बंगळूरू - कन्नड चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री रण्या राव हिला 14.8 किलो सोने तस्करीप्रकरणी बंगळूरूच्या केंपेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर महसूल गुप्तचर संचालनालयाने (DRI) अटक केली आहे. दुबईहून एमीरेट्सच्या फ्लाइटने आलेल्या रण्याला सोमवारी रात्री ताब्यात घेण्यात आले.
गुप्त नजर ठेवून मोठा खुलासा
DRI अधिकाऱ्यांनी रण्यावर तिच्या वारंवार होणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रवासामुळे संशय घेतला होता. तपास अधिकाऱ्यांनी सांगितले की, तिने मोठ्या शिताफीने सोन्याचे बार लपवले होते आणि काही प्रमाणात सोने अंगावर घातले होते, जेणेकरून कोणीही संशय घेऊ नये. मात्र, गुप्त माहितीनंतर अधिकाऱ्यांनी तिला अडवले आणि झडती घेतली असता हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.
हेही वाचा : सोलापुरात घोरपडीच्या गुप्तांग तस्करीचा पर्दाफाश – वन विभागाची मोठी कारवाई
IPS अधिकाऱ्याच्या मुलीचा सोन्याचा गैरव्यवहार?
रण्या ही कर्नाटकमधील एका DGP दर्जाच्या वरिष्ठ IPS अधिकाऱ्याची मुलगी आहे. त्यामुळे या प्रकरणात पोलिसांच्या सहभागाबाबतही तपास सुरू आहे. प्राथमिक तपासात असे आढळले की, रण्या विमानतळावर पोहोचल्यानंतर आपण DGP ची मुलगी असल्याचे सांगून स्थानिक पोलिसांना बोलवत असे आणि त्यांच्यासोबत घरी निघत असे. त्यामुळे या प्रकरणात काही पोलिस अधिकारी जाणूनबुजून मदत करत होते की, ते फक्त तिच्या नावावर विश्वास ठेवून मदतीसाठी जात होते, याचा तपास सुरू आहे.
DRI च्या अधिकृत निवेदनाची प्रतीक्षा
सध्या महसूल गुप्तचर संचालनालयाने अधिकृत निवेदन दिलेले नाही. मात्र, या प्रकरणामुळे संपूर्ण कर्नाटक आणि चित्रपटसृष्टीत खळबळ उडाली आहे. रण्याच्या या कारवाईनंतर पोलिस आणि अन्य वरिष्ठ अधिकारी मोठ्या दबावाखाली आले असून, पुढील तपास कसा होतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.