म्हैसूर : कर्नाटकमधील म्हैसूरच्या विश्वेश्वरय्या नगरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. विश्वेश्वरय्या नगरमधील एका अपार्टमेंटमध्ये एकाच कुटुंबातील चौघांचे संशयास्पद मृतदेह आढळून आले आहेत. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे. कुटुंबातील 45 वर्षीय पुरूषाने त्याच्या आई, पत्नी आणि मुलाची हत्या करून आत्महत्या केली आहे, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
म्हैसूर शहरातील एका अपार्टमेंटमध्ये सोमवारी एकाच कुटुंबातील चार सदस्य मृतावस्थेत आढळले. विश्वेश्वरैया नगर परिसरात हे कुटुंब एकाच निवासी संकुलातील दोन अपार्टमेंटमध्ये राहत होते. मृतांची ओळख हसन चेतन (45), चेतनची पत्नी रूपाली (43), चेतनची आई प्रियमवदा (62) आणि चेतनचा मुलगा कुशल (15) अशा चार जणांचा समावेश आहे. घटनास्थळी चेतनचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळून आला आहे. तर, उर्वरित मृतदेह अपार्टमेंटमध्ये आढळून आले आहेत, असे पोलिसांनी सांगितले.
हेही वाचा - Kerala Ragging Case: केरळमध्ये नर्सिंगच्या विद्यार्थ्यांसोबत रॅगिंगचा भयानक प्रकार, गुप्तांगाला डंबेल्स… अमानुष छळ
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनास्थळावरून मिळालेल्या चिठ्ठीमध्ये असे म्हटले आहे की, या मृत्यूंसाठी कोणालाही जबाबदार धरू नये. तसेच, त्यांच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याला त्रास देऊ नये, अशी विनंती अधिकाऱ्यांना केली आहे. कुटुंबाने अलीकडेच दोन अपार्टमेंट खरेदी केले असल्याने आणि कर्ज फेडण्यासाठी त्याच्याकडे पैसे नसल्याने ते आर्थिक अडचणीत होते, असे या चिठ्ठीत म्हटले आहे.
नाव न सांगण्याची विनंती करणाऱ्या एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, प्राथमिक चौकशीत असे दिसून आले आहे की, या पुरूषाने आत्महत्या करण्यापूर्वी कुटुंबातील सदस्यांना विष पाजून मारले असावे. त्यानंतर स्वत:ही गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा संशय आहे. 'मृत्यूचे नेमके कारण शोधले जात आहे आणि पोलीस शवविच्छेदन आणि फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी रिपोर्टची वाट पाहत आहेत,' असे अधिकाऱ्याने सांगितले. अपार्टमेंटमधील शेजाऱ्यासह आजूबाजूच्या नागरिकांकडून पोलीस या कुटुंबीयांबाबत अधिक चौकशी करत आहेत. मात्र, एकाच कुटुंबातील चौघांचे मृतदेह आढळून आल्याने खून की आत्महत्या, याचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे. या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
नंतरच्या वृत्तांशी बोलताना म्हैसूरच्या पोलीस आयुक्त सीमा लाटकर म्हणाल्या की, ही व्यक्ती, त्याची पत्नी आणि त्यांचा मुलगा एकाच अपार्टमेंटमध्ये राहत होते, तर त्याची आई दुसऱ्या अपार्टमेंटमध्ये राहत होती. मृत पुरुष मेकॅनिकल इंजिनिअर होता. तो हसनमधील गोरूरचा रहिवासी होता. 2019 मध्ये म्हैसूरमध्ये स्थायिक होण्यापूर्वी त्याने दुबईमध्ये काम केले होते. तो म्हैसूरमध्ये कामगार कंत्राटदार म्हणून काम करत होता, ऑनलाइन प्रक्रियेद्वारे सौदी अरेबियामध्ये नोकऱ्या शोधण्यात कामगारांना मदत करत होता, असे लाटकर म्हणाल्या.
हेही वाचा - व्हॅलेंटाईन डे पूर्वी अपघात.. तलावात होता तरुणीचा मृतदेह, मित्र म्हणाला हे 'ऑनर किलिंग'
पोलिसांनी या घटनेबाबतची माहिती देताना सांगितलं की, 'एकाच कुटुंबातील चार जणांचे संशयास्पद मृतदेह आढळून आले आहेत. चेतन हा कामगारांना सौदी अरेबियाला पाठवायचा. त्याने 2019 मध्ये एक अपार्टमेंट विकत घेतलं होतं. त्याचा मुलगा 10 वीत शिकत होता. तसेच चेतनचा भाऊ विदेशात आहे. मात्र, सोमवारी सकाळी त्याने मृत चेतनच्या पत्नीच्या पालकांना फोन करून अपार्टमेंटमध्ये येण्यास सांगितलं होतं. पण ते जेव्हा अपार्टमेंटमध्ये आले तेव्हा त्यांना हे मृतदेह आढळून आले.'
वृत्तानुसार, जीवन संपवण्यापूर्वी चेतनने अमेरिकेत राहणारा त्याच्या भावाला पहाटे 4 वाजता फोन केला होता. तसेच आम्ही जीवन संपवणार असं चेतनने कॉल डिस्कनेक्ट करण्यापूर्वी भावाला सांगितलं होतं. त्यानंतर अमेरिकेत राहणारा त्याच्या भावाने तातडीने चेतनच्या सासऱ्यांना या संदर्भातील माहिती दिली आणि अपार्टमेंटमध्ये जाण्यास सांगितलं. मात्र, तोपर्यंत ही घटना घडली होती. या संपूर्ण घटनेचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.