Maharashtra Weather Update: राज्यात मॉन्सूनच्या परतीच्या प्रवासाला पोषक हवामान निर्माण झाले असल्याने पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. मागील 24 तासांपासून राज्यभरातील बहुसंख्य भागांमध्ये पावसाने हजेरी लावली आहे. विशेषतः मराठवाड्यात गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण असून काही ठिकाणी पाऊस बरसत आहे. आज 13 सप्टेंबर रोजी पुन्हा पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाने जिल्ह्यांना यलो आणि ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
बंगालच्या उपसागरात ओडिशा आणि आंध्रप्रदेशच्या किनाऱ्यालगत चक्राकार वारे तयार झाले असून, त्यातून कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. ही प्रणाली रविवारपर्यंत जमिनीवर येण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा पंजाबच्या अमृतसरपासून दक्षिण-मध्य महाराष्ट्रापर्यंत सक्रिय आहे. यामुळे राज्यात पावसाचे प्रमाण वाढले असून, तापमानातही चढ-उतार सुरू झाले आहेत.
हेही वाचा: Police Recruitment 2025: 'आता वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांनाही...', पोलीस भरतीबाबत सरकारचा मोठा निर्णय
गेले काही दिवस मराठवाड्यात पावसाने विश्रांती घेतली होती. मात्र आता पाऊस पुन्हा सक्रीय झाला असून संपूर्ण मराठवाडा व्यापला आहे. रविवारपासून संपूर्ण मराठवाड्यात पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुढील काही काळ हवामानाची हीच स्थिती राहणार आहे. त्यामुळे नागरिकांना आणि शेतकऱ्यांना योग्य ती काळजी घ्यावी लागेल.
हवामान खात्याचा इशारा
ऑरेंज अलर्ट : लातूर, नांदेड
येलो अलर्ट : सिंधुदुर्ग, सोलापूर, परभणी, हिंगोली, वाशीम, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, धाराशीव, बीड, बुलडाणा, अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा