकाच्या घरी गेली होती आणि तिला अद्याप ताब्यात घेतलेले नाही. त्यांनी असेही सांगितले की, प्राथमिक तपासात असे दिसून आले आहे की पाचही विद्यार्थी त्यांच्या शिक्षिकेवर चिडून होते आणि या शिक्षिकेला लक्ष्य करण्यासाठी त्यांनी स्फोटाची योजना आखली होती. ऑनलाइन व्हिडिओ पाहून त्यांनी हा प्लॅन केला होता. व्हिडिओमध्ये सोडियम धातू पाण्याच्या संपर्कात आल्यावर त्याचा स्फोट होत असल्याचे दिसून आले होते. त्यानुसार, हा कट रचण्यात आला.
विद्यार्थिनी नव्हे तर, शिक्षिका होती 'लक्ष्य'
त्या विद्यार्थ्यांपैकी एकाने त्याच्या नातेवाईकाच्या आयडीचा वापर करून ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्मवरून सोडियम धातू खरेदी केला, असे अधिकाऱ्याने सांगितले. त्यांनी शाळेत सोडियम धातू आणला आणि तो वॉशरूममधील टाकीच्या बाहेर ठेवला. त्यांनी पुढे सांगितले की, दुर्दैवाने, पीडित मुलगी, जी या योजनेचे 'लक्ष्य' नव्हती, ती शौचालयात गेली. तिने फ्लश वापरला तेव्हा त्याचा स्फोट झाला आणि ती जखमी झाली.
स्फोटाचा आवाज ऐकून, परीक्षेत व्यस्त असलेले शिक्षक शौचालयात धावले आणि त्यांनी त्याचा दरवाजा तोडला, असे सिंह म्हणाले. तिथे त्यांना मुलगी जमिनीवर जखमी अवस्थेत पडलेली आढळली. त्यांनी सांगितले की, ताब्यात घेतलेल्या चारही विद्यार्थ्यांना बाल न्यायालयात हजर करण्यात आले, जिथून त्यांना बालसुधारगृहात पाठवण्यात आले. या गुन्ह्यात सहभागी असलेल्या आणखी एका मुलीला लवकरच ताब्यात घेतले जाईल, असे सिंग म्हणाले. त्यांनी सांगितले की, या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. या घटनेबद्दल जाणून सर्वांना धक्का बसला आहे.
हेही वाचा - Mahakumbh Mela 2025 : 'आई कुंभमेळ्यात हरवली', हे ऐकताच मुलगा थेट पोहोचला प्रयागराजला; अन् बापाचं भयंकर कृत्य उघडकीस!