बंगळुरु : कर्नाटकातील एका दुर्गम डोंगराळ भागातील गावात एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे एका 14 वर्षीय मुलीचा विवाह 29 वर्षीय पुरुषाशी जबरदस्तीने करण्यात आला. बालविवाह करणे हा गुन्हा आहे. तरीही बेकायदेशीरपणे आजही ग्रामीण भागात असे विवाह केले जातात.
आताही एका दुर्गम भागातल्या गावातील एका 14 वर्षीय मुलीचं 29 वर्षीय तरुणाशी लग्न लावण्यात आलं. तिने या लग्नाला नकार दिला होता. तरीही त्याच्याशी तिचे लग्न करण्यात आले. 3 मार्चला या मुलीचे लग्न झाले आणि तिला नवऱ्यासोबत सासरी पाठवण्यात आले. यानंतर ती तिच्या आई-वडिलांकडे परत आली होती आणि पुन्हा सासरी जाण्यास तयार नव्हती. तिला जबरदस्तीने सासरी नेण्याचे प्रयत्न सुरू झाल्यानंतर तिने रडून-ओरडून विरोध करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा हा प्रकार उजेडात आला.
हेही वाचा - 14.8 किलो सोन्यासह विमानतळावर अटक झालेल्या रान्या रावचे वडील वडील रामचंद्र राव चर्चेत; याआधीही वादांमध्ये अडकले होते
मुलींचे आई-वडीलच छुप्या पद्धतीने त्यांचे बालविवाह करण्यात पुढे असल्याचे सातत्याने सिद्ध झाले आहे. यामध्ये मुली बहुतेकवेळा किशोरवयीन किंवा अगदी 10-12 वर्षांच्याही असतात. त्यांचे लग्न त्यांच्याहून वयाने दुपटीने जास्त असलेल्या पुरुषांशी लावून दिले जाते. या मुलींचे पालकच त्यांचे आणि त्यांच्या भविष्याचे शत्रू बनल्याचे अनेकदा समोर आले आहे. याही घटनेत मुलीचे पालकच तिचे लग्न करून देण्यात आग्रही होते, हे समोर आले आहे.
पीडित अल्पवयीन मुलगी होसूर जवळील थोट्टमंजू येथील डोंगराळ भागातील थिम्मॅटूर या गावातील आहे. ती सातवीपर्यंत शिकलेली आहे आणि तिच्या कुटुंबासमवेत राहत होती. तिचे लग्न 3 मार्च रोजी शेजारच्या डोंगराळ भागातील गाव कलिकुट्टाई येथील 29 वर्षीय मधेशशी झाले. तिच्या आई नागम्मा हिनेच हे लग्न ठरवण्यात पुढाकार घेतला होता.
लग्न समारंभानंतर, ही किशोरवयीन मुलगी थिम्मॅटूरमधील तिच्या घरी परत आली आणि तिने आपल्या कुटुंबीयांना आणि नातेवाईकांना सांगितले की तिला मधेशसोबतचे लग्न मान्य नाही आणि तिने तिच्या सासरी जाण्यास नकार दिला. मात्र, तिचा नवरा मधेश याने आपला भाऊ मल्लेश (वय 38) यांच्यासमवेत त्या रडत-ओरडत असलेल्या मुलीचा पाठलाग केला आणि तिला पकडून तिच्या इच्छेविरूद्ध कलिकुट्टाईला परत नेले. आजूबाजूला उभ्या असलेल्या बघ्यांनी या धक्कादायक प्रकाराचे फोनवर चित्रीकरण केले आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ते मोठ्या प्रमाणात सामायिक केले, ज्यामुळे काही तासांत ते व्हायरल झाले.
नातेवाईकाच्या घरातून नवऱ्याने बळजबरीने खेचत नेलं
तिने पुन्हा आपल्या सासरी जावं याकरता तिच्या आई-वडिलांनी तिच्यापुढे तगादा लावला. एवढंच नव्हे तर ती एका नातेवाईकाच्या घरी लपलेली असताना तिच्या नवऱ्याने तिला घराबाहेर ओढले अन् खेचत त्याच्या घरी घेऊन गेला. याप्रकरणी प्रत्यक्षदर्शींनी हा सर्व प्रकार मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद करून सोशल मीडियावर व्हायरल केल्यानंतर हा प्रकार उजेडात आला.
या गोंधळानंतर, ढेंकणीकोट येथील ऑल वुमन पोलीस पथकाने या घटनेची चौकशी सुरू केली. मुलीच्या आजीकडून तक्रार मिळाल्यानंतर पोलिसांनी सक्तीने लग्नात सहभाग घेतल्याबद्दल पोलिसांनी मधेश, मल्लेश आणि नागम्मा यांना अटक केली.
हेही वाचा - तीन वर्षांच्या पीडित मुलीबाबत जिल्हाधिकाऱ्याचं धक्कादायक वक्तव्य; म्हणे, 'तिनेच आरोपीला लैंगिक शोषण करायला प्रवृत्त केलं असेल!'
बालविवाहविरोधी कायदा
बालविवाहविरोधी कायद्यानुसार अल्पवयीन मुला-मुलींचा विवाह करण्यास बंदी आहे. अशा प्रकारात सहभागी असलेल्या सर्वांना कायद्याने शिक्षा दिली जाते. तसेच, अल्पवयीन पत्नीशी शारीरिक संबंध ठेवल्यास तिच्या पतीवर बलात्कारचा गुन्हा नोंदवला जातो. तसेच, इतरांनीही बळजबरी केल्यास त्यांच्यावरही गुन्हा दाखल केला जातो. असे असूनही बालविवाह केले जातात, तेव्हा लोकांमध्ये कायद्याविषयी भीती उरली नसल्याचेच दिसते.