Sunday, August 31, 2025 10:02:42 AM

राज्यसभेत 'ऑपरेशन सिंदूर'वर चर्चा! राजनाथ सिंह म्हणाले, 'भारत दहशतवादाविरुद्ध कोणत्याही थराला जाण्यास तयार'

राजनाथ सिंह यांचे संसदेतले वक्तव्य हे केवळ सुरक्षा धोरणाचे प्रतीक नसून भारताच्या भविष्यातील दहशतवादविरोधी लढ्याचे स्पष्ट संकेत आहेत.

राज्यसभेत ऑपरेशन सिंदूरवर चर्चा राजनाथ सिंह म्हणाले भारत दहशतवादाविरुद्ध कोणत्याही थराला जाण्यास तयार
Rajnath Singh
Edited Image

नवी दिल्ली: मंगळवारी राज्यसभेत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी 'ऑपरेशन सिंदूर' बाबत महत्वाचे विधान करत भारताच्या दहशतवादविरोधी धोरणावर ठाम भूमिका मांडली. त्यांनी सांगितले की, 22 एप्रिल रोजी पहलगाममध्ये 26 जणांच्या हत्येमागे असलेल्या तीन दहशतवाद्यांचा खातमा भारतीय सुरक्षा दलांनी यशस्वीपणे केला आहे. तसेच, भारताच्या सुरक्षेसाठी कोणत्याही थराला जाण्याची तयारी असल्याचेही यावेळी राजनाथ सिंह यांनी स्पष्ट केलं आहे. राजनाथ सिंह यांचे संसदेतले वक्तव्य हे केवळ सुरक्षा धोरणाचे प्रतीक नसून भारताच्या भविष्यातील दहशतवादविरोधी लढ्याचे स्पष्ट संकेत आहेत. ऑपरेशन सिंदूर हा भारताच्या रक्षणासाठी घेतलेला निर्णायक टप्पा मानला जात आहे.

दहशतवाद्यांचा खात्मा - 

यावेळी राजनाथ सिंह यांनी म्हटलं की, 22 एप्रिल रोजी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे 26 निष्पाप नागरिकांची हत्या करणाऱ्या 'द रेझिस्टन्स फ्रंट' या दहशतवादी संघटनेच्या तीन दहशतवाद्यांचा खात्मा 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत करण्यात आला. हे आमच्या सुरक्षा दलांचं पराक्रमाचे प्रतीक आहे. संरक्षण मंत्र्यांनी सांगितले की, या ऑपरेशनचे मुख्य उद्दिष्ट दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त करणे आणि जगासमोर भारताची ठाम भूमिका मांडणे हे होते. ऑपरेशन सिंदूर केवळ सध्याच्या स्थितीसाठी नाही, तर भारताच्या सुरक्षित भविष्यासाठी देखील महत्त्वपूर्ण आहे. 

हेही वाचा - दहशतवाद्यांना शिक्षा मिळेपर्यंत ऑपरेशन सिंदूर अपूर्ण; पहलगाम हल्ल्यावरून सुप्रिया सुळे संतप्त

ऑपरेशन सिंदूर थांबले आहे, संपलेले नाही - 

दरम्यान, संरक्षण मंत्री सिंह यांनी स्पष्ट केले की, ऑपरेशन सिंदूर सध्या थांबवण्यात आले आहे, मात्र जर पाकिस्तानकडून पुन्हा एखादी कारवाई झाली तर हे ऑपरेशन कोणतीही तडजोड न करता पुन्हा सुरू करण्यात येईल. आमच्या सुरक्षा दलांना लक्ष्य निवडण्याचे पूर्ण स्वातंत्र्य देण्यात आले आहे. 

हेही वाचा - शिष्टाचार विसरू नका! पावसाळी अधिवेशनादरम्यान सभापतींचा खासदारांना इशारा

राज्यसभेत गोंधळ - 

राजनाथ सिंह यांच्या भाषणाआधी राज्यसभेच्या कामकाजात प्रचंड गोंधळ झाला. बिहारमधील मतदार यादी पुनरावृत्ती (SIR), बंगाली स्थलांतरित मजुरांवरील कथित भेदभाव, छत्तीसगडमधील दोन ननच्या अटके, तसेच उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचा राजीनामा या मुद्द्यांवर विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी केली. 'मतांची चोरी थांबवा!' अशा घोषणा दिल्या गेल्या. परिणामी, राज्यसभेचे अधिवेशन सकाळी 11:14 वाजता स्थगित करून दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले.
 


सम्बन्धित सामग्री