Medicines Price Cut: केंद्र सरकारने कर्करोग आणि इतर गंभीर आजारांवरील औषधांच्या किमतीत दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. वस्तू आणि सेवा कर (GST) परिषदेच्या ताज्या घोषणेनुसार, अनेक आवश्यक औषधांवरील जीएसटी दर कमी करण्यात येणार आहे. इंडियन मेडिकल असोसिएशनने (IMA) या निर्णयाचे स्वागत करताना सांगितले की, यामुळे रुग्णांसाठी आरोग्यसेवा अधिक परवडणारी आणि सहज उपलब्ध होईल.
GST दरात मोठी कपात -
कर्करोगासह गंभीर आजारांवर वापरल्या जाणाऱ्या औषधांवरील GST दर 12 टक्क्यांवरून थेट 5 टक्क्यांवर आणण्याची तरतूद करण्यात आली आहे. काही औषधांवर तर हा कर पूर्णपणे हटवण्याचा विचार सुरू आहे. दुर्मिळ आजारांच्या उपचारासाठी लागणाऱ्या औषधांनाही या सवलतीत सामावून घेण्याची योजना सरकार आखत आहे.
हेही वाचा - Supreme Court : अपंगत्वावरील असंवेदनशील विनोदांबद्दल Samay Raina आणि इतर 4 जणांना माफी मागण्याचे आदेश
IMA ची मागणी -
दरम्यान, इंडियन मेडिकल असोसिएशनने सरकारला आवाहन केले आहे की, जीवनरक्षक औषधांवरील GST पूर्णपणे रद्द करावा. यात केमोथेरपी, इम्युनोथेरपी, टार्गेटेड थेरपीसाठी लागणारी औषधे तसेच मधुमेहासाठी लागणारे इन्सुलिन आणि ओरल एजंट्स यांचा समावेश आहे. त्याचबरोबर उच्च रक्तदाब, हृदयविकार, मूत्रपिंडाचे आजार, दमा, थायरॉईड विकार आणि गंभीर संसर्गांवरील औषधांनाही सूट दिली जावी, अशी मागणी IMA ने केली आहे.
वैद्यकीय उपकरणांवरील GST कमी करण्याची शिफारस -
औषधांव्यतिरिक्त, वैद्यकीय उपकरणांवरील GST देखील कमी करण्याची गरज असल्याचे IMA ने स्पष्ट केले आहे. यामुळे रुग्णालये आणि क्लिनिकचा ऑपरेशनल खर्च कमी होऊन उपचार अधिक परवडणारे होतील. रुग्णालयात दाखल होण्यासाठी लागणाऱ्या बेड चार्जवरील जीएसटी हटवण्याची आणि आरोग्य विमा प्रीमियमवर सवलत देण्याचीही सूचना करण्यात आली आहे.
हेही वाचा - Anthrax Symptoms: गायी, म्हशी आणि शेळ्यांपासून पसरतो 'हा' प्राणघातक आजार; आरोग्य मंत्रालयाने सांगितली लक्षणे आणि प्रतिबंधात्मक उपाय
रुग्णांना मोठा दिलासा -
तथापी, IMA चे म्हणणे आहे की, या निर्णयामुळे रुग्णांवरील आर्थिक ओझे मोठ्या प्रमाणात कमी होईल. आरोग्य विम्याचा प्रसार अधिकाधिक लोकांपर्यंत होईल आणि उपचारांच्या खर्चात दिलासा मिळेल. यामुळे देशभरातील नागरिकांना सुलभ व स्वस्त आरोग्यसेवा उपलब्ध होईल. तथापी, या सवलतींमुळे गंभीर आजारांवर वेळेवर उपचार घेणे शक्य होईल. त्यामुळे या निर्णयाकडे सार्वजनिक आरोग्य क्षेत्रासाठी मोठा टप्पा म्हणून पाहिले जात आहे.