चंद्रपूर: चंद्रपूर येथील ताडोबा व्याघ्र प्रकल्प हा वन्यप्रेमींसाठी जणू स्वर्ग आहे. या ठिकाणी भेट देण्यासाठी देशभरातून अनेक वन्यप्रेमी येतात. मात्र, आज हा व्याघ्र प्रकल्प एका वेगळ्या कारणासाठी प्रसिद्धीच्या झोतात आला आहे. कारण प्रेमात वेडा झालेल्या एका वाघाने आपलं प्रेम असलेल्या वाघिणीच्या जवळ जाणाऱ्या प्रत्येक वाघाला कसे ठार केले याची चर्चा सर्वत्र होत आहे.
माहितीनुसार, सोमवारी रात्री 8 च्या सुमारास ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमधील खडसंगी वनपरिक्षेत्रात एक थरारक युद्ध झाले. छोटा मटका नावाच्या वाघाने 'नयनतारा' नावाच्या वाघिणीच्या प्रेमात वेडा असलेल्या 'ब्रह्मा' नावाच्या वाघाला ठार केले. इतकंच नाही, तर या युद्धात छोटा मटकाही जखमी झाला होता. ही घटना निमढेला बीट येथील कक्ष क्रमांक 63 मध्ये घडली. त्यानंतर, मंगळवारी सकाळी ही घटना समोर आली.
हेही वाचा: अन्ननलिकेत अडकली मटणाची सहा हाडे; 52 वर्षीय रुग्णावर दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया
छोटा मटक्याची दहशत:
रामदेगी (चिमूर तालुका) परिसरातील ताडोबाचा बफर झोन पर्यटकांमध्ये 'छोटा मटका' आणि 'नयनतारा' या वाघांसाठी खूप प्रसिद्ध आहे. या जंगलात छोटा मटक्याची दहशत आहे. मात्र, अशातच या दोघांत तिसऱ्याची एंट्री झाली. या तिसऱ्या वाघाचे नाव 'ब्रह्मा' आहे. गेल्या काही दिवसांपासून 'नयनतारा'सोबत जवळीक साधण्यासाठी 'ब्रह्मा' तिच्या अवतीभवती फिरत होता. याची खबर छोटा मटक्याला मिळाल्यावर, बुद्ध पौर्णिमेच्या रात्री संधी साधून छोटा मटक्याने 'ब्रह्मा'वर हल्ला केला. दोघांमध्ये युद्ध सुरू झाले आणि छोटा मटक्याने 'ब्रह्मा'ला ठार केले.
पर्यटकांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी काही पर्यटकांनी छोटा मटक्याला लंगडत चालताना पाहिले. तेव्हा त्यांचे लक्ष गेले की छोटा मटक्याचं तोंड रक्ताने माखलेलं होतं. त्यांनी वनविभागाला याची माहिती दिली. वनविभागाने तत्काळ शोधमोहीम राबवली आणि 'ब्रह्मा' मृत अवस्थेत सापडला. मृत 'ब्रह्मा'च्या शवविच्छेदनासाठी चंद्रपूर येथील ट्रान्झिस्ट ट्रीटमेंट सेंटरमध्ये नेण्यात आले.
हेही वाचा: आमणापूरात आढळला स्पायडरमॅन सारखा भिंतीवर चढणारा बेडूक
नयनताराच्या जवळ आलेल्या प्रत्येक वाघाला संपवलं:
यापूर्वी, छोटा मटक्याने आपल्या परिसरात कोणालाही येऊ दिलं नाही. मागील काही वर्षांत छोटा मटक्याने 'मोगली' आणि 'बजरंग' या वाघांनाही ठार करून आपलं वर्चस्व सिद्ध केलं. अशातच छोटा मटक्याने 'ब्रह्मा'ला ठार करून आपण ताडोबाचा राजा आहोत, असं जगासमोर दाखवलं.