Nimisha Priya death sentence cancelled
Edited Image
नवी दिल्ली: यमेनमध्ये एका खून प्रकरणात फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेल्या केरळमधील परिचारिका निमिषा प्रिया यांना मोठा दिलासा मिळाला आहे. निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा अखेर पूर्णपणे रद्द करण्यात आली आहे. भारतातील ग्रँड मुफ्ती कंठापुरम ए.पी. अबुबकर मुसलियर यांच्या कार्यालयाने यासंदर्भात अधिकृत निवेदन जारी केले आहे.
कोण आहे निमिषा प्रिया?
निमिषा प्रिया या पेशाने परिचारिका असून, त्या काही काळ यमेनमध्ये कार्यरत होत्या. त्यांचा तेथील व्यावसायिक भागीदाराशी वाद झाल्यानंतर त्यांच्यावर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मार्च 2018मध्ये निमिषा यांना त्यांच्या येमेनी व्यावसायिक भागीदाराच्या हत्येप्रकरणी दोषी ठरवण्यात आले. 2020 मध्ये येमेनी न्यायालयाने त्यांना फाशीची शिक्षा सुनावली. त्यानंतर भारतीय दूतावास, सामाजिक कार्यकर्ते, आणि ग्रँड मुफ्तींच्या नेतृत्वाखाली शिक्षेस विरोध करण्यासाठी सतत प्रयत्न सुरु होते.
दरम्यान, ग्रँड मुफ्ती कंठापुरम ए.पी. अबुबकर मुसलियर यांच्या हस्तक्षेपामुळे यमेन येथे झालेल्या उच्चस्तरीय चर्चेत निमिषा प्रिया यांची शिक्षा रद्द करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला. याआधी फाशीची शिक्षा तात्पुरती पुढे ढकलण्यात आली होती, मात्र आता ती पूर्णपणे रद्द करण्यात आली आहे.
हेही वाचा - निमिषा प्रियाला 16 जुलै रोजी येमेनमध्ये देण्यात येणार फाशी; केरळमधील नर्सवर काय आरोप आहेत?
निमिषाच्या कुटुंबाला मोठा दिलासा -
हा निर्णय निमिषा प्रियाच्या कुटुंबासाठी आणि त्यांच्या समर्थनार्थ कार्यरत असलेल्या सामाजिक संघटनांसाठी मोठा न्याय आणि दिलासा घेऊन आला आहे. आता भारत सरकारकडून त्यांच्या सुरक्षित परतीसाठी पुढील हालचाली करण्यात येणार आहेत.
हेही वाचा - 26/11 Mumbai Attack: तहव्वुर राणाने उघडलं तोंड! पाक सैन्याशी असलेल्या संबंधाचा केला खुलासा
भारताचा राजनैतिक विजय
हा निर्णय केवळ एका व्यक्तीच्या शिक्षेची समाप्ती नाही, तर भारताच्या राजनैतिक आणि मानवीय प्रयत्नांचे फलित आहे. भारताचे विदेश मंत्रालय, भारतीय दूतावास, तसेच मानवी हक्क कार्यकर्त्यांनी दिलेल्या पाठिंब्यामुळे हे शक्य झाले. निमिषा प्रिया यांची शिक्षा रद्द होणे हे भारतीय नागरीक संरक्षणासाठी आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताच्या हस्तक्षेप क्षमतेचा मोठा विजय मानला जात आहे. आता सर्वांच्या नजरा निमिषा प्रिया भारतात कधी परततात, याकडे लागल्या आहेत.