यवतमाळ: पैसा... कमवू तितका आणि मिळेल तितका कमीच असतो नाही का ? पण हाच पैसा मिळवण्याच्या नादात आपण अमानुषतेची परिसीमा गाठतोय हेही खरंच... असंच काहीसं यवतमाळमध्ये घडलंय. पती आणि मुलाच्या अकस्मात मृत्यूनंतर विधवा महिलेला तिच्या सासरच्यांनी 1 लाख 20 हजारात विकलंय.
यवतमाळच्या आर्णीतील विवाहित पीडिता आहे. लग्नानंतर आपल्या पतीसोबत त्या सासरी गुण्यागोविंदानं नांदत होत्या. दोन निरागस मुलांची त्या आई आहेत. पण संसार ऐन भरात असताना अचानक पतीचा मृत्यू झाला आणि या महिलेवर दु:खाचा डोंगर कोसळला. परिस्थिती हालकीची असल्यामुळे अन्य एक मुलगा व मुलीसह त्या सासरच्यांकडे राहत होत्या. पती गेल्याचं दु:ख कमी होत कि काय या महिलेवर आणखी एक संकट कोसळलं. तिची नणंद आणि नणंदेच्या पतीनं तिला मध्य प्रदेशात नेले. तिथून तिला 1 लाख 20 हजारात गुजरातच्या पोपट चौसाने या व्यक्तीला विकण्यात आलं. या व्यक्तीने तब्बल दोन वर्ष तिचे शोषण केलं आणि पुत्रप्राप्तीनंतर तिला गावात आणून सोडून दिले.
हेही वाचा: लातूरमधील HIV बाधित मुलीवरील बलात्कारप्रकरणी सेवालय प्रमुख रवी बापटलेसह 4 आरोपी अटकेत
सासरच्यांनी मला विकले. माझा दीर मला जा बोलला. नणंद आणि नंदावा मला माझ्या मुलांसह घेऊन गेले. काही दिवस सोबत राहिलो. त्यानंतर मुलांना माझ्यापासून वेगळं केलं आणि मला पोपट चौसाने नावाच्या व्यक्तीला विकले असे पीडित महिलेने सांगितले. मला कोंडून ठेवले, कोणाशीही बोलू दिले नाही. दोन वर्षे झाले, मला माझ्या मुलांपासून वेगळे केलं. परपुरुषाला विकले असल्याचे मला त्या व्यक्तीकडून सांगण्यात आले. त्या व्यक्तीच्या हातापाय पडून मी तिथून निघून आले असल्याचे पीडित महिलेने सांगितले आहे.
आर्णी पोलिसांच्या बेपत्ता शोध मोहिमेतून हा धक्कादायक प्रकार उघड झाला. दरम्यान याप्रकरणी पोलिसांनी तिची सासू, सासरा, दीर, नणंद व नंदई यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. या महिलेचा एक मुलगा आणि मुलीचा अद्याप पत्ता लागलेला नाही. त्यांना शोधून द्यावे अशी तिची मागणी आहे. महिला आणि मुलींच्या गैरफायदा घेऊन परप्रांतात विक्री करण्याचे अनेक प्रकार यवतमाळ जिल्ह्यात घडले आहेत. या प्रकरणी कडक उपाययोजना आखण्याची गरज व्यक्त होतं आहे.