Himachal Pradesh Landslide: हिमाचल प्रदेशातील कुल्लू आणि मंडी जिल्ह्यांमधून भीषण भूस्खलनाच्या घटना समोर आल्या आहेत. कुल्लू जिल्ह्यातील आखाडा बाजाराजवळ सकाळी 11 ते 12 च्या सुमारास मोठा भूस्खलन झाले. ढिगाऱ्याखाली दोन लोक गाडले गेले असून त्यामध्ये एक काश्मिरी कामगार आणि एनडीआरएफ जवानाचा समावेश आहे. बचाव पथके घटनास्थळी पोहोचली असून शोधकार्य सुरू आहे.
दरम्यान, मंडी जिल्ह्यातील सुंदरनगर उपविभागातील जमंगबाग येथील बीबीएमबी कॉलनीत टेकडीचा एक भाग कोसळून दोन घरांवर पडला. यात 3 जणांचा मृत्यू झाला असून, मृतांमध्ये दध्याल येथील प्रकाश शर्मा यांचाही समावेश आहे. ढिगाऱ्यात त्यांची स्कूटरसुद्धा आढळली. मृतदेहांना शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहे.
हेही वाचा - Todays Weather Updates : या चार राज्यांना मुसळधार पावसाचा अलर्ट जारी; तर काही भागात आज शाळा बंद
सुंदरनगरचे आमदार राकेश जामवाल यांनी घटनास्थळाला भेट देत अपघाताबद्दल शोक व्यक्त केला आणि प्रशासनाकडून सर्वतोपरी मदतीचे आश्वासन दिले. मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुक्खू यांनी सांगितले की, 'हिमाचल प्रदेशला आपत्तीग्रस्त राज्य घोषित करण्यात आले आहे. सरकारकडून बाधितांना आर्थिक मदत देण्यात येईल.'
हेही वाचा - Slowest Train In India : ही आहे भारतातली सर्वात छोटी आणि हळू धावणारी ट्रेन; तरीही पर्यटकांचे आकर्षण
पूर्णपणे उद्ध्वस्त घरांसाठी 7 लाख रुपये मदत
मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, हिमाचल प्रदेशला सरकारने आपत्तीग्रस्त राज्य घोषित केले आहे. ज्यांची घरे पूर्णपणे खराब झाली आहेत त्यांना 7 लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाईल आणि जर घरातील सामान नष्ट झाले असेल तर 70 हजार रुपये अतिरिक्त दिले जातील. अंशतः नुकसान झालेल्या घरांसाठी 1 लाख रुपये मदत दिली जाईल, असे त्यांनी सांगितले.