Delhi Schools Bomb Threats: दिल्लीतील अनेक शाळांना शनिवारी सकाळी अज्ञात व्यक्तीकडून बॉम्बच्या धमक्या मिळाल्या. डीपीएस द्वारका, कृष्णा मॉडेल पब्लिक स्कूल आणि सर्वोदय विद्यालय या शाळांमध्ये फोनद्वारे धमकी आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली. धमकीनंतर पोलीस पथक, बॉम्ब निकामी पथक (BDDS) आणि श्वान पथक घटनास्थळी दाखल झाले.
तातडीने विद्यार्थी व शिक्षकांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले आणि शाळा परिसराची कसून तपासणी करण्यात आली. तपासादरम्यान काहीही संशयास्पद आढळून आले नाही. प्राथमिक चौकशीत ही धमकी बनावट असल्याचे स्पष्ट झाले. अशा प्रकारच्या खोट्या धमक्यांची ही पहिली वेळ नाही. याआधीही दिल्लीतील अनेक शाळा, विमानतळ आणि उच्च न्यायालयाला अशाच प्रकारच्या धमक्या मिळाल्या आहेत.
हेही वाचा - Manipur News : मणिपूरमध्ये दहशतवादी हल्ला; आसाम रायफल्सचे 2 जवान शहीद, 5 जखमी
दरम्यान, शुक्रवारी मुंबईहून थायलंडच्या फुकेतला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानालाही बॉम्बच्या कथित धमकीनंतर चेन्नई विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करावे लागले. सीआयएसएफ व विमानतळ अधिकाऱ्यांनी विमानाची तपासणी केली असता ती धमकी देखील खोटी असल्याचे समोर आले.
हेही वाचा - Mumbai High Court Bomb Threat: मुंबई उच्च न्यायालयाला पुन्हा बॉम्बची धमकी; सुरक्षा यंत्रणा सतर्क
याशिवाय, मुंबई उच्च न्यायालयाला गेल्या आठवड्यात दोन वेळा बॉम्ब धमकीचे ईमेल मिळाले. तथापी, शुक्रवारी सकाळी न्यायालयात पुन्हा धमकीचा मेल आल्यानंतर सुरक्षा यंत्रणांनी सखोल तपासणी केली, मात्र कोणतेही संशयास्पद साहित्य आढळले नाही. न्यायालयाचे कामकाज नेहमीप्रमाणे सुरू ठेवण्यात आले. याआधी 12 सप्टेंबर रोजी आलेल्या ईमेलनंतर सुनावण्या काही तासांसाठी पुढे ढकलण्यात आल्या होत्या. पोलिसांनी सर्व घटनांवर स्वतंत्र तपास सुरू केला असून अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.