काशीपूर : एका खासगी शाळेतील नववीच्या विद्यार्थ्याने त्याच्या शिक्षकावर पिस्तूलने गोळी झाडल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या शिक्षकाने विद्यार्थ्याला थोबाडीत मारली होती, त्यानंतर विद्यार्थ्याने त्याच्या जेवणाच्या डब्यात पिस्तूल आणले आणि शिक्षकावर गोळी झाडली, असे सांगितले जात आहे. शिक्षक गगनदीप सिंग कोहली असे पीडित शिक्षकाचे नाव आहे. गोळी त्यांच्या उजव्या खांद्याखाली लागली. त्यानंतर त्यांना गंभीर अवस्थेत खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, शिक्षकाने थोबाडीत मारल्याने विद्यार्थ्याला राग आला होता. यानंतर, रागाच्या भरात विद्यार्थ्याने त्याच्या जेवणाच्या डब्यात पिस्तूल लपवून शाळेत आणले आणि वर्गातच शिक्षकावर गोळी झाडली. उत्तराखंडमधील उधमसिंह नगर जिल्ह्यातील काशीपूर येथे ही धक्कादायक घटना घडली आहे.
या खळबळजनक घटनेनंतर संपूर्ण जिल्ह्यातील शिक्षकांमध्ये संताप आहे. या घटनेच्या निषेधार्थ उत्तराखंडच्या सीबीएसई बोर्डाशी संबंधित शिक्षकांनी धरणे आणि संपावर बसले आहेत. काशीपूरसह अनेक ठिकाणी आज शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. पोलिसांनी विद्यार्थ्याला ताब्यात घेतले आहे आणि पिस्तूल जप्त केल्यानंतर या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. सध्या शिक्षक गगनदीप सिंग यांची प्रकृती चिंताजनक आहे. ते आयसीयूमध्ये दाखल आहेत.
हेही वाचा - Nagpur: बाबाला भोंदूगिरी भोवली, महिलेसोबतच्या त्या किळसवाण्या कृत्यामुळे भोंदूबाबाला अटक
बुधवारी शिक्षक गगनदीप सिंग कोहली हे सकाळी 9.45 वाजता काशीपूरमधील कुंडेश्वरी रोडवरील एका खाजगी शाळेत भौतिकशास्त्राचा वर्ग घेण्यासाठी पोहोचले. मध्यांतरानंतर ते वर्गातून बाहेर येऊ लागले. तेव्हा एका विद्यार्थ्याने टिफिन बॉक्समधून पिस्तूल काढून मागून त्यांच्यावर गोळीबार केला.
यानंतर विद्यार्थ्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. पण शिक्षकांनी त्याला पकडले. जखमी शिक्षक गगनदीप यांना खासगी रुग्णालयात नेण्यात आले. त्यांच्या तक्रारीवरून अल्पवयीन आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे एएसपी अभय सिंह यांनी सांगितले. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
उधमसिंह नगर जिल्ह्यातील आज खाजगी शाळा बंद राहतील
शिक्षकावर गोळीबार झाल्याच्या निषेधार्थ जिल्ह्यातील सर्व सीबीएसई आणि मान्यताप्राप्त खासगी शाळा गुरुवारी बंद राहतील. उधमसिंह नगर स्वतंत्र शाळा संघटनेच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. या घटनेच्या निषेधार्थ शिक्षक काळा दिवस पाळतील. बुधवारी कुंडेश्वरी रोडवरील एका खाजगी शाळेत संघटनेची बैठक झाली. ज्यामध्ये एका विद्यार्थ्याने शिक्षकावर गोळीबार केल्याच्या घटनेचा निषेध करण्यात आला.
संघटनेचे जिल्हा संयोजक राहुल पगिया म्हणाले की, या घटनेच्या निषेधार्थ जिल्ह्यातील सीबीएसई आणि खासगी मान्यताप्राप्त शाळा गुरुवारी बंद राहिल्या. बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. याशिवाय, काशीपूर रामलीला मैदानापासून एसडीएम कार्यालयापर्यंत मूक मोर्चा काढण्यात आला, जिथे शिक्षकांच्या सुरक्षेबाबत आणि इतर मागण्यांबाबत एसडीएमना निवेदन दिले. येथे संघटनेचे जिल्हा अध्यक्ष नायब सिंह धालीवाल यांनीही या घटनेचा निषेध केला आहे. जिल्हा सरचिटणीस मनोज खेडा, जिल्हा संयोजक राहुल पगिया इत्यादी उपस्थित होते.
हेही वाचा - Ahilyanagar Crime : धक्कादायक ! अर्धवट जळालेल्या अवस्थेत सापडला महिलेचा मृतदेह ; पतीला अटक, मेहुणा फरार
गाजीपूरमधूनही असाच एक प्रकार समोर आला होता
सोमवारी यूपीतील गाजीपूरमधूनही असाच एक प्रकार समोर आला होता. येथे एका खाजगी शाळेतील विद्यार्थ्यांमधील वादाने भयानक रूप धारण केले. वाद सुरू असताना, नववीच्या एका विद्यार्थ्याने दहावीत शिकणाऱ्या आदित्य वर्मा याच्यावर चाकूने हल्ला केला होता. या घटनेत आदित्यचा जागीच मृत्यू झाला, तर मध्यस्थी करण्यासाठी आलेले इतर तीन विद्यार्थीही जखमी झाले.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी विद्यार्थ्याने धातूच्या पाण्याच्या बाटलीत लपवून चाकू शाळेत आणला होता. संधी मिळताच त्याने बाथरूमजवळ आदित्यवर हल्ला केला. आदित्य वाद मिटवण्याचा प्रयत्न करत होता. परंतु, आरोपीने त्याला निर्घृणपणे ठार मारले.