Sunday, August 31, 2025 11:49:01 PM

Gharat Ganpati Re-Released: 'घरत गणपती’ चित्रपटगृहात पुन्हा झळकणार, या दिवशी होणार री-रिलीज

'घरत गणपती' या लोकप्रिय चित्रपटाच्या स्मरणरंजनाची मेजवानी प्रेक्षकांना चित्रपटगृहात जाऊन पुन्हा एकदा घेता येणार आहे.

gharat ganpati re-released घरत गणपती’ चित्रपटगृहात पुन्हा झळकणार या दिवशी होणार री-रिलीज

Gharat Ganpati Re-Released: काही कलाकृती या कायम पहाव्या अशाच वाटतात. काही चित्रपटही असे असतात की जे पुन्हा पुन्हा पहावेसे वाटतात. अशा कलाकृतींच्या यादीतील 'घरत गणपती' हा चित्रपट. या लोकप्रिय चित्रपटाच्या स्मरणरंजनाची मेजवानी प्रेक्षकांना चित्रपटगृहात जाऊन पुन्हा एकदा घेता येणार आहे. मराठी चित्रपटाच्या रूपेरी पडद्यावर अधिराज्य गाजवून प्रेक्षकांची मने जिंकणारा हा चित्रपट खास लोकाग्रहास्तव 29 ऑगस्टपासून पुन्हा चित्रपटगृहात झळकणार आहे. सर्वत्र गणेशोत्सवाची धामधूम पहायला मिळत असताना गणेशोत्सवाचा हा आनंद द्विगुणित करण्यासाठी 'घरत गणपती’ हा चित्रपट नवचैतन्य देणारा ठरणार आहे. 

याबाबत आनंद व्यक्त करताना चित्रपटाचे दिग्दर्शक नवज्योत बांदिवडेकर म्हणाले की, ‘अनेकदा प्रेक्षक ‘घरत गणपती’ चित्रपट मोठ्या पडद्यावर पहायला कधी मिळणार? असं विचारत होते. गणरायाच्या आशीर्वादाने त्यांची ही इच्छा पूर्ण करता येतेय याचा खूप आनंद आहे. हा चित्रपट मोठ्या पडद्यावर पहाण्याची एक वेगळी मजा आहे. एक छान कौटुंबिक कथा व भारतीय संस्कृतीचे दर्शन ‘घरत गणपती’ चित्रपटाच्या माध्यमातून आम्ही दाखविले, त्या चित्रपटाचं आज विविध स्तरावर खूप कौतुक होताना दिसतंय’, याचा अभिमान असल्याचंही दिग्दर्शक नवज्योत बांदिवडेकर सांगतात. 

हेही वाचा: Zakir Khan : न्यू यॉर्कमधील एमएसजीमध्ये हिंदीत कार्यक्रम; झाकीर खाननं रचला इतिहास

‘चित्रपटाच्या संपूर्ण टीमने अतिशय मेहनत घेऊन हा चित्रपट निर्माण केला आणि त्याला प्रेक्षकांकडूनही जोरदार प्रतिसाद मिळाला त्यामुळे आम्ही सर्वप्रथम प्रेक्षकांचे आभार मानतो’, असं पॅनोरमा स्टुडिओजचे सीईओ मुरलीधर छतवानी यांनी सांगितले. 

पॅनोरमा स्टुडिओज आणि नॅविअन्स स्टुडिओ यांच्या विद्यमाने आलेल्या ‘घरत गणपती’ या भव्य मराठी चित्रपटाचे दिग्दर्शन नवज्योत नरेंद्र बांदिवडेकर यांचे आहे. कुमार मंगत पाठक, अभिषेक पाठक, नम्रता बांदिवडेकर, नवज्योत नरेंद्र बांदिवडेकर, गौरी कालेलकर-चौधरी यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे.

निकिता दत्ता, भूषण प्रधान, अश्विनी भावे, अजिंक्य देव,संजय मोने, शुभांगी लाटकर, शुभांगी गोखले, डॉ.शरद भुताडिया, सुषमा देशपांडे, परी तेलंग,आशिष पाथोडे, रूपेश बने, राजसी भावे, समीर खांडेकर, दिव्यलक्ष्मी मैस्नाम आदि कलाकारांच्या दमदार अभिनयाने या चित्रपटाला वेगळीच रंगत आणली होती. या चित्रपटाच्या लेखन-दिग्दर्शनापासून संवाद, अभिनय, सादरीकरण, गीत-संगीत या सर्वांवर प्रेक्षक अक्षरश: फिदा झाले होते. आता  हीच मजा येत्या 29 ऑगस्टपासून पुन्हा अनुभवायला मिळणार आहे. 

गणेशोत्सवाच्या निमित्ताने नात्यांचें  बंध जपत, उत्सवाचा आनंद  द्विगुणीत करण्यासाठी याहून अनोखी संधी असू शकत नाही. याच गणपती उत्सवाच्या आनंददायी सोहळ्याचं आणि घरत कुटुंबातील नात्यांच्या बंधाची गोष्ट 'घरत गणपती' चित्रपटातून पुन्हा अनुभवता येणार आहे.


सम्बन्धित सामग्री