Sunday, September 21, 2025 02:30:06 PM

GST 2.0 : 22 सप्टेंबरपासून लागू होणार नवे दर, सलूनपासून जिमपर्यंत काय होणार स्वस्त आणि महाग

22 सप्टेंबरपासून GST 2.0 चे नवे दर लागू होणार आहेत. या बदलामुळे शहरी कुटुंबांचा खर्च लक्षणीय बदलणार आहे. पर्सनल केअर प्रॉडक्ट्स आणि रोजच्या सेवांवर दिलासा मिळणार असला तरी फूड डिलिव्हरीवर खर्च वाढणार

gst 20  22 सप्टेंबरपासून लागू होणार नवे दर सलूनपासून जिमपर्यंत काय होणार स्वस्त आणि महाग

22 सप्टेंबरपासून जीएसटीचे नवे दर लागू होत असून त्याचा थेट परिणाम शहरी कुटुंबांच्या मासिक बजेटवर होणार आहे. पर्सनल केअर प्रॉडक्ट्स आणि आवश्यक वस्तूंसह सैलून, स्पा, जिम, योगा यांसारख्या रोजच्या सेवांचा खर्च आता कमी होणार आहे. मात्र, वारंवार फूड डिलिव्हरी करणाऱ्यांना थोडा जास्त खर्च करावा लागणार आहे.

 FICCI आणि थॉट आर्बिट्राज रिसर्च इन्स्टिट्यूटच्या अहवालानुसार, आता शहरी कुटुंबांच्या एकूण खर्चाचा सुमारे 66% हिस्सा अशा वस्तू व सेवांवर जाणार आहे, ज्यावर 0% किंवा 5% जीएसटी लागतो. यापूर्वी हा हिस्सा 50% च्या आसपास होता. 12% स्लॅब पूर्णपणे रद्द करण्यात आला आहे, तर 18% आणि 28% स्लॅबमधील वस्तूंचा हिस्सा आणखी घटणार आहे.

हेही वाचा - Amul Products : मोठी बातमी! अमूल उत्पादनांच्या किंमतीत घट ; बटरपासून 'या' वस्तू होणार स्वस्त 

सलून, स्पा, जिम आणि योगा यांसारख्या सेवांवर आधी 18% कर आकारला जात होता. पण GST 2.0 लागू झाल्यानंतर फक्त 5% कर लागेल. उदाहरणार्थ, 2,000 रुपयांच्या बिलावर आधी 360 रुपये कर द्यावा लागत होता, पण आता फक्त 100 रुपयेच द्यावे लागतील. व्यवसायिकांना मात्र इनपुट टॅक्स क्रेडिटचा लाभ मिळणार नाही.

हेही वाचा - Mumbai Local : मुंबई लोकलचे आधुनिकीकरण! स्वयंचलित दरवाजांसह नॉन-एसी गाड्याही नव्या रूपात 

साबण, शॅम्पू, टूथपेस्ट, टूथब्रश, शेविंग क्रीम, डेंटल फ्लॉस, फेस पावडर यांसारख्या दैनंदिन वापराच्या वस्तूंवरही कराचा बोजा हलका होणार आहे. सायकल आणि त्याचे पार्ट्स तसेच नंबर लावलेले चष्मे यांवर आता 5% कर लागू होईल. मात्र माउथवॉश या यादीत अद्याप समाविष्ट नाही.

दुसरीकडे, ऑनलाइन फूड डिलिव्हरीवर आता जास्त खर्च करावा लागणार आहे. झोमॅटो, स्विगी आणि मॅजिकपिन यांसारख्या अॅप्सवरील डिलिव्हरी चार्जवर 18% जीएसटी आकारला जाणार आहे. त्यामुळे प्रत्येक ऑर्डरवर 2 ते 2.6 रुपये अतिरिक्त खर्च येईल. सणासुदीच्या काळात हा वाढीव खर्च स्पष्टपणे जाणवणार आहे. एकूणच पाहता, GST 2.0 मुळे शहरी कुटुंबांना पर्सनल केअर व आवश्यक वस्तूंमध्ये बचत होणार आहे आणि काही सेवांवर दिलासा मिळेल. मात्र, वारंवार ऑनलाइन जेवण मागवणाऱ्यांच्या खिशाला फटका बसणार आहे.


सम्बन्धित सामग्री