GST Council Meeting 2025: आजपासून जीएसटी कौन्सिलची दोन दिवसांची बैठक सुरू झाली आहे. या बैठकीत अनेक निर्णय घेण्यात येणार असून त्याचा सर्वसामान्यांच्या खिशावर थेट परिणाम होणार आहे. या बैठकीत किराणा माल, तयार अन्न, मिठाई, दुग्धजन्य पदार्थ, शालेय साहित्य आणि वाहनांवरील कर कमी करण्याच्या तसेच इलेक्ट्रिक वाहनांवरील कर वाढवण्याच्या शक्यतेवर चर्चा सुरू आहे.
दैनंदिन वस्तू स्वस्त होणार -
या बैठकीत 150 हून अधिक उत्पादनांवरील कर कमी करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. तूप, बटर, चीज, ब्रेड, रोटी, पराठा, खाखरा, चपाती, नमकीन, मशरूम, खजूर यासारख्या वस्तूंवर कर 5% किंवा 0% करण्याची शक्यता आहे. मिठाई, पॅकेज्ड स्नॅक्स, चॉकलेट, पेस्ट्री, आईस्क्रीम आणि तृणधान्यांवरील कर 18% वरून 5% पर्यंत कमी होऊ शकतो.
हेही वाचा - ITR Filing : आयकर रिटर्न भरण्याची शेवटची तारीख जवळ, नाही भरलात तर होईल मोठे नुकसान
दुग्धजन्य पदार्थांवर सर्वाधिक परिणाम
तूप, बटर, चीज यांची किंमत कमी होऊन वापर वाढण्याची अपेक्षा. यामुळे आयातीत तेलाची मागणी घटेल आणि देशांतर्गत उत्पादनाला चालना मिळेल.
शालेय साहित्य स्वस्त
नकाशे, ग्लोब, पेन्सिल शार्पनर, कॉपी, लॅब नोटबुक यांसारख्या वस्तूंवरील जीएसटी 12% वरून 0% पर्यंत कमी होण्याची शक्यता.
वाहनांच्या किमतींवर बदल
कार व दुचाकींवरील जीएसटी 28% वरून 18% करण्याचा प्रस्ताव आहे. त्यामुळे वाहन खरेदी करणे स्वस्त होण्याची शक्यता आहे.
कर संरचनेत बदल
सध्याच्या 4 कर स्लॅबऐवजी फक्त 2 स्लॅब (5% आणि 18%) ठेवण्याचा विचार. लक्झरी कार, SUV, तंबाखूजन्य वस्तूंवर 40% विशेष कर लागू होऊ शकतो.
हेही वाचा - Himachal Pradesh Landslide: हिमाचल प्रदेशातील मंडीमध्ये भूस्खलन; 3 ठार, 2 बेपत्ता
लहान व्यावसायिकांना फायदा
वित्तमंत्री निर्मला सीतारमण यांनी सांगितले की जीएसटी 2.0 प्रणालीमुळे अनुपालनाचा भार कमी होईल आणि लहान व्यवसाय व स्टार्टअप्ससाठी व्यवसाय करणे सुलभ होईल.
नवीन दर कधी लागू होतील?
कौन्सिलने मंजुरी दिल्यास नवीन दर 22 सप्टेंबरपासून लागू होऊ शकतात, ज्यामुळे दिवाळीपूर्वी घरगुती बजेटला दिलासा मिळेल. ही बैठक केवळ कर दर ठरवणार नाही, तर येत्या काही महिन्यांत तुमची बचत, खर्च आणि खरेदीच्या सवयीही बदलू शकते.