विजय चिडे. प्रतिनिधी. जालना: ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी जागतिक मैत्री दिन साजरा केला जातो. मात्र, याच मैत्री दिनाच्या दिवशी एक अशी घटना घडली, ज्याची कोणी कल्पनाही करू शकत नाही. मद्यपान करण्यासाठी पैसे न दिल्याने मित्राचा राग अनावर झाला आणि त्याने चक्क स्वत:च्याच मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला. ही घटना जालना शहरात घडल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
हेही वाचा: Madhuri Elephant : महादेवी हत्तीण 'वनतारा'त दाखल; पहिला फोटो पाहून नेटकरी आक्रमक
नेमकं प्रकरण काय?
ही घटना रविवारी दुपारी नूतन वसाहत भागात घडली. मद्यपान करण्यासाठी पांडुरंग थोरातने शौकतकडे पैसे मागितले. मात्र, शौकतने पांडुरंग थोरातला पैसे देण्यास नकार दिला. त्यामुळे, पांडुरंग थोरातने हातात असलेल्या चाकूने थेट शौकतच्या डोक्यावर हल्लाबोल केला. दुर्दैव म्हणजे, हा चाकू इतक्या ताकदीने खुपसला गेला की, या चाकूला शौकतच्या डोक्यात अडकून बसला. मात्र, इतकं होऊनही शौकत स्वत: चाकू अडकलेल्या अवस्थेत जिल्हा सामान्य रुग्णालयात पोहोचला. यानंतर, डॉक्टरांनी क्षणाचाही विलंब न करता तात्काळ सर्जरी करून चाकू बाहेर काढला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी, पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. या घटनेमुळे, परिसरात संतापाची लाट उसळली आहे.