मुंबई: 'राज' चित्रपटातून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करणारा अभिनेता डिनो मोरियाच्या अडचणीत वाढ झाल्याची माहिती मिळाली आहे. आता तुम्हाला सुद्धा हा प्रश्न पडला असेल आणि तो म्हणजे नेमकं कोणत्या कारणामुळे या अभिनेत्याच्या अडचणीत वाढ झाली? तर विषय असं आहे की, मिठी नदीच्या घोटाळा प्रकरणी अभिनेता डिनो मोरियाची मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी सुरू आहे. याप्रकरणी, सोमवारी सकाळी 11 वाजता डिनो मोरिया ईओडब्ल्यू कार्यालयात हजर झाल्याची पुष्टी अधिकाऱ्यांनी केली होती. या प्रकरणी, ईओडब्ल्यूने डिनोचा भाऊ सँटिनो मोरिया यांची देखील चौकशी केली होती. सूत्रांनुसार, मिठी नदी घोटाळा प्रकरणातील मुख्य आरोपी केतन कदमने बॉलिवूड अभिनेता डिनो मोरिया आणि त्याच्या भावाशी फोनवरून अनेक संभाषण केल्याचे तपासकर्त्यांना आढळून आले आहे. यानंतर, या प्रकरणात पोलिसांनी सोमवारी मोरियाला चौकशीसाठी बोलावले होते. सध्या, मुख्य आरोपीसोबत डिनो आणि डिनोचा भाऊ सँटिनो मोरिया यांच्यासोबत काय बोलणे झाले याचा तपास पोलीस करत आहेत. तसेच, आरोपीशी संबंधित कॉल रेकॉर्ड आणि आर्थिक व्यवहारांच्या विश्लेषणादरम्यान अभिनेता डिनो मोरियाचे नाव पुढे आले. पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, 'अभिनेत्याचा सहभाग आणि दोन्ही पक्षांमधील व्यवहारांची माहिती पुष्टी करण्यासाठी त्याची चौकशी करण्यात आली'. मात्र, डिनो मोरियाचा मिठी नदी घोटाळा प्रकरणाशी काय संबंध आहे? याबाबत अनेकांना प्रश्न पडला असेल. चला तर सविस्तर जाणून घेऊया.
नेमकं प्रकरण काय?
मिठी नदी घोटाळ्यात बृहन्मुंबई महानगरपालिकेने (बीएमसी) गाळ काढण्याची यंत्रे आणि गाळ काढण्याच्या उपकरणांच्या भाड्याने घेण्यात कथित आर्थिक अनियमितता असल्याचा आरोप आहे. याप्रकरणी, कदम आणि सह-आरोपी जय जोशी यांच्यावर कोची येथील मॅटप्रॉप टेक्निकल सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडकडून खरेदी केलेल्या यंत्रसामग्रीसाठी महापालिकेकडून जास्त दर आकारल्याचा आरोप आहे. मॅटप्रॉप अधिकारी आणि बीएमसीच्या स्टॉर्म वॉटर ड्रेनेज (एसडब्ल्यूडी) विभागातील अधिकाऱ्यांमध्ये संगनमताने हे काम झाल्याचा तपासकर्त्यांना अंदाज आहे.