Thursday, August 21, 2025 12:02:18 AM

महादेव मुंडे हत्या प्रकरणात वाल्मिक कराडचा हात?

महादेव मुंडे खून प्रकरणात बाळा बांगर यांचा पोलिसांनी तब्बल सहा तास चौकशीसाठी जबाब नोंदवला असून, तपासाला नवी दिशा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

 महादेव मुंडे हत्या प्रकरणात वाल्मिक कराडचा हात

बीड: बीड जिल्ह्यातील परळी येथील महादेव मुंडे खून प्रकरणात तब्बल 18 महिन्यांनंतर तपासाला गती मिळाली आहे. या खून प्रकरणात अद्याप एकही आरोपी अटकेत नसतानाही आता पोलिसांनी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. समाजकार्यकर्ते बाळा बांगर यांचा जबाब पोलिसांनी तब्बल सहा तास चौकशी करून नोंदवला असून, या प्रकरणातील तपासाला नवी दिशा मिळाल्याचे संकेत मिळत आहेत.

दोन दिवसांपूर्वी पाटोदा येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये बाळा बांगर यांनी खळबळजनक आरोप करत महादेव मुंडे यांच्या हत्येमध्ये वाल्मीक कराड यांचा थेट सहभाग असल्याचे सांगितले होते. इतकेच नाही, तर महादेव मुंडे यांचे मांस वाल्मीक कराडसमोर टेबलावर ठेवण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. या विधानांनंतर खळबळ उडाली असून, महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी देखील बाळा बांगर यांचा जबाब पोलिसांनी नोंदवावा, अशी मागणी केली होती.

या मागणीनंतर पोलिसांनी त्वरेने कारवाई करत बाळा बांगर यांची सखोल चौकशी केली. त्यांचा अधिकृत जबाब घेतल्यानंतर आता या प्रकरणातील आरोपींचा शोध अधिक प्रभावीपणे घेता येणार आहे. बाळा बांगर यांनी दिलेल्या माहितीनुसार, लवकरच गुन्हेगार गजाआड जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे या खटल्यातील गुंतागुंत सुटण्याची आशा पुन्हा एकदा निर्माण झाली आहे.

महादेव मुंडे हत्याप्रकरणाचा सविस्तर घटनाक्रम

20 ऑक्टोबर 2023 रोजी संध्याकाळी महादेव मुंडे यांनी ट्युशनवरून मुलांना घरी सोडल्यानंतर नेहमीप्रमाणे पिग्मी कलेक्शनसाठी बाहेर पडले. सायंकाळी 7:10 वाजता ते शेवटचं शिवाजी चौकात सीसीटीव्हीमध्ये दिसले. त्यानंतर आझाद चौकात एका मित्राला भेटले. रात्री 9 वाजता त्यांच्या मोटरसायकल आझाद चौकापासून 300 मीटरवर वनविभाग कार्यालयासमोर सापडली. गाडीवर रक्ताचे डाग होते आणि त्यामध्ये ओळखपत्रे, बँकेची कागदपत्रे होती. गाडी शेजारी दोन चपला आढळल्या; त्यातील एक त्यांच्या होती. मात्र दुसऱ्या दिवशी सकाळी 50 मीटर अंतरावर मृतदेह सापडला. प्रश्न उपस्थित होतो की, रात्री पोलिसांना मृतदेह का दिसला नाही? गळा कापलेला, शरीरावर वारांचे खुणा होत्या. मृतदेहासोबत मोबाईल, अंगठी, लॉकेट व 1-1.5 लाखांची रक्कम गायब होती. पोलिसांनी आठ दिवसांत आरोपी मिळवण्याचे आश्वासन दिल्याने मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. महादेव मुंडे यांचा खून पूर्वनियोजित होता की लुटमारीसाठी? हे अजूनही गूढ आहे.

 


सम्बन्धित सामग्री