Sunday, September 21, 2025 03:57:09 PM

Asmita Deshmukh: एका इव्हेंटदरम्यान 'या' अभिनेत्रीची फसवणूक, व्हिडीओ शेअर करत दिली माहिती; नेमकं काय घडलं?

देवमाणूस या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री अस्मिता देशमुख हिची फसवणूक झाली आहे.

asmita deshmukh एका इव्हेंटदरम्यान या अभिनेत्रीची फसवणूक व्हिडीओ शेअर करत दिली माहिती नेमकं काय घडलं

मुंबई: देवमाणूस या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री अस्मिता देशमुख हिची फसवणूक झाली आहे. दहीहंडी 2025 च्या इव्हेंटसाठी सेलिब्रिटी मॅनेजर सुजित सरकाळे या व्यक्तीने अस्मिताला इव्हेंटच्या आधी ठरल्याप्रमाणे अर्धी रक्कम दिली. दहीहंडीचा कार्यक्रम झाल्यानंतर सुजितने अभिनेत्रीला उरलेले पैसे पाठवल्याचा स्क्रीनशॉट शेअर केला. मात्र 2-3 दिवस होऊन देखील अभिनेत्रीच्या खात्यात ती रक्कम जमा झाली नाही. अभिनेत्रीने पैसे का जमा झाले नाही याची चौकशी केली असता तिची फसवणूक झाल्याचे उघड झाले. तात्काळ तिने पोलिसात तक्रार दाखल केली. परंतु त्याचे काहीच झाले नाही. त्या व्यक्तीने पोलिसांनाही गंडवल्याचे अभिनेत्रीने म्हटले आहे. सुजित सरकाळे असं त्या गृहस्थाच नाव असून आजवर त्याने अनेक कलाकारांना फसवलं असल्याचं देखील उघड झालं आहे.  

अस्मिता देशमुखने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक स्टोरी ठेवली आहे. यामध्ये तिने व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओद्वारे ती म्हणाली, "नमस्कार, मी अस्मिता देशमुख. व्हिडीओ बनवण्याचं कारण एकच आहे की जेवढे काही सेलिब्रिटी आहेत, जेवढे रिल-स्टार्स आहेत. तेवढ्या सगळ्यांना मला अलर्ट करायचं आहे. एक माहिती मला तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचवायची आहे. मध्यंतरी मी दहिहंदीचा एक इव्हेंट केला होता. सुजित सरकाळे याने मला इव्हेंट दिला होता. माझ्यासह इतरही अनेक सेलिब्रिटी या इव्हेंटमध्ये होत्या. हा किस्सा माझ्याबाबतही नाही तर तुमच्याबाबतही घडू शकतो".

हेही वाचा: Dashavatar Box Office: 'दशावतार'चा बोलबाला! नवव्या दिवशी केली तुफान कमाई, मोडले सर्व रेकॉर्ड

पुढे बोलताना अस्मिता म्हणाली, "सुजित सरकाळेने मला अर्धे पैसे पाठवले आणि बाकीचे इव्हेंटदरम्यान देणार होता. ठरल्याप्रमाणे मी इव्हेंटला गेले. इव्हेंट झाल्यानंतर त्याने मला पैसे पाठवल्याचे काही स्क्रीनशॉट पाठवले. त्या स्क्रीनशॉटमध्ये पैसे आल्याचे दिसत असले तरी माझ्या अकाऊंटला ते पैसे आले नव्हते. सर्वर डाऊन, बँक इश्यू अशी कारणं त्याने मला दिली. आठवडा गेल्यानंतर माझ्या ही गोष्ट लक्षात आली की हा खूप मोठा स्कॅम माझ्यासोबत घडला आहे. इतरांच्या बाबतही हे घडू शकतं. फोन पे, गुगल पेच्या माध्यमातून हा स्कॅम होतोय. खूपदा मी व्यवस्थितपणे त्याच्याकडे पैशांची मागणी केली. पोलिसांकडे तक्रार केली. त्यांनासुद्धा त्याने गंडावलं. मला कळकळीची विनंती करायची आहे की, कोणताही इव्हेंट करण्याआधी पूर्ण पैसे घ्या". 

देवमाणूस मालिकेसह तुझी माझी जमली जोडी या मालिकेतही अस्मिता मुख्य भूमिकेत होती. कमी वेळातच तिने आपल्या अभिनयाची छाप घराघराात सोडली आहे. 


सम्बन्धित सामग्री