Wednesday, August 20, 2025 02:06:02 PM

डिश रिपेअरच्या निमित्ताने आले अन्... अल्पवयीन मुलांनी केली 80 वर्षीय वृद्धेची हत्या

रायगडमध्ये डिश रिपेअरिंगसाठी आलेल्या दोन अल्पवयीन मुलांनी वृद्धेचा गळा दाबून खून केला. दागिन्यांसाठी हत्या करून नैसर्गिक मृत्यू भासवण्याचा प्रयत्न; आरोपी बालसुधारगृहात.

डिश रिपेअरच्या निमित्ताने आले अन् अल्पवयीन मुलांनी केली 80 वर्षीय वृद्धेची हत्या

रायगड: रायगड जिल्ह्यातील म्हसळा तालुक्यातील कणघर गावामध्ये एका 80 वर्षीय वृद्ध महिलेची गळा दाबून हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अधिक धक्कादायक बाब म्हणजे या हत्येमागे दोन अल्पवयीन मुलांचा सहभाग असल्याचं पोलिस तपासात निष्पन्न झालं आहे. सोन्याच्या दागिन्यांचा मोह आणि लूट करण्याच्या हेतूने ही निर्घृण घटना घडली आहे.

मृत महिलेचं नाव शेवंता सखाराम भावे (वय 80) असून त्या एकट्याच घरी राहत होत्या. दोन अल्पवयीन मुलं डिश रिपेअरिंगच्या कारणाने त्यांच्या घरी गेले होते. त्याच दरम्यान वृद्ध महिलेच्या गळ्यातील व कानातील दागिने पाहून त्यांना त्यांचा मोह आवरता आला नाही. दागिने लुटण्यासाठी या दोघांनी महिलेचा गळा दाबून खून केला आणि मृत्यु नैसर्गिक असल्याचा देखावा निर्माण करण्यासाठी तिला घरातच झोपवून ते पसार झाले.

हेही वाचा:'पोलिसांनी चौकशीसाठी...; शनि मंदिराचे माजी विश्वस्त नितीन शेटे यांनी संपवलं जीवन

हा सर्व प्रकार इतका हुशारीने केला गेला की सुरुवातीला तो नैसर्गिक मृत्यू वाटावा, असा भास निर्माण झाला होता. मात्र अंत्यसंस्कारावेळी दागिने नसल्याचे लक्षात आल्यानंतर नातेवाईकांनी संशय व्यक्त केला. त्यानंतर त्यांनी तातडीने म्हसळा पोलिस ठाणे गाठले. पोलिसांनी चौकशी सुरु केली असता, घटनास्थळी मिळालेल्या काही धागेदोऱ्यांच्या आधारे या दोन अल्पवयीन मुलांवर संशय घेतला.

तपासाअंती दोन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आलं असून त्यांच्याकडून दागिनेही जप्त करण्यात आले आहेत. सदर प्रकरणात भारतीय दंड विधान कलम 103, 311, (3)5 नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सध्या दोघांनाही कर्जत येथील बालसुधारगृहात ठेवण्यात आलं आहे. म्हसळा पोलीस अधिक तपास करत आहेत.

या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून समाज माध्यमांवर आणि गावात या बाबत संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. अल्पवयीन वयात अशा प्रकारच्या गुन्हेगारीकडे वळणं आणि त्यामागे फक्त दागिन्यांचा लोभ असणं, ही समाजासाठी चिंतेची बाब ठरत आहे. ही घटना केवळ हत्या नाही, तर नैतिक अधःपतनाचा आरसा आहे.

या प्रकरणात पोलीस यंत्रणा सतर्क राहून गुन्ह्याचा लवकर उलगडा करण्यात यशस्वी ठरली, पण समाजाला आता आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे.

 


सम्बन्धित सामग्री