नवी दिल्ली : दिल्ली विधानसभेतील विरोधी पक्षनेत्या आतिशी यांनी मंगळवारी भारतीय जनता पक्षावर मुख्यमंत्री कार्यालय आणि कॅबिनेट मंत्र्यांच्या कार्यालयातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे फोटो हटवून त्या जागी पंतप्रधान नरेंद्र मोदीचे फोटो लावल्याचा आरोप केला. यावरून, 'आप'च्या विरोधी पक्षनेत्या आतिशी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी डॉ. आंबेडकरांची जागा घेऊ शकतात असे भाजपला वाटते का, असा प्रश्न केला.
“भाजपने त्यांचा खरा चेहरा संपूर्ण देशाला सोमवारी दाखवला. दिल्ली विधानसभा आणि दिल्ली सचिवालय या ठिकाणी असलेल्या मुख्यमंत्री कार्यालय आणि इतर कार्यालयांमध्ये असलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटो हटवून त्या ठिकाणी पंतप्रधान मोदींचा फोटो लावण्यात आला आहे. भाजपाच्या लोकांना वाटतं की पंतप्रधान नरेंद्र मोदी हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जागा घेऊ शकतात त्यामुळेच हे करण्यात आलं.”
"भाजपने दिल्लीच्या मुख्यमंत्री कार्यालयातून, दिल्ली सचिवालयातील सर्व मंत्र्यांच्या कार्यालयातून डॉ. बाबासाहेबांचे फोटो काढून टाकले आहेत आणि त्याऐवजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे फोटो लावले आहेत. आज मी भाजपला विचारू इच्छिते की, त्यांना पंतप्रधान मोदी बाबासाहेब आंबेडकरांपेक्षा मोठे वाटतात का? त्यांना वाटते का, की नरेंद्र मोदी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जागा घेऊ शकतात?" असा प्रश्न आतिशी यांनी केला.
हेही वाचा - 'देशप्रेम तुला काय माहिती? तू नीच आहेस आणि असाच मरशील,' कोहलीवरील ट्विटवर युजर्सची फालतू कमेंट; जावेद अख्तर संतापले
गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये राज्यसभेत अमित शहा यांनी केलेल्या वक्तव्याची दखल घेत आतिशी यांनी बाबासाहेबांबद्दल भाजपच्या विचारांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. "हा तोच पक्ष आहे ज्या पक्षाचे गृहमंत्री अमित शहा संसदेत बाबासाहेबांची खिल्ली उडवतात. आज आम्हाला त्यांना असा प्रश्न विचारायचा आहे की, डॉ. आंबेडकरजींबद्दल त्यांचे काय मत आहे?" असे आतिशी म्हणाल्या.
आतिशी आणि आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी सोमवारीही असाच आरोप केला होता. त्यावर दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता म्हणाल्या की, त्यांचे भ्रष्टाचार आणि गैरकृत्ये लपवण्यासाठी, आम आदमी पक्ष नवनिर्वाचित सरकारवर मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातून बाबासाहेब आंबेडकर आणि भगतसिंग यांचे फोटो काढून टाकल्याचा आरोप करण्याची "युक्ती" वापरत आहे.
"बाबासाहेब आंबेडकर आणि शहीद भगतसिंग यांच्या मागे स्वतःचा भ्रष्टाचार आणि दुष्कृत्ये लपवण्याची ही आपच्या नेत्यांची युक्ती आहे... सरकारप्रमुखांचा फोटो लावू नये का? देशाच्या राष्ट्रपतींचा फोटो लावू नये का? राष्ट्रपिता गांधीजींचा फोटो लावू नये का? भगतसिंग आणि बाबासाहेब आंबेडकर हे देशाचे आदरणीय व्यक्तिमत्व आणि आमचे मार्गदर्शक आहेत. म्हणून, ही खोली दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांची आहे आणि सरकारप्रमुख म्हणून आम्ही त्यांना जागा दिली आहे. त्यांना उत्तर देणे माझे काम नाही, मी जनतेला उत्तरदायी आहे..." असे मुख्यमंत्री गुप्ता यांनी एका वृत्तसंस्थेशी बोलताना म्हणाल्या.
विधानसभेतही गोंधळ
दिल्लीत भाजपाने 48 जागांवर विजय मिळवत एकहाती सत्ता काबीज केली आहे. दरम्यान, 27 फेब्रुवारीपर्यंत विशेष अधिवेशन असणार आहे. राज्यपालांच्या अभिभाषणादरम्यान आप म्हणजेच आम आदमी पार्टीच्या आमदारांनी जोरदार गदारोळ केला. यानंतर दिल्ली विधानसभेचे अध्यक्ष विजेंद्र गुप्ता यांनी आपच्या 12 आमदारांचं निलंबन केलं आहे. ज्या 12 आमदारांचं एक दिवसासाठी निलंबन करण्यात आलं त्यात विरोधी पक्षनेत्या आणि माजी मुख्यमंत्री आतिशी यांचाही समावेश आहे.
हेही वाचा - Indian Railway Rules: 'या'पैकी एखादी सीट बुक केली असेल तर, सकाळी 6 ला उठावं लागेल, 'या' वेळेत सर्वांनी पाळावी शांतता
12 आमदारांचं एका दिवसासाठी निलंबन
दिल्ली विधानसभेत गदारोळ करणाऱ्या जुबेर अहमद, वीरेंद्र सिंह कादियान यांच्यासह विरोधी पक्ष नेत्या आतिशी अशा एकूण 12 आमदारांचं एका दिवसासाठी निलंबन करण्यात आलं आहे. दिल्ली विधानसभेत आज कॅगचा अहवाल समोर येणार आहे. या अहवालात शीशमहलच्या दुरुस्ती आणि देखभाल खर्चाचे तसंच नुतनीकरणाच्या खर्चाचे तपशील आहेत. ज्यावरुन कॅगने आधीच्या सरकारला झापलं आहे. त्यावरुन आपच्या आमदारांनी गोंधळ केला. तसंच, दिल्ली विधानसभेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो हटवून पंतप्रधान मोदींचा फोटो त्या ठिकाणी का लावण्यात आला, असा सवालही त्यांनी केला. या दोन्ही मुद्द्यांवरुन गदारोळ सुरु आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांपेक्षा मोठे आहेत का? असा सवाल माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेत्या आतिशी यांनी केला आहे.