Rare Earth Minerals: भारताच्या भूमीतून पुन्हा एकदा जागतिक औद्योगिक शक्ती बनण्याच्या दिशेने महत्वाचा टप्पा गाठण्यात आला आहे. मध्य प्रदेशातील सिंगरौली कोलफिल्ड्समध्ये 'रेअर अर्थ एलिमेंट्स' (REEs) या अत्यंत दुर्मीळ खनिजांचा मोठा साठा सापडल्याचे केंद्र सरकारने जाहीर केले आहे. यामुळे भारताच्या खाण उद्योगासोबतच संपूर्ण अर्थव्यवस्थेलाही चालना मिळण्याची शक्यता आहे.
दुर्मीळ पण अनमोल: काय असतात हे 'रेअर अर्थ एलिमेंट्स'?
‘रेअर अर्थ एलिमेंट्स’ म्हणजे स्कॅन्डियम, इट्रियम आणि लॅंथेनाइड्स या 17 दुर्मीळ खनिजांचा समूह. हे खनिजे दिसायला साधी असली, तरी त्यांचा उपयोग अत्याधुनिक तंत्रज्ञानात अनमोल ठरतो. इलेक्ट्रिक वाहने (EVs), मोबाईल, लॅपटॉप, सौर आणि पवनऊर्जा उपकरणं, तसेच संरक्षण यंत्रणा यामध्ये या खनिजांचा अत्यंत महत्त्वाचा वाटा आहे.
चीनचा मक्तेदारीचा काळ संपणार?सध्या जगभरात REEs चा 85 टक्के पुरवठा चीनकडून होतो. मात्र, त्यांच्या धोरणात्मक मर्यादांमुळे अनेक देशांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागले आहे. अशा वेळी भारताला सापडलेला हा साठा, जागतिक बाजारात नवे पर्याय उभारण्याची संधी निर्माण करतो. यामुळे चीनच्या एकाधिकाराला जबर धक्का बसण्याची शक्यता आहे.
हेही वाचा: ITR भरण्याची शेवटची तारीख कधी आहे? जाणून घ्या
किती आणि कुठे सापडला खजिना?
कोळसा आणि खाणकाम मंत्री जी. किशन रेड्डी यांनी संसदेत ही माहिती दिली. सिंगरौली कोलफिल्ड्समधील कोळसा व नॉन-कोळसा नमुन्यांमध्ये REEs चे प्रमाण 250 ppm ते 400 ppm इतके आढळून आले आहे. हे प्रमाण वैज्ञानिक दृष्टिकोनातून ‘एनरिचमेंट लेव्हल’ मध्ये मोडते, म्हणजेच या खनिजांचा व्यावसायिक वापर करण्यासारखा आहे.
तंत्रज्ञान आणि संशोधनासाठी पुढाकार
या खनिजांचा योग्य प्रकारे वापर होण्यासाठी आवश्यक असलेल्या तंत्रज्ञानावरही भारताने काम सुरू केले आहे. कोल इंडिया लिमिटेड (CIL) आणि सिंगरेणी कोलियरीज कंपनी लिमिटेड (SCCL) यांनी IMMT भुवनेश्वर, NFTDC हैदराबाद आणि IIT हैदराबाद या नामांकित संस्थांशी सामंजस्य करार केले आहेत. या भागीदारीतून REEs काढण्याचे नवीन आणि परवडणारे मार्ग शोधले जातील.
देशाच्या आत्मनिर्भरतेकडे आणखी एक पाऊलपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर भारत अभियानात हा शोध एक मोठं टप्पा मानला जातो. इलेक्ट्रॉनिक्स, ऊर्जा, संरक्षण आणि इतर उच्च-तंत्रज्ञान उद्योगांसाठी लागणाऱ्या कच्च्या मालाची देशांतर्गत उपलब्धता वाढल्यास, आयातीवरील अवलंबन कमी होणार आणि देशाची आर्थिक ताकदही वाढणार
हेही वाचा:तुमच्या नावावर कोणी बनावट कर्ज घेतले आहे का? पॅन कार्डच्या मदतीने एका क्लिकवर जाणून घ्या
आता पुढे काय?
या खनिजांचा प्रत्यक्ष उपयोग सुरु होण्यासाठी अद्याप काही पावलं उरली आहेत
-व्यावसायिक स्वरूपात उत्खननासाठी अधिक संशोधन
-तांत्रिक पायाभूत सुविधा
-प्रक्रिया उद्योगांची उभारणी
परंतु या दिशेने भारताने भक्कम सुरुवात केली आहे. सिंगरौलीचा हा शोध केवळ खाणीपुरता मर्यादित नसून, भारताच्या जागतिक भूमिकेत नवा आत्मविश्वास भरून टाकणारा आहे.
सिंगरौलीमध्ये सापडलेले हे ‘जादुई खनिज’ भारतासाठी गेमचेंजर ठरू शकते. यामुळे देशाला जागतिक तंत्रज्ञान क्षेत्रात स्वयंपूर्ण होण्याची संधी मिळेल. आणि यावेळी फक्त भारताचेच नाही, तर जगाचेही लक्ष भारताकडे लागलेले असेल.