मुंबई: अभिनेत्री करिश्मा कपूर हिच्या मुलांनी वडिल संजय कपूर यांच्या 30 हजार कोटींच्या संपत्तीत हिस्सा मिळवण्यासाठी न्यायालयात धाव घेतली आहे. विशेष म्हणजे सावत्र आई प्रिया सचदेव हिच्याविरोधात करिश्मा कपूरची समायरा आणि कियान ही दोन्ही मुलं न्यायालयीन लढाई लढत आहेत. याप्रकरणात करिश्मा आपल्या मुलांचे प्रतिनिधित्व करत आहे. परंतु ती स्वतः या खटल्याची पक्षकार नाही. करिश्मा या प्रकरणातून स्वतःसाठी कोणताही आर्थिक लाभ मागत नाही, तर ती केवळ तिच्या मुलांच्या आर्थिक स्थैर्यासाठी लढत आहे, असे करिश्माच्या वकिलांनी सांगितले आहे.
काय म्हणाले वकील महेश जेठमलानी?
रिपब्लिक टीव्हीवर बोलताना करिश्मा कपूरचे वकील महेश जेठमलानी यांनी सांगितले की, "करिश्मा कपूरला स्वतःसाठी काहीच नको आहे. या खटल्याचा एकमेव उद्देश तिच्या मुलांना आर्थिक मिळवून देणे, हा आहे. संजय कपूर यांना देखील हेच हवे होते. त्यासाठी करारही तयार करण्यात आला होता, ज्यात भारतातील त्याची मालमत्ता, कॉर्पोरेट मालमत्ता आणि बहुतांशी परदेशातील मालमत्ता समाविष्ट होत्या. त्यासाठी एक इच्छापत्र देखील होतं, जे कधीही उघड करण्यात आलेलं नाही किंवा नोंदणीकृतही नाही. त्यामुळे हा वाद केवळ त्या इच्छापत्राअंतर्गत येणाऱ्या मालमत्तेबाबत आहे, ट्रस्टच्या मालमत्तेबाबत नाही."
हेही वाचा: Firing at Disha Patni's Bareilly House: बरेलीमध्ये बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानीच्या घरावर गोळीबार
मिळालेल्या माहितीनुसार, दिवंगत उद्योगपती संजय कपूर यांची एकूण सुमारे 30 हजार कोटींची मालमत्ता आहे. संजय कपूर यांच्या इच्छापत्रानुसार करिश्माची मुलं समायरा आणि कियान यांना 1 हजार 900 कोटी दिले जात आहेत असे त्यांच्या पत्नी प्रिया सचदेव कपूर यांनी सांगितले आहे. पण समायरा आणि कियान यांनी हे इच्छापत्रं खोटी असल्याचे सांगून त्याचा विरोध केला आहे. याबाबत बोलताना वकील जेठमलानी म्हणाले, "ही मुलं प्रिया कपूर यांच्या कृपेवर काहीही मिळवत नाहीत. ही संजय कपूर यांचीच मालमत्ता आहे. कोणी त्यांच्यावर उपकार करत नाही. उर्वरित 28 हजार कोटी प्रिया सचदेव सोडून देणार का? हा कसला मूर्खपणा आहे? आम्ही फक्त मुलांच्या योग्य वारशासाठी लढत आहोत."