उत्तर प्रदेश: चित्रपटसृष्टीतील दिग्दर्शक सनोज मिश्रा यांना दिल्ली पोलिसांनी बलात्काराच्या प्रकरणात अटक केली आहे. सनोज मिश्राने महाकुंभ मेळ्यात सौंदर्याने व्हायरल झालेल्या मोनालिसाला सिनेमात संधी दिली होती, त्यामुळे तो चर्चेत आला होता. मात्र, आता त्याच्यावर झाशीतील एका तरुणीला चित्रपटात काम देण्याचे आमिष दाखवून तिचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे. यानंतर पीडितेने तक्रार दाखल केली, परंतु मिश्राने धमकी देत हा प्रकार गुप्त ठेवण्यास सांगितले होते. त्याने उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता, मात्र तो फेटाळण्यात आला, आणि त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली.
उत्तर प्रदेशातील रहिवासी असलेल्या सनोज मिश्राने आपल्या करिअरची सुरुवात मुंबईत स्पॉट बॉय म्हणून केली होती. सेटवर काम करत असताना त्याने दिग्दर्शनाचे बारकावे आत्मसात केले आणि पुढे स्वतःचे सिनेमे बनवायला सुरुवात केली. 2019 मध्ये त्याच्या राम की जन्मभूमी चित्रपटामुळे तो चर्चेत आला, कारण मुस्लिम समुदायाने या चित्रपटावर आक्षेप घेत फतवा जारी केला होता. 2024 मध्येही तो द डायरी ऑफ वेस्ट बंगाल चित्रपटामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडला. या चित्रपटावर अनेक धमक्या आणि एफआयआर दाखल झाल्याने तो काही काळ बेपत्ता राहिला.
काही काळापूर्वीच सनोज मिश्राने द डायरी ऑफ मणिपूर या नव्या चित्रपटाची घोषणा केली होती, ज्यामध्ये त्याने मोनालिसाला मुख्य भूमिकेसाठी निवडले होते. मात्र, आता त्याच्या अटकेनंतर हा प्रकल्प अधांतरी राहण्याची शक्यता आहे. सनोज मिश्राच्या अटकेमुळे चित्रपटसृष्टीत एकच खळबळ उडाली असून, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.