मुंबई: मध हा नैसर्गिक गोडवा देणारा पदार्थ आहे. फुलांच्या रसापासून मधमाश्या मध तयार करतात. त्यामुळे मधात ॲंटिऑक्सिडंट्स, अँटीमायक्रोबियल गुणधर्म आणि इतर पोषक घटक आढळतात. त्यामुळे, मध केवळ एक गोड पदार्थ नसून आरोग्याचा खजिना मानला जातो. माहितीनुसार, 20 ग्रॅम मधात कार्बोहायड्रेट्स, रिबोफ्लेविन, कॉपर, प्रथिने आणि फायबरचे अंश आढळतात. विशेष म्हणजे, मधात चरबीचे प्रमाण नसते, त्यामुळे वजनावर ताण येत नाही. मात्र, मधाचे सेवन मर्यादित प्रमाणात करणे गरजेचे आहे.
हृदयासाठी मध फायदेशीर मानला जातो. मधातील ॲंटिऑक्सिडंट्स हृदयाचे ठोके नियमित ठेवण्यास मदत करतात. सोबतच, रक्तदाव संतुलित ठेवण्यासाठी उपयोगी ठरतात. तसेच, मधाचे नियमित सेवन केल्याने ऑक्सिडेटिव्ह ताण कमी होतो. मानसिक आरोग्यासाठी मध उपयुक्त आहे. चिंता, नैराश्य किंवा स्मरणशक्ती कमी असल्यास मधाचे सेवन करणे फायदेशीर मानले जाते. इतकंच नाही, तर पारंपारिक औषधोपचारांमध्ये स्थानिक उपचारांसाठी वापरला जातो. भाजलेल्या किंवा किरकोळ जखमांवर मध लावल्यास बॅक्टेरियाची वाढ कमी होते आणि जखम लवकर भरते. मधुमेह रुग्णांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानेच मधाचे सेवन करावे. खोकला किंवा सर्दी असल्यास मधाचे सेवन करणे रामबाण उपाय ठरते. मधाचे सेवन केल्याने घशात होणारी जळजळ आणि खोकल्यामुळे होणारी अस्वस्थता कमी होते. असे मानले जाते, की रात्री झोपण्यापूर्वी मधाचे सेवन केल्याने घाशाला आराम मिळतो.
मधाचा आणखी एक फायदा म्हणजे, तो सहज खाता येतो. टोस्ट, फळे, आईस्क्रीम, सॅलडमध्ये मध मिसळून खाल्याने चव वाढते. कोमट पाण्यात मध मिसळून पिल्याचे अनेक फायदे आहेत. मध हा फक्त गोडवा देणारा पदार्थच नाही, तर अनेक आरोग्य फायद्यांचा नैसर्गिक स्त्रोत आहे. योग्य प्रमाणात सेवन केल्यास मध तुमच्या दैनंदिन आहारात आरोग्य आणि चवीची भर घालतो.